Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमुलांना देऊया जीवन शिक्षण !

मुलांना देऊया जीवन शिक्षण !

कोरोनाच्या संसर्गामुळे मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. शाळा बंद आहेत. काही प्रमाणात शिक्षण सुरु असले तरी त्याला मर्यादा आहेत. शहरी शाळांमधील पालक हे ग्रामीण भागातील झेड.पी.च्या किंवा शहरांमधील झोपडपट्टीतील मुलांच्या पालकांच्या तुलनेने अधिक सुज्ञ व जागरूक आहेत. त्यामुळे शहरातील खासगी शाळांमधील पालक आपल्या पाल्यांचे काही प्रमाणात शिक्षण सुरु ठेवण्यास हातभार लावीत आहेत.

असे असले तरी मुलांना मोबाईल अथवा संगणकाच्या स्क्रीनसमोर किती वेळ राहू द्यावे, हे आपल्याला ठरवावेच लागेल. मुलं सतत स्क्रीनसमोर राहिल्यास त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्याला मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, डोळ्यांचे आजार बळावू शकतात. या सर्वांचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर होऊन मूल चिडचिड करू शकते. म्हणजे आजारापेक्षा उपाय भयंकर ठरू शकतो.

- Advertisement -

मग मुलांचे शिक्षण थांबवावे का? तर या प्रश्नाचे सरळ उत्तर नाही असेच आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व बालमानसशास्त्रज्ञांनी मूल हे कृतीतून शिकते, हे सिध्द केलेले आहे. जॉन ड्युई यांची कृतीकेंद्रित शिक्षण पद्धती, किल पेट्रकची प्रकल्प पद्धती किंवा महात्मा गांधींची जीवन शिक्षण पद्धती या सर्वांमध्ये कृतीवरच भर देण्यात आलेला आहे. गांधीजींनी शिक्षणात ‘3 क’ला महत्व दिलेले आहे. कछऊ,कएऊ आणि कएठढ.

यामध्ये कछऊ म्हणजे कृतीच होय. म्हणून शिक्षण हे घोकंपट्टी द्वारे न होता कृतीद्वारा झाल्यास त्याचे दिर्घकाळ सकारात्मक परिणाम दिसून येतील. शाळा जरी बंद असल्या तरी समाज व पालक यांच्याद्वारे मुलाचे शिक्षण होऊ शकते. तसेही मुल अनुकरणाने शिकते. आता पूर्णवेळ मुल हे पालकांच्या सहवासात आहे. त्याच्यावर पालकानी आदर्श चारित्र्याचे संस्कार करावेत.

सहिष्णुता, सर्वधर्म समभाव, शेजार्‍यांशी कसे वागावे हे सर्व मुद्दामहून शिकवावे. पालकांनी आपल्या मुलांना जीवन जगण्याचे शिक्षण देण्याची संधी चालून आलेली आहे. आपल्या शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष जीवन जगतांना किती उपयोग होतो हा चिंतनाचा विषय होऊ शकतो. म्हणून आता बदलत्या काळाची आव्हाने ओळखून मुलांना व्यावहारिक शिक्षण द्यावे.

एकदा शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील एका मुलाला 20 रुपये किलोने कांदे असल्यास तीन किलो कांदे किती रुपयांना येतील असे विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर खूप मजेशीर होते. त्याच्या मते तो कांदे घ्यायला जातच नाही तर त्याला उत्तर कसे येईल! मलाही आश्चर्य वाटले. खरे तर तो मुलगा हुशार होता. लेखन वाचन गणितातील क्षमता त्याला अवगत होत्या. परंतु त्या क्षमतांचे उपयोजन त्याला करता येत नव्हते. म्हणून मिळालेल्या ज्ञानाचे दैनंदिन जीवन जगत असतांना उपयोजन करता आले पाहिजे. तेच खरे शिक्षण होय.

शिक्षण हि निरंतन चालणारी प्रक्रीया आहे. म्हणून पालकांनी छोट्या छोट्या कृतीतून घरच्या घरी मुलांना शिकवावे. त्याला किराणा घ्यायला दुकानावर, भाजीपाला घ्यायला पाठवावे. खतांच्या दुकानावर घेवून जावे. हिशेब करायला सांगावा. दुकानावरील वजन मापे हाताळू द्यावे. वस्तू मोजतांना त्याला निरीक्षण करावयास सांगावे. पैसे हाताळू द्यावेत. शेतीचा, मजुरीचा, रोजंदारीचा हिशेब करावयास सांगावा. घराचे, खोलीचे मोजमाप करावयास सांगावे. घरातील सर्वांची उंची, वजन, छाती यांचे मापन करावे. हे सर्व एका वहीत प्रमाणित एककात लिहून ठेवावे. प्रत्यक्ष अर्धा, पाव, पाऊण हे वस्तुंचे भाग करून दाखवावे. यामुळे मुलाची व्यावहारिक गणिताची तयारी होईल.

मुलांना शेतात घेऊन जावे. त्याला होईल तितके काम करू द्यावे. यामुळे श्रमाचे महत्त्व कळून येईल. शेतात काम करतांना जमिनीचा पोत, मातीचे प्रकार, पीकपद्धती, सिंचनाचे प्रकार, मातीचे प्रकार, पाण्याचा वापर, विविध पिके, त्यांना लागणारे हवामान, खते, कीटकनाशकांचा वापर, पर्जन्यमान इत्यादी बाबींचे शेतात शिक्षण देता येईल.यामुळे विज्ञान व भूगोल या विषयांची तयारी प्रत्यक्ष कृतीतून होईल.

रात्री मुलांना आकाश निरीक्षण करावयास सांगावे. परिसरातील नद्या,डोंगर, पर्वत, वनस्पती, सण,उत्सव इत्यादींची चर्चा केल्यास आपोआपच भूगोल या विषयाची तयारी होते. मुलांना मोठ्यांशी बोलण्याची संधी द्यावी. नातेवाईकांना पत्र लिहिण्यास सांगावे. गल्लीतील सुविधांबाबत ग्रामपंचायतीस अर्ज लिहिण्यास सांगावे.

दिवसभर घडलेल्या घटनांची माहिती लिहिण्यास सांगावे. भाऊ-बहीण, शेजारील मुलांना शब्दांच्या भेंड्या, अंताक्षरी खेळण्यास सांगावे. या कृतींमुळे भाषा विषयाची तयारी होईल. घरात रात्रीच्या वेळी टीव्ही पाहत असताना डिस्कवरीवरील मालिका दाखवाव्यात. विविध एपिसोड विज्ञान, इतिहास, भूगोल, कला या विषयांवर आधारित असतात. शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम दाखवावेत. मुलांसोबत सकाळी योग, व्यायाम करावा. मुलांना घरातील सर्व कामे करू द्यावीत.यातून कला कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांचे शिक्षण देता येईल.

जरी शाळा बंद असल्या तरी या पद्धतीने घरी शिक्षण सुरु ठेवता येईल. प्राचीन काळात गुरुकुलात याच पद्धतीने शिक्षण दिले जाई. यात मोबाईल, संगणकाचाही कमीतकमी वापर करता येवू शकतो. हे प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण असल्याने गांधीजींच्या संकल्पनेनुसार ‘3 क’ वर्किंग करतील. अशा पद्धतीने पालकांनी तसेचशिक्षकांनी शिक्षण सुरु ठेवल्यास काही अंशी शाळांची उणीव भरून काढण्यास मदत होईल व मुलांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. शिवाय हे कृतीतून शिक्षण असल्याने मुलांना कंटाळा येणार नाही. त्याचे परिणामही सकारात्मक व दीर्घकालीन असतील.

संजीव सीताराम शेटे,प्राथमिक शिक्षक चोपडा.

मो. 9623236638

- Advertisment -

ताज्या बातम्या