Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपायाला भिंगरी लाऊन फिरणार्‍या आ. चंदुभाऊंचे वेगळेपण…!

पायाला भिंगरी लाऊन फिरणार्‍या आ. चंदुभाऊंचे वेगळेपण…!

पुरुषोत्तम गड्डम

भ्रमणध्वनी – 9545465455

- Advertisement -

अंदाजे 18-20 वर्षांपूर्वीची गोष्ट असेन… मित्राच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी म्हणून आम्ही निघालो होतो. मुक्ताईनगरात दाखल होताच, मित्राने चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अशा नावाची पत्रिका बाहेर काढली. मुक्ताईनगरात आता ज्या ठिकाणी आयसीआयसीआय बँक आहे. तेथून विस्तीर्ण गल्लीतील एका बसल्या घरासमोर आमची गाडी थांबली. घरासमोर दुचाकी, चारचाकी गाड्यांची गर्दी दाटलेली होती.

घरासमोरील अंगणात 10-15 तरुण जोशात उभे होते. बहुधा कार्यकर्ते असावेत… त्यांनी आम्हा तिघांच मनापासून स्वागत केले. बाजुच्या बाकड्यांकडे बोट दाखवून बसण्याची विनंती केली. समोर 20-25 बायका, माणसांची गर्दी होती. एकामागून एक त्यांची गार्‍हाणे सुरु होते. पंचवीशीतील चंद्रकांत पाटील नावाच वादळं मनाचे कान करुन प्रत्येकाच गार्‍हाणं ऐकत होतं… यथावकाश त्यांच आमच्याकडे लक्ष गेलं.. आर्जवी चेहर्‍यानं चंदुभाऊंनी आम्हाकडे बघत, थोडं थांबा असा मूकसंदेश दिला, ही वैयक्तीक चंदुभाऊंची माझी पहिली भेट, पण आमचा मित्र त्यांचा खंदा समर्थक… 1999मध्ये सक्रिय पत्रकारिता सोडून शिक्षकी पेशा स्विकारल्यानंतर मी राजकारण व समाजकारणापासून जरा अंतर ठेऊन होतो. त्यामुळे चंदुभाऊ हे माझ्यासाठी केवळ माहितीतील मुक्ताईनगर शिवसेना तालुकाप्रमुख.. इतकच!
पण सक्रिय पत्रकारितेत उपसंपादक म्हणून काम करतांना मी अशा अनेक पक्षांच्या तालुका प्रमुख किंवा अध्यक्षांना जवळून पाहिले होते. पण मुक्ताईनगरचं हे तापी-पूर्णाचं पाणी काही वेगळचं जाणवलं होत.

एका शिवसेना तालुका प्रमुखाच्या घरासमोर गोरगरीब व गरजू जनता आशेने दाखल होत असल्याचे पाहून माझी जिज्ञासा पाणावली आणि असा सामान्य राजकारणी माणूस आमदार किंवा मंत्री झाला तर काय बहार येईल, असा आल्हादक विचारही मनाला शिऊन गेला. अशा विचारात मग्न असतांनाच कुण्यातरी म्हातारीच्या कोकलण्याने-रडण्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. सत्तरीतील एक म्हातारी जीवाच्या आकांताने रडत होती… ‘भाऊ, मले तीन पोरं, एक मुंबईले राहातो. अन दोन्ही अडी राहता… तेयचा बाप जिवंत असतांनाच हिश्शे-वाटे करुन गेला. दोन्हीले जमीन-जुमला घर-दार हाये… पण लहाना म्हनतो, आई… तू मोठ्याकडे जाय! अन मोठा म्हणतो आई तू लहान्याकडेच राय… सुना नाही-नाही ते टोचून बोलता… जियाले बी देत नाही…. पोरं त्या धांदुकाय पुढे काईच बोलत नाही… या तरासाले कटावून मी पोलीस ठेसनात बी गेलती, पण तेयनी बी हुसकून देल… आता तूच सांग मी काय करु….तू बी महा लेकच हाये, माहा काहीतरी न्यावं लाव तू….!’असं म्हणत म्हातारी पुन्हा रडायला लागली… तसं चंदुभाऊंनी आपल्या कार्यकर्त्यांकडे बघीतल… कार्यकर्तेही पट्टीतले! भाऊ काही जरी नाही बोलले तरी त्यांना निरोप कळाला… दोघे कार्यकर्ते तडक म्हातारीच्या घराकडे रवाना झाले असावेत. असा मी अंदाज बांधला… नंतर आणखी एक शेताच्या बांधावरुन झालेला वाद मिटवला आणि आमच्या मित्राला चंदुभाऊंनी जोशात आवाज दिला… ‘या… राजे, कधी आहे माझ्या बहिणाचे लग्न… काय जबाबदारी देता आमच्याकडे… करा हुकूम!’ असे म्हणताच आमच्या मित्राची कळी खुलली… अंगावर
मुठभर मांस चढले. आमचा जुजबी परिचय करुन दिल्यानंतर आम्ही जायला निघालो. तोवर मघाशी रवाना झालेले कार्यकर्ते, म्हातारीच्या दोन्ही पोरांना घेऊन हजर झाले होते… कायद्याच्या कोतावलेल्या चौकटीबाहेर जाऊन म्हातारीला या दरबारात न्याय मिळाला असेलच, हे वेगळे सांगायला नको !

…हे 18-20 वर्षांपूर्वीचं दृष्य आज मनोपटलावर येण्याच कारण म्हणजे, त्या काळचा एक शिवसेना तालुका प्रमुख आज धाडसानं मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचा आमदार झाला व परवा मतदार संघातील बोदवड तालुक्यात फिरत असतांना जनतेशी त्यांचा तोच आपुलकीचा ऋणानुबंध बघीतला, आणि आता यापुढे निश्चितच काहीतरी वेगळ पण दिशादर्शक घडेल असा आत्मविश्वासही दुणावला.
मतदार संघ तरीही कोरडा मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ हा जळगाव जिल्ह्यातील अगदी शेवटचे टोक असलेला भाग! तापी-पूर्णाच पाणी खेळत असलं तरी शेतकर्‍यांचा मेळ बसत नसल्याच चित्र आम्ही कित्येक वर्षांपासून पहात आलो आहोत. उल्लेखनिय बाब म्हणजे या मतदार संघाचे नेतृत्त्व अगदी दिग्गजांनी केले आहे. बाळासाहेब चौधरी, हरिभाऊ जवरे यांचे तर नावे उल्लेखनिय आहेच पण प्रदीर्घ काळ आमदार म्हणून आदरणीय प्रतिभाताई पाटील, तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीही या मतदार संघाचे नेतृत्त्व केले. आमदार म्हणून निर्वाचित झाले नसले तरी सहकार क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी केली असे ‘सहकार महर्षि प्रल्हादराव पाटील यांनीही या मतदार संघाचे प्रतनिधीत्व केले. पण मतदार संघातील जनतेला अपेक्षित असा विकासात्मक स्त्रोत परिसरात निर्माण झाला नाही.

पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही जुनाट वळचणीच्या मुद्यांना हात न लावता. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि जनतेच्या आशिर्वादावर त्यांना विजयसुध्दा मिळाला. चंदुभाऊंचा हा विजय राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला. पण आमदार झाल्यानंतर चंदुभाऊ आता अधिक सजग व गंभीर असल्याचे जाणवायला लागले. राजकारणाची किंवा सत्तेची हवा त्यांच्या डोक्यातच काय, पण आजुबाजुलासूध्दा फिरकलेली अजुनतरी दिसली नाही.

अपेक्षा फलद्रुप कराव्यात
मुक्ताईनगर तालुक्यातील गावे नदीक्षेत्रात असूनही 80 पैकी 50 गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, या ठिकाणी नियोजन पूर्वक योजना तयार केली तर तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. मुक्ताईनगरात चांगली बाजारपेठ विकसित होऊ शकते, पण भूखंडाचा अभाव आहे. त्यासाठी आमदारांनी बस डेपोची जागा हेरली आहे. विविध प्रकारच्या सिंचन योजना मतदार संघात रखडल्या आहेत. त्यासाठी किमान 150 कोटी रुपयांची गरज आहे. पैकी 50 कोटी रुपये आ. पाटील यांनी मंजुर करुन घेतलेत. बोदवड तालुक्यातील सर्वच गावे अवर्षणग्रस्त आहेत. यासाठी ओडीए योजना सशक्त करणे आणि बोदवड परिसर सिंचन योजनेच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला गती देणे, ही कामे प्राधान्याने करावी लागणार आहे. बोदवडला रहदारीची समस्या लक्षात घेता. वळणरस्ता प्रास्तावित करण्याचा विचार प्रकर्षाने सुरु आहे. याशिवाय गावकुसातील रस्तेे अद्ययावत होण्याकडे प्रयत्न सुरु आहेत. हे सारं काही शक्य असल्याबाबत आ. पाटील आश्वस्त दिसतात. पायाला भिंगरी लाऊन जनसेवा करणार्‍या या जमिनीवरच्या आमदारांच्या अपेक्षा सिध्द होवोत. ही आमची अपेक्षा….!

जब हौसला बना लिया,
ऊंची उडान का…
फिर देखना फिजुल है,
कद आसमान का….

- Advertisment -

ताज्या बातम्या