अर्थव्यवस्था संघटित होते म्हणजे नेमके काय ?

अर्थव्यवस्था संघटित होते म्हणजे नेमके काय ?

यमाजी मालकर

सलॉजिस्टिक आणि मालवाहतूक क्षेत्र आर्टिफिशयल इंटलिजन्स, यंत्रमानव, डिजिटल व्यवहार यांचा वेगाने वापर करू लागले आहे. साठा, पुरवठा आणि दळणवळण हे त्यामुळे संघटित, वेगवान आणि ‘आपोआप’ होत आहे. ग्राहक आणि नागरिक म्हणून आपला त्याच्याशी जवळचा संबंध आहे. तो आपण मान्य करणार की त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार हे ठरवायची गरज आहे.
ध्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल होत आहेत, या प्रश्नाचे एका वाक्यातले उत्तर आहे भारतीय अर्थव्यवस्था संघटित होत आहे. जे जे असंघटित होते आणि अजूनही आहे, त्याला त्याच क्षेत्रातले संघटित उद्योग व्यवसाय आव्हान देऊ लागले आहेत. त्यामुळे शक्य असेल त्या ठिकाणी आणि शक्य असेल त्या पद्धतीने संघटित उद्योग व्यवसायांशी जोडून घेणे, ही गरज बनली आहे. असे व्हायला हवे की नको, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण त्यामुळे हा प्रवास आता थांबण्याची शक्यता नाही. याचे कारण व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि अगदी शेतीची कामे संघटित पद्धतीने, अधिक वेगवान आणि यांत्रिक पद्धतीने म्हणजे आपोआप करायची सोय झाली तर त्याला कोणी ‘नाही’ म्हणताना दिसत नाही. खरे म्हणजे आतापर्यंतचा या सर्व क्षेत्राचा प्रवास असे सांगतो की, या सर्व गोष्टी स्वीकारूनच जग पुढे चालले आहे. त्यालाच जग आधुनिक काळातला बदल म्हणत आहे. अलीकडच्या काळात या बदलाचा वेग अधिक वाढला आहे. त्यामुळे त्याची विशेष दखल घ्यायची, नाही तर त्याची खास दखल घेण्याची तशी गरज नाही.

या बदलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कामाचे व्यवस्थापन अधिक काटेकोर केले जाते. खर्च केला जात असेलल्या प्रत्येक पैशांचा हिशेब ठेवला जातो. एकच काम दोन ठिकाणी करण्याचे टाळले जाते. पैशांसोबत श्रम आणि ऊर्जेची अधिकाधिक बचत केली जाते. याला आपण साधारण काम संघटित करणे असे म्हणतो. हे काम कमीत कमी वेळेत व्हावे, यासाठीची सर्व तयारी केली जाते आणि तोचतोचपणा असणार्‍या कामाच्या ठिकाणी यंत्रांचा भरपूर वापर केला जातो. विशेषतः मनुष्यबळ महाग होत जाते, त्या त्या ठिकाणी थेट यंत्रांना काम दिले जाते. म्हणजे एक प्रकारे ते यंत्र आपोआप काम करत राहते. कारण ते थकत नाही.

मालवाहतूक हा एक महत्त्वाचा उद्योग असून त्यात हे नवे मंत्र किती ठळकपणे दिसू लागले आहेत, त्याची काही उदाहरणे पाहिली, की हा बदल किती वेगाने होत आहे, हे लक्षात येते. अशा या बदलांना चांगले किंवा वाईट नावे दिली जातात, पण तशी ती दिली तरी या बदलांमध्ये फार फरक पडत नाही. कारण हे बदल व्यावहारिक कारणांसाठी होत असतात, एकमेकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी होत असतात. प्रवाशांनी आपल्याच गाडीत बसावे, यासाठी सहाआसनी रिक्षा गावाच्या चौकात चालू करून ठेवली जाते, हे प्रवासी वाहतूक स्पर्धेत जेवढे साहजिक आहे, तसेच हे आहे. आता दैनंदिन जगण्याचा वेग एवढा वाढला आहे की त्या वेगाला साजेशी स्पर्धा करणे क्रमप्राप्त झाले आहे. माल किंवा वस्तू लवकर न मिळणे, त्यांच्या वाहतूक करण्यात अधिक वेळ जाणे, प्रवासात वस्तूंचे नुकसान होणे, एकाची वस्तू दुसर्‍याला जाणे, वस्तू वेळेत आणि सुरक्षित पोहोचवण्यासाठी अधिक खर्च येणे, हे या उद्योगाने अडथळे मानले आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

ई कॉमर्स कंपन्या आणि त्या वस्तू घरपोच पोहोचवण्यासाठी करत असलेल्या सुधारणा हे या प्रयत्नांचे आपल्या जवळील सगळ्यात मोठे उदाहरण आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या शेकडो कंपन्या सध्या या स्पर्धेत पळत आहेत. या संदर्भातले ठोस उदाहरण म्हणजे मुंबईजवळील भिवंडी शहर. या उद्योगाने या शहराचे रूपरंगच बदलून टाकले आहे. या कंपन्या घरपोच पोहोचवत असलेल्या मालाचा साठा करणे, मागणी येताच त्या वस्तू गोदामातून बाहेर काढणे, तो त्या त्या गावाच्या मालगाडीमध्ये चढवणे, त्या गावात पोहोचल्यावर छोट्या मालगाड्यांमध्ये त्याचे वाटप करणे, तो त्या गावातल्या विशिष्ट ठिकाणी पोहोचवून घरात पोहोचवणार्‍या माणसाला वेळेत मिळेल हे पाहणे, हा सर्व प्रवास किती कमी वेळेत केला जाऊ शकतो, या सर्व गोष्टींची पश्चिम भारतातली सुरुवात सध्या भिवंडीपासून होते. थोडक्यात, लॉजिस्टिक हा एक मोठा उद्योग होऊ घातला असून भिवंडी हे त्याचे एक मोठे केंद्र झाले आहे.
पण लॉजिस्टिकचे केंद्र म्हणूनच हे मर्यादीत नाही तर एक ग्राहक म्हणून आपला आणि या बदलांचा कसा संबंध आहे, हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. उदा. ही उलाढाल एवढी प्रचंड आहे की, दर 30 सेकंदाला एक मालगाडी इथून बाहेर पडते. सुमारे 100 कंपन्यांची साठ लाख पार्सले इथून दररोज रवाना होतात. आज इथे साडे तीन लाख कामगार काम करत आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये इथल्या जमिनीच्या किमती 150 पट वाढल्या आहेत. हे झाले भिवंडीचे, पण भारतातला हा उद्योग आता 8000 कोटी रुपयांचा झाला असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यात 36 टक्के वाढ होणार, असा अंदाज आहे.

भारतात 80 टक्के मालवाहतूक ही रस्ते मार्गाने होते. सध्या तिची उलाढाल दर वर्षी दहा टक्क्यांनी वाढत आहे आणि ती 2020 मध्ये 215 अब्ज डॉलर होईल, असा आर्थिक पाहणी अहवालातला अंदाज आहे. ती वेगवान करण्याचे काम जसे फास्टटॅग करू लागले आहेत, तशा अनेक सुधारणा सध्या होत आहेत. टोल नाक्यावर टोल द्यावाच लागणार, हे आपण आता स्वीकारले आहे. पण रांगेत वेळ जाऊ नये, अशी आपली रास्त अपेक्षा आहे. ही अपेक्षा फास्टटॅगच्याच मार्गाने पूर्ण होऊ शकते. मालवाहतूक उद्योगात सव्वा दोन कोटी रोजगार आहेत, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते. मालाच्या वाहतुकीची गरज असलेल्यांचा आणि माल वाहतूकदाराचा संपर्क होणे, कमीत कमी वेळेत तो माल गाडीत योग्य पद्धतीने भरणे, मालगाडी कोणत्या मार्गाने जात आहे, याचा माग (ट्रॅकिंग) काढणे, तो माल उतरवणे आणि लगेचच गरज असलेल्या अन्य ठिकाणी पोहोचवणे, याला आता अतिशय महत्त्व आले आहे. या कामात येणारे अडथळे कमी करून हे काम अधिक वेगवान करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात मनुष्यबळ हा अडथळा ठरत असणार्‍या ठिकाणी यंत्रमानवाची मदत घेतली जात आहे. यंत्रमानव वापरल्याने खर्च कमी होत असेल तर त्याचा स्वीकार वेगाने केला जात असल्याचे पहायला मिळत आहे. अशा क्षेत्रात हा प्रवास अपरिहार्य आहे, हे समजून घेतले पाहिजे.

एकूणच वाढणार्‍या वेगात वाट पाहणे, ही सर्वात वेळखाऊ, खर्चिक आणि कंटाळवाणी बाब असेल तर वाट पहाणे कमी करणे, एवढाच त्यावर मार्ग राहतो. त्यामुळे जग त्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करणार, हे ठरले आहे. या सर्व प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप होतो, तो कमी करण्याचा प्रयत्न होणार, हे ही ओघाने आलेच. आर्टिफिशयल इंटलिजन्स, यंत्रमानवाचा वापर, डिजिटल व्यवहार अशा वर्तमानातील बदलांमध्ये त्याची प्रचिती येत आहे. पण त्याचा एक परिणाम समाजाला आणि सरकारला गंभीर विचार करायला लावणारा आहे. तो म्हणजे या बदलांमुळे सेवा आणि उत्पादनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आणि त्या वेगाने ग्राहक तयार होत नसल्याने सर्वत्र मंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पेचप्रसंगात खरी गरज आहे ती जास्तीत जास्त नागरिकांची क्रयशक्ती वाढण्याची.

त्यासाठी रोजगार वाढला पाहिजे. ही भारताची आज सर्वात कळीची गरज आहे. सेवा आणि उत्पादनांचा वापर वाढला म्हणूनच विकसित देश, प्रचलित विकासाच्या व्याख्येत पुढे गेले आहेत, हे विसरता येणार नाही. त्यांना कदाचित या बदलाची आज तेवढी गरज नसेल, पण 135 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशाला असा क्रांतिकारक बदल स्वीकारल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com