Friday, April 26, 2024
HomeUncategorizedगणित कुठे चुकतेय ?

गणित कुठे चुकतेय ?

आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना साधी-सोपी गणिते करता येत नाहीत. एवढेच नव्हे तर एक चतुर्थांश विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही, असे एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. संबंधित घटकांनी अत्यंत गांभीर्याने चिंतन करावे, असा हा विषय आहे…

– प्रा. शुभांगी कुलकर्णी

- Advertisement -

त मिळनाडूतील इरोड येथे सव्वाशे वर्षांपूर्वी जन्माला आलेले गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी गणिताची नव्हती. गणितासाठी मार्गदर्शन करणारे कुटुंबात कोणीच नव्हते. तरीही रामानुजन यांनी लंडनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रा. लिटिलवूड यांच्यासमवेत केलेले संशोधनकार्य आणि प्रा. हार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गणितात मांडलेल्या नव्या सूत्रांनी संपूर्ण जगाला स्तिमित केले. रामानुजन यांची प्रतिभा पाहून रॉयल सोसायटीने 28 फेब्रुवारी 1918 रोजी त्यांना सदस्यत्व देऊन सन्मानित केले आणि ट्रिनिटी महाविद्यालयानेही त्यांची फेलो म्हणून निवड केली. ‘हायली कम्पोझिट नंबर’ या शीर्षकांतर्गत केलेल्या संशोधनामुळे त्यांना पीएच. डी. पदवी मिळाली; एवढेच नव्हे तर त्यांच्या संशोधन प्रबंधाचा सारांश ‘जर्नल ऑफ लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

गणिताच्या बाबतीत भारतातील प्रज्ञेचे प्रतिनिधित्व करणार्‍या रामानुजन यांचा उल्लेख आजच्या संदर्भात महत्त्वाचा अशासाठी वाटतो की, एकीकडे जगभरात गणिताच्या उपयुक्ततेचा आवाका वाढतचाललेला असताना भारतात मात्र या विषयासंबंधी फारशी आस्था दिसत नाही.मूळ भारतीय वंशाचे गणितज्ज्ञ मंजुल भारद्वाज यांना गणितातील फिल्ड्स मेडल प्रदान करण्यात आले. गणिताच्या क्षेत्रात फिल्ड्स मेडल हे नोबेलच्या समकक्ष मानले जाते आणि जाणकारांच्या मते, नोबेल मिळविण्यापेक्षा फिल्ड्स मेडल मिळविणे अधिक अवघड आहे. गणिताच्या क्षेत्रातील एकाहून एक श्रेष्ठ भारतीय व्यक्तींची उदाहरणे समोर असतानासुद्धा युवकांमध्ये गणितापासून दूर पळण्याची वृत्ती वाढताना का दिसते? प्रथम या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा जो अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्यातून हीच बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत मुलांमध्ये शिकण्याची प्रक्रिया काहीशी सुधारली असली तरी आठव्या इयत्तेत शिकणार्‍या 56 टक्के विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे जमत नाही.
पाचव्या इयत्तेतील 72 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार आणि तिसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नाही. मुलांना आकलन करण्यातही अडचणी येत आहेत. केवळ 44 टक्के मुलींनाच भागाकार येतो, तर मुलांमध्ये हे प्रमाण 50 टक्के आहे. ही सर्व आकडेवारी देशातील 28 राज्यांच्या 596 जिल्ह्यांमधून जमा करण्यात आली आहे. तीन ते 16 वर्षे वयोगटातील, 3.5 लाख कुटुंबांंमधील 5.5 लाख मुलांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे.

सध्याच्या परिस्थितीत सामान्य बेरजा, वजाबाक्या, गुणाकार करण्यासाठी मुले कॅल्क्युलेटर, संगणक किंवा मोबाइलवर अवलंबून राहात नसली, तरी गणित हा आनंदाचा विषय आहे, असे ती मानत नाहीत. या विषयातील भारतीय प्रतिभा जगाच्या तुलनेत खूप मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शक्यतेशी संबंधित एक वास्तव 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय टेस्ट पीसा म्हणजेच ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टूडंट असे समेन्ट’ या स्पर्धेत भारतीय किशोरवयीन मुलांच्या घसरलेल्या क्रमवारीतून दिसून आले आहे.
या चाचणीच्या निकालाच्या आधारावर 73 देशांची क्रमवारी तयार करण्यात आली होती आणि त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा क्रमांक 71 वा होता.

भारतीय किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे विद्यार्थी चीनमधील विद्यार्थ्यांपेक्षा 200 गुणांनी पिछाडीवर होते. पीसा टेस्टचे आयोजन आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना नावाच्या संस्थेकडून करण्यात येते आणि दोन तासांच्या या चाचणीत जगभरातील सुमारे पाच लाख विद्यार्थी सहभागी होतात. त्यापूर्वी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च या संस्थेतर्फे किशोरवयीन मुलांमध्ये गणित आणि विज्ञानाबद्दल असलेल्या जागरूकतेचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक परीक्षेतही भारतीय विद्यार्थ्यांनी निराशाच केली होती. या चाचणीत 73 देशांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि भारतीय विद्यार्थ्यांची क्रमांक 72 वा आला होता. त्याहीवेळी आपण या समस्येवर उपाययोजना करण्याकडे लक्ष दिले नाही.

आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांना कोण ओळखत नाही? जगाला शून्याचे ज्ञान सर्वप्रथम भारतानेच दिले आहे. चौदाव्या शतकात गणितज्ज्ञ माधव यांनी न्यूटन आणि लायबनिज यांच्या आधीच कॅलक्युलस सिद्धांताचा शोध लावला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभी श्रीनिवास रामानुजन यांनी गणितीय संशोधनाने जगाला स्तिमित केले. आज त्याच देशातील शाळा गणिताच्या अध्ययनात मागे पडत असतील, तर सर्व संबंधित घटकांनी अत्यंत गांभीर्याने चिंतन करावे, असा हा विषय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या