टोळधाडीचे संकट
फिचर्स

टोळधाडीचे संकट

Balvant Gaikwad

पाकिस्तानातून एक टोळधाड सध्या राजस्थानात आली असून हजारो एकरमधील पिके फस्त करीत आहे. ज्या देशांवर अनेक वर्षांमध्ये अशी आक्रमणे झाली नाहीत त्यांना टोळधाडीशी मुकाबला करणे अधिक अवघड जाते, कारण त्याविषयीची माहिती आणि यंत्रणा उपलब्ध नसते.
– नवनाथ वारे

भारतात सुमारे 26 वर्षांनंतर टोळधाड आली असून राजस्थानात या टोळधाडीने अक्षरशः हैदोस घातला आहे. ही टोळधाड पाकिस्तानातील एका मोठ्या क्षेत्रावरील पिके फस्त करून भारतात आली आहे. हे टोळ किंवा नाकतोडे वाळवंटी प्रदेशातील आहेत. राज्य आणि केंद्र सरकारची पथके टोळधाड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सामान्यतः जिथे फार लगबग नसते अशा शांत भागात हा वाळवंटी टोळ आढळून येतो. लाखोंच्या, कोट्यवधींच्या संख्येने जेव्हा ही टोळी येते तेव्हा जमिनीवर अंधार पडतो इतकी यांची संख्या असते. एखाद्या शेतात ही टोळधाड आली तर काही तासांमध्येच संपूर्ण पीक फस्त करून जाते. हिरव्यागार गवताळ मैदानात जेव्हा हे वाळवंटी नाकतोडे प्रचंड संख्येने एकत्रित जमतात तेव्हा ते सर्वसामान्य, शांत भागात राहणारे कीटक राहत नाहीत. अन्य कीटकांप्रमाणे किंवा पतंगांप्रमाणे त्यांचे वर्तन राहत नाही. ते भयानक स्वरूप धारण करतात. त्यांचा रंगही बदलतो आणि त्यांचा मोठा समूह विनाशकारी स्वरूप धारण करतो. ही टोळी एका दिवसाला दोनशे किलोमीटरचा प्रवास उडून पूर्ण करते. आपल्या भुकेसाठी आणि प्रजननासाठी ही टोळी एकाच दिवसात एका मोठ्या क्षेत्रातील पिकांची अपरिमित हानी करू शकते.

गेल्या काही दशकांपासून दिसत असलेली जगातील सर्वात खतरनाक टोळधाड सध्या हॉर्न ऑफ आफ्रिका येथील गवताळ मैदानांमध्ये आणि शेतांमध्ये अक्षरशः धुडगूस घालत आहे. या टोळधाडीमुळे त्या संपूर्ण परिसरात खाद्य संकट निर्माण होऊ शकते. ही टोळधाड सोमालिया आणि इथिओपियामध्ये धूळधाण उडवल्यानंतर केनियातील शेतांमध्ये झंझावाताप्रमाणे घुसली आहे. केनियात हा टोळधाडीचा सत्तर वर्षांमधील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे, तर सोमालिया आणि इथिओपियात हा गेल्या 25 वर्षांमधील सर्वात मोठा हल्ला आहे. सोमालियात या संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आले आहे. पाकिस्ताननेही अशीच घोषणा केली आहे. काही टोळधाडी आगामी काळात युगांडा आणि दक्षिण केनियात पोहोचण्याची शक्यता आहे.

टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही तर आगामी काळात स्थानिक स्वरुपात प्लेगचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाच्या कृषी आणि खाद्य संघटनेने दिला आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत टोळधाडींनी इथिओपिया आणि सोमालियातील 1,75,000 एकरपेक्षा अधिक शेतांचे नुकसान केले होते. कृषी आणि खाद्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही टोळधाड एका दिवसात 350 चौरस किलोमीटर क्षेत्रातील 8 टन अन्नधान्य फस्त करू शकते. संयुक्त राष्ट्र कृषी आणि खाद्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक सामान्य टोळधाड अडीच हजार माणसांचे पोट भरू शकेल एवढे धान्य फस्त करू शकते.

संयुक्त राष्ट्रांच्या मते, 2003 ते 2005 या दोन वर्षांच्या कालावधीत टोळांच्या संख्येत अशीच वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेतील शेतीचे अडीच अब्ज डॉलर्स एवढे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु 1930, 1940 आणि 1950 च्या दशकांमध्येही टोळधाडींच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून आली होती. काही धाडी तर इतक्या खतरनाक असतात की अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या झुंडीलाच प्लेग नाव दिले जाते. संयुक्त राष्ट्र कृषी आणि खाद्य संघटनेच्या मते, वाळवंटी टोळधाडी जगभरातील दहापैकी एका व्यक्तीच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. त्यामुळेच त्यांना जगातील सर्वाधिक खतरनाक कीटकांच्या संवर्गात ठेवले गेले आहे. सध्याच्या संकटाचे मूळ विषम हवामानात आहे, असे मानले जाते.

सध्याच्या संकटाचे कारण 2018-2019 मध्ये आलेली वादळे आणि अतिवृष्टी ही आहेत. वाळवंटी टोळधाडी सामान्यतः दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या दरम्यान असलेल्या 1.6 कोटी चौरस किलोमीटर परिसरात राहणार्‍या आहेत. दक्षिण अरबस्तानात दोन वर्षांपूर्वी दमट हवामान आणि पर्यावरणीय अनुकूलते मुळे टोळांची संख्या झपाट्याने वाढली. टोळांच्या तीन पिढ्या या हवामानावर पोसल्या गेल्या आणि हे कुणाला समजलेही नाही. 2019 च्या सुरुवातीला पहिली टोळधाड येमेन, सौदी अरेबिया या मार्गाने इराण आणि नंतर पूर्व आफ्रिकेत पोहोचली. गेल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत नव्या टोळधाडी निर्माण झाल्या आणि केनिया, जीबूती आणि इरिट्रियापर्यंत पोहोचल्या.

ज्या देशांवर अनेक वर्षे टोळधाडींचे आक्रमण झालेले नसते अशा देशांसाठी टोळधाडीशी संघर्ष करणे फारच जिकिरीचे असते. कारण टोळधाडींविषयी सामान्यज्ञान आणि त्यांच्या मुकाबल्यासाठी पायाभूत संरचना अशा देशांमध्ये तयार नसते. त्यामुळे संकटाची तीव्रता कितीतरी पटींनी वाढते. तसे आता झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com