खान्देशातील कानबाई आणि रोटोत्सव काळाची गरज

देवतांना पूजनातून संकटांपासून दूर ठेवा, अशी आराधना केली जायची. आजच्या विज्ञान युगातही काहीशी तशीच वेळ येऊन ठेपली आहे. समस्त मानव कोरोनाच्या हाहाकाराने त्रस्त झाला आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि सुरक्षित अंतर हा जगण्याचा मंत्र झालाय. हाच विचार पेरणारा कानबाई उत्सव म्हणून कालसमर्पक वाटला तर नवल वाटायला नको. कानबाईच्या रोटांसाठी बाहेरगावी गेलेले घरी परत येतात. आज लॉकडाऊनमुळे सारे घरातच आहेत. त्यामुळे कानबाई - रोटोत्सव संस्मरणीय होणार आहे.
खान्देशातील कानबाई आणि रोटोत्सव काळाची गरज

पूर्वीच्या काळी पावसाळा सुरु होण्यापूर्वी रोगराई, साथीचे आजार यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवादिकांची पूजा, यात्रा, उत्सव केले जायचे. त्यातून घरादाराची, अंगण, परिसराची, भांडीकुंडीची स्वच्छता केली जायची. देवतांना पूजनातून संकटांपासून दूर ठेवा, अशी आराधना केली जायची. आजच्या विज्ञान युगातही काहीशी तशीच वेळ येऊन ठेपली आहे. समस्त मानव कोरोनाच्या हाहाःकाराने त्रस्त झाला आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि सुरक्षित अंतर हा जगण्याचा मंत्र झालाय. हाच विचार पेरणारा कानबाई उत्सव म्हणून कालसमर्पक वाटला तर नवल वाटायला नको. कानबाईच्या रोटांसाठी बाहेरगावी गेलेले घरी परत येतात. आज लॉकडाऊनमुळे सारे घरातच आहेत. त्यामुळे कानबाई-रोटोत्सव संस्मरणीय होणार आहे.

खान्देश हा लोकोत्सव, लोकगीते आणि लोक देवतांसाठी प्रसिद्ध आहे. लोकोत्सव साजरा करताना स्वतःला, परिवाराला व समाजाला आनंद मिळावा, ही एकमेव अपेक्षा असते. श्रावण महिन्यात खान्देशात सण व्रत उत्सवांची रेलचेल असते. नागपंचमी, शीतला सप्तमी, वरदलक्ष्मी व्रत, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, कानबाईचे रोट या सणांमधून खान्देशच्या लोकसंस्कृतीचे जतन आणि वहन सातत्याने होत आहे.

कानबाईचे रोट पूर्व आणि पश्चिम खान्देशात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. रोट हे भाकरीचे प्रतीक असून त्यांची पूजा म्हणजे अन्नाची अर्थात पूर्णब्रह्माची पूजा, असा समज आहे. कानबाईच्या उत्सवात घराघरात कानबाईची स्थापना केली जाते. ज्यांना शक्य नाही, ते जिथे कानबाईची स्थापना झालेली असते. त्या घरी जाऊन पूजा-अर्चा करतात. कानबाई हे पार्वतीचे रूप आहे. काही ठिकाणी तिला सूर्यपत्नी किंवा विठ्ठलपत्नी रुक्मिणी ही मानतात.

कानबाई ही नवसाला पावणारी लोकदेवता असल्याने सर्वसामान्य, कष्टाने गांजलेले तिची मनोभावे आळवणी करतात. तिला नवस बोलतात. तिची उत्सुकतेने वाट पाहतात. कानबाईशी खान्देशातील स्त्रिया मैत्रिणीसारख्या संवाद साधतात. त्यासाठी लोकगीतांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

कानबाई माय

तुना करसु व रोट,

खपी चालनी हयाती

पिकू दे मन पोट.

आज कानबाई ना येवा

पाच शेरना रोट करू

घर सारी सुरी घरमां

डिकरा खोकरा जेवाडू

या लोकगीतातून कानबाईचे महत्व स्पष्ट होते. पोट पिकू दे, म्हणजे पोटी मूलबाळ होऊ दे. यासाठी तुझे रोट करीन असं म्हणते. ही ग्रामीण स्त्री कानबाई येणार म्हणून तिचं पावित्र्य जपण्यासाठी, घर सारून गोमूत्राने पवित्र करून घेण्याचं सूचित करते. पाच शेरचे रोट केले म्हणजे ते खाणार कोण ? यासाठी डिकरा खोकरा (पुतणे) म्हणजे भावकीतली जवळची माणसं जेवणासाठी बोलवण्याचा ती संकल्प करते. हे सारं करत असताना कानबाईला अवघा संसार सुखी कर असं मागणं मागताना ती म्हणते.

करमाय मनावर उपकार,

कानबाई सुखी कर संसार.

रोटांच्या निमित्ताने घरातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे शेर दोन शेर गव्हाची निवड होते. त्यात पाळीव जनावरांचा हिस्सा, कानबाई, रानबाई, कन्हेर यांच्या नावाने पाच-पाच मूठ गहू वाढविला जातो. प्राणी, वनस्पतीही घरातील सदस्यच आहेत, हा यातला भाव. या पिठातून साधे रोट, मोठे रोड रांधले जातात.

श्रावणात नागपंचमीनंतर येणार्‍या पहिल्याच शनिवारी साधे रोट व रविवारी मोठे रोट करतात. साध्या रोटाला पोळ्या, किल्लूची भाजी असा बेत असतो. मोठ्या रोटाला पुरणपोळी, खीर, आमटी, उसळ असा प्रकार करतात. हे जेवण फक्त घरातील सदस्यच खाऊ शकतात. लग्न झालेल्या लेकीला ते खाता येत नाहीत. पूजेच्या ठिकाणी नारळाला कानबाई म्हणून चौरंगावर स्थापन करतात. हे नारळ पूजेसाठी खास तिरतवरून (तीर्थावरुन) आणलेले असते. घरांमध्ये कागदावर काढलेल्या सप्त्या, जिवतीची पूजा करतात.

या विधीचे अन्न सात दिवसात संपवायचे असते. म्हणून सप्त्या असावा. याप्रसंगी आघडला, किल्लू, दुर्वा या वनस्पतींना महत्त्वाचे स्थान असते. घरातील आबालवृद्ध एकत्र बसून पूजेचा व भोजनाचा आनंद घेतात.

कानबाई हा तसा महिलावर्गाचा आवडता सण. घरातील महिला, नववधू कानबाईची पूजा मांडतात. मुली आनंदाने झिम्मा फुगडी खेळतात. गाणी म्हणतात. भाजी-भाकरीने सुरु होणारा सण पुरणपोळीचा अस्वाद देऊन सोमवारी संपतो. या दिवशी कानबाई सार्‍यांचा निरोप घेते. घरातील गावातील मंडळी कानबाईला वाजत गाजत विसर्जनाला नेतात. सुख-दुःखात समतल राहण्याचा मंत्र देत कानबाई सार्‍यांचा निरोप घेते.

कानबाईनिमित्ताने घरात तीन किंवा पाच दिवस उत्सव असतो. यानिमित्ताने घर, परिसराची स्वच्छता होते. देव्हारा, कोनाडे, कपडे, अंथरूण-पांघरूण यांची साफसफाई, स्वच्छता होते. उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या स्वच्छतेने घरातील रोगराई पळून जाते. या सण - उत्सवामागे विज्ञानच दडलेलं दिसते. कानबाईला निरोप देताना महिला तिच्या शृंगाराचे, अलंकाराचे, मोठेपणाचं कौतुक पुढील गीतातून करतात.

कानबाई चालनी, गंगेवरी व माय

साखर पेरत, चालनी व माय

कानबाई बसनी चौरंगवरी व माय

हिरवी पैठणी नेसली व माय

हिरव्या बांगड्या हाती व माय

चैन सोन्याची शोभते व माय

कानबाई चालनी, गंगे वरी व माय

लखलख मोत्याचा हार

पायी पैंजण छन-छन वाजती

कुंकू कपाळी चमकी व माय

कानबाई चालनी गंगेवरी व माय

माय चालनी पूरब दिशाले

सूर्यनारायण स्वागते

अंगण सडा सारवण

गल्ली रांगोळ्या सजती व माय

कानबाई चालनी गंगे वरी व माय

तुनी छत्रछाया राहू हे

सर्वी आबादानी होऊ दे

तूनी पायनी धूळ कपाये व माय

कानबाई चालनी गंगेवरी व माय

कानबाईच्या गीतांना लोकगीतांची लय असल्याने गीत गाणार्‍यांना नाचताना ठेका धरता येतो.

कानबाई माता व

तारं दारन उघड

तारा दारसे सारा सुतारं बेजार

सुतार भाऊ रे सारा चौरंग लईआव

माता जमुना मजार

उजवी हाते व माते अंबेला तलवार

चारी हाते व मोत्या नारळनी धूळ

चंदन घासून अबीर गुलाल

कानबाई बोयाडे जासू

तापीना पहिलाड

या गीतातून कानबाईसाठी सुतार, शिंपी, सोनार, कासार हे चौरंग, साड्या, दागिने, कंकण आणण्यासाठी कशी धडपड करतात, याचं चित्रण केलं आहे. चंदनाचा सुवासात, गुलाल उधळण करत तापीच्या पहिल्या तीरावर कानबाईला निरोप देऊ, असं म्हणत महिला गीतं गातात.

श्रावणाच्या रूपाने सृष्टी नटायला सुरुवात झालेली असते. शेतात पिकं डोलू लागतात. पिकांचे डोलणं समृद्धीचे प्रतीक. या प्रतीकांची कानबाईच्या गाण्यात जागोजागी मुक्त पेरणी केलेली असते. कानबाईचे रुप, तिचा साज-शृंगार तिची ओढ तिला द्यावा लागणारा निरोप या सार्‍याचं भावपूर्ण वर्णन गीतातून गातांना महिला भाऊक होतात.

विज्ञान युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. यानिमित्ताने तो पुन्हा एकमेकांच्या जवळ यावा, नात्यांची वृद्धी व्हावी, हा या सणामागील उद्देश. मोठ्या कुटुंबाची शकले होऊन छोटी छोटी घरं होत असताना, अशा वातावरणात या सणांमुळे आजी-आजोबा व नातवंडे, काका-काकू, सासू-सून लेकीबाळी एकत्र आलेत, त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाची एक लकेर उमटली, तरी ती अनमोल आहे. म्हणून, हा वारसा जपायला हवा व पुढच्या पिढीकडे तो आस्थेने द्यायला हवा !

प्रा.बी.एन.चौधरी ,9423492593

देवरुप, नेताजी रोड. धरणगाव, जि. जळगाव.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com