अदृश्य पुरावे : वेड पांघरून…!
फिचर्स

अदृश्य पुरावे : वेड पांघरून…!

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये बर्‍याचदा आरोपी बचावासाठी स्वत:ला मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करतात. अशा किचकट प्रकरणांमध्ये मनोचिकित्सकाची भूमिका महत्त्वाची ठरते. गुन्हेगाराच्या खर्‍या-खोट्याची शहानिशा करणे हे न्यायवैद्यक मनोचिकित्सकाचे (फॉरेन्सिक सायकियाट्रिस्ट) काम असते.

परेश चिटणीस 9225111320

25 जानेवारी 2012. एसटीचालक संतोष माने त्यादिवशी सकाळी पुण्यातील स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेऊन रस्त्यावर भरधाव वेगात निघाला. भर रस्त्यात बेफामपणे जाणार्‍या त्या बसखाली 9 निष्पाप नागरिक चिरडले गेले आणि साधारण 30 जण जखमी झाले. हे प्रकरण शिवाजीनगर कोर्टात जवळ जवळ एक वर्ष चालले. यात बचावासाठी मानेच्या वकिलाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की तो एक मनोरुग्ण होता. घटना घडली त्यावेळी तो वेडाच्या भरात होता. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्याला या अतिहिंसक कृत्यासाठी जबाबदार धरले जाऊ नये. परंतु हायकोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे सुप्रीम कोर्टात त्याची फाशी रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.
पकडला गेल्यावर जवळपास प्रत्येक गुन्हेगार हा स्वतःच्या बचावासाठी ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेतो. जर असे नसते तर पोलिसांचे काम फारच सोपे झाले असते. अनेकदा गुन्हेगार खोट्या घटना बनवतो किंवा त्याला वाचवण्यासाठी वेगळाच निर्दोष माणूस गुन्ह्याची कबुली देऊन टाकतो. काही मोठ्या गुन्ह्यांमध्ये, जास्त करून खून प्रकरणांमध्ये हे खुनी कोर्टात स्वतःला वेडे वा मनोरुग्ण ठरवून घेऊन शिक्षेपासून वाचायचा प्रयत्न करतात आणि त्यात अनेक जण सफलही होतात.

अशा किचकट प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका ठरते ती मनोचिकित्सकाची. फॉरेन्सिक सायकियाट्रिस्टसचे काम गुन्हेगाराच्या खर्‍या-खोट्याची शहानिशा करणे हे असते. आरोपीच्या डोळ्यांच्या हालचाली, चेहर्‍यावरचे हावभाव, हातवारे, त्यांच्या बोलण्याचा सूर या लहान लहान गोष्टींमधील बारकावे लक्षात घेऊन त्यांना निदान करावे लागते. एखादा खुनी उत्तम अभिनय करून मनोचिकित्सकाच्याही डोळ्यात धूळ फेकू शकतो. अनुभवी पोलीस, मनोचिकित्सक हे अशा नाटकी गुन्हेगारांच्या कहाण्यांच्या आरपार बघू शकतात व त्यांचे खोटे पकडू शकतात. एकाधिक व्यक्तिमत्त्व विकार (मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) हा एक असाच प्रकार. एक मनोविकार.

1970 मध्ये लॉस एंजेलिस येथे बलात्कार व खून यांची मालिका सुरू झाली होती. डोंगराळ भागात उघड्यावर मुलींचे मृतदेह टाकलेले सापडत होते. यावरून त्या अज्ञात खुन्यांना ‘हिलसाईड स्ट्रॅग्नलर्स’ असे नाव दिले गेले. खूप काळानंतर मोठ्या मुश्किलीने अँजेलो आणि केनेथ या दोघांना अटक करण्यात आली. पण मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या केनेथने कोर्टात सांगितले की, तो मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा रुग्ण आहे आणि स्टिव्ह नावाचे त्याचे दुसरे व्यक्तिमत्त्व त्याच्या नकळत हे खून करून घेत आहे. केनेथचा अभिनय इतका उत्कृष्ट होता की त्याने अनेक मनोचिकित्सकांना वेड्यात काढले. शेवटी डॉक्टर मार्टिन ऑर्न या संमोहन शास्त्रातील विशेषज्ञानी त्याची तपासणी केली. त्यांनी संमोहनाखाली नेऊन स्टीव्हला बाहेर आणले.

या प्रकारात केनेथने खूप चुका केल्या. पहिली चूक म्हणजे स्टीव्ह हा स्वतःला ‘मी’ न म्हणता ‘तो’ असे संबोधू लागला. दुसरी चूक जेव्हा ऑर्न यांनी केनेथला सांगितले की या विकारात केवळ एकच अन्य व्यक्तिमत्त्व असणे खूप विचित्र आहे तेव्हा लगेचच ‘बिली’ नावाचा तिसरा व्यक्ती अस्तित्वात आला. यावरून त्याच्या नाटकाचा शेवट झाला व त्याने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली.

कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी अशा खटल्यांमध्ये आरोपी आणि साक्षीदार या दोघांचीही मानसिक स्थिती योग्य असेल तरच त्यांची विधाने ग्राह्य धरली जातात. याची सुरुवात आरोपीची मानसिक स्थिती त्याच्यावरचे आरोप, त्याचे होणारे परिणाम आणि कोर्टाचे कामकाज समजून घेण्याइतकी स्थिर आहे की नाही हे तपासून होते. जर आरोपी या गोष्टी समजू शकत नसेल तर त्याच्यावर खटला चालवताच
येत नाही.

अशावेळी फॉरेन्सिक सायकियाट्रिस्टसना सदर आरोपीच्या मानसिक स्थितीबद्दल मत सांगण्यासाठी कोर्टात साक्ष देण्यासाठी बोलावले जाते. तसेच एखाद्या साक्षीदाराची साक्ष आरोपीचा वकील त्याला मनोरुग्ण ठरवून अवैध ठरवू शकतो. यामुळेच मनोचिकित्सकाचा अनुभव अशा साक्षीच्या वेळी खूप महत्त्वाचा ठरतो.

Deshdoot
www.deshdoot.com