हर्षवर्धनचे लक्ष्य : ऑलिम्पिक 2024
फिचर्स

हर्षवर्धनचे लक्ष्य : ऑलिम्पिक 2024

Balvant Gaikwad

हर्षवर्धन सदगीर आता महाराष्ट्र केसरी खेळणार नाही, असे त्याचे गुरू काकासाहेब पवार यांनी जाहीर केले आहे. त्याच्याकडून आता राष्ट्रीय स्पर्धांची आणि ऑलिम्पिकची तयारी करून घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. हे स्वप्न त्यांचे असले तरी ते त्यांचे एकट्याचे नाही. ते देशाचे स्वप्न झाले पाहिजे. शासन, संघटना आणि मोठमोठ्या उद्योपतींनी हर्षवर्धनच्या मागे उभे राहिले पाहिजे. सामूहिक प्रयत्नांच्या पाठबळावरच स्वप्नपूर्ती शक्य आहे.

राजेंद्र पाटील 

पुण्यामध्ये  नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेमध्ये मूळचा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा आणि आता नाशिकचा रहिवासी असलेल्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेचा पराभव करत मानाची चांदीची गदा पटकावली. नाशिक जिल्ह्याला त्याने प्रथमच महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला आहे. हर्षवर्धन आता पुन्हा ‘महाराष्ट्र केसरी’ खेळणार नाही. राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आणि ऑलिम्पिक 2024 च्या दृष्टीने त्याची तयारी करून घेतली जाईल, असे त्याचे गुरू अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी जाहीर केले आहे. केवळ महाराष्ट्र केसरी होऊन पुढे काहीच न केलेल्या मल्लांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. बेताची कौटुंबिक परिस्थिती असणार्‍या अनेक ‘महाराष्ट्र केसरीं’च्या जीवनाची दुरवस्था महाराष्ट्राने अनुभवली आहे. आपल्या महाराष्ट्र केसरींचे तसे होऊ नये यासाठी काकासाहेब पवारांनी घेतलेला हा निर्णय खरोखर कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. परंतु त्यासाठी कुस्तीगीर परिषदेसारख्या संघटना, शासन तसेच उद्योगपती यांच्या एकत्रित मदतीची आणि मराठी मल्लांनी आपले ध्येय निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

काकासाहेब पवार हे हरिश्चंद्र बिराजदार यांचे शिष्य. त्यांच्या तालमीने महाराष्ट्राच्या मातीतून आंतरराष्ट्रीय मल्ल घडवण्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे, घेतली जात आहे. जागतिक कांस्य, राष्ट्रकुल सुवर्णपदक, एशियन चॅम्पियनशिप, वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदके, इतर मानाच्या स्पर्धेत पदके मिळवून नऊ वर्षांत त्यांच्या तालमीने मोठे नाव कमावले आहे. पण गेली पाच वर्षे महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी त्यांची झुंज अधुरी राहत होती. कधी पंचांचे निर्णय चुकले असे म्हटले जायचे तर कधी खेळाडूंकडून स्पर्धेवर बहिष्कार टाकला जायचा. यंदाच्या वर्षी या तणावाला अखेर माती चारली गेली आहे.

आता महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा मराठी मल्ल देशाला देण्याची जबाबदारीही या तालमीच्या खांद्यावर येऊन पडली आहे. अर्थात, महाराष्ट्रातील सर्वच तालमींकडून ही अपेक्षा असली तरीही हरिश्चंद्र बिराजदार आयुष्यभर जे ध्येय मराठी मल्लांना देत आले ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आणि ऑलिम्पिकच्या पदकाचेच होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या शिष्यांवर गुरूचे स्वप्न साकारण्याची अधिक जबाबदारी आली आहे.

नवा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्यासह उपमहाराष्ट्र केसरी शैलेशकडूनही महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत. आंतराराष्ट्रीय यशासाठी हर्षवर्धनला मॅटचा मोठा अनुभव आहे. दोन सुवर्णपदकांच्या कमाईसह ग्रीको रोमन कुस्तीवरचे प्रभुत्व ही त्याची जमेची बाजू आहे. शैलेश कॅडेट गटातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. ज्युनियर  राष्ट्रीय सुवर्णपदक, गतवर्षीचा ग्रीको रोमनचा विजेता आणि काही क्षणांमध्ये कुस्ती फिरवण्याची क्षमता, सकारात्मक कुस्ती हे दोघांचे वैशिष्ट्य आहे. काकांच्या संकुलातले दोनशे मल्ल विविध स्पर्धांमध्ये चमकत आहेत. प्रत्येक वर्षी खुल्या गटात सहा ते सात खेळाडू त्यांचे असतात. यावेळच्या स्पर्धांमध्ये खेळलेल्या त्यांच्या 40 खेळाडूंपैकी 22 जणांनी पदके पटकावली आहेत. वजन गटात दहा सुवर्ण, सात रौप्य आणि पाच कांस्यपदकांसह महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरीही एकाच तालमीचा आहे. काकांनी आपली जिद्द खरी करून दाखवल्याचेच हे प्रतीक आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य कुटुंबातील मुले कुस्तीत जिद्द पणाला लावत आहेत. त्यांच्या बरोबरच त्यांच्या पालकांची जिद्दही कौतुकास्पद आहे. आताही ऑलिम्पिक पदकाचे ध्येय साध्य करण्यासाठी पालकांची साथ आवश्यकच आहे. सर्वांच्या पाठबळावर आता ऑलिम्पिकच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यादृष्टीने वाटचाल करणे महत्त्वाचे आहे.

काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिक म्हणजे दर चार वर्षांनी होणारी स्पर्धा एवढेच त्याचे महत्त्व होते. त्यामुळे एखादे पदक मिळाले की आपण सुटकेचा नि:श्वास टाकत असू. आता ही परिस्थिती काही प्रमाणात बदलली असली तरी अजून खूप काही बदलायचे आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे यावर अल्पसंतुष्ट न राहता किंवा केवळ अनुभव म्हणून या स्पर्धेत भाग न घेता त्यात पदक जिंकून देशाची ताकद दाखवणे हे आपले ध्येय असलेे पाहिजे. ही जबाबदारी एकट्या सरकारची नाही.  मुख्य म्हणजे ही जबाबदारी ज्यांची आहे त्या क्रीडा संघटनांनी खेळाडूंसाठी ताकद लावणे गरजेचे आहे. आज आपण पाहतो नामांकित खेळाडूंना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होतात, त्यांनी एखादे पदक जिंकले, विजेतेपद पटकावले की त्यांच्यावर लाखो-करोडोंच्या बक्षिसांची बरसात होते. गाड्या, नोकर्‍या, घर पदरात पडते. पण अशा सगळ्या गोष्टी उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या संघर्षाच्या काळात मिळत नाहीत. त्यामुळे अनेक खेळाडू ऐन उमेदीत खेळाला पाठ दाखवतात आणि देश अनेक गुणवत्तापूर्ण खेळाडूंना मुकतो. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची वेळ आली तर त्या खेळाडूला पदरमोड करून स्पर्धेला जावे लागते. पैसा खर्च करण्याची तयारी नसेल तर हळूहळू तो खेळाडू खेळाला दुरावतो. स्पर्धेला रेल्वेने जायचे तर त्यांचेे बुकिंग निश्चित नसते. खेळाडू कधी दरवाजात, कधी स्वच्छतागृहाशेजारी बसून प्रवास करतात. त्यातूनही आपण त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा करतो. स्पर्धा स्थळीही त्यांच्या निवासाची, खानपानाची व्यवस्था बर्‍याच वेळेला अत्यंत दयनिय असते. कुठल्यातरी मोडकळीस आलेल्या शाळेत, अस्वच्छ परिसरात त्यांना राहावे लागते. खाण्यापिण्याची व्यवस्थाही अगदी अपुरी असते. अशा तक्रारी अनेकदा करण्यात आल्या आहेत. तरीही हे खेळाडू खेळतात. देशाला पदक मिळवून देतात.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी गेला असताना तेथील नेमबाजी रेंजचे फोटो त्याने आईला पाठवले आणि अगदी तशीच रेंज त्याच्या घरी तयार करण्यात आली. अभिनवला ते शक्य झाले, पण इतरांचे काय? महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनची आई शेती करते आणि वडील प्रयोगशाळा सहायकाची नोकरी करतात. तीच स्थिती लातूरच्या शैलेशचीही आहे. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर विजेता मल्ल वर्षभर राज्यात फिरतो तेव्हा त्याचे स्वागत, कौतुक होते. वर्ष सरले की दुसरा महाराष्ट्र केसरी होतो. अगोदरच्या ‘महाराष्ट्र केसरी’चा लोकांना विसर पडतो. वर्षभराच्या काळात त्याला जे काही पैसे मिळाले असतात त्यावर तो समाधान मानतो. कालांतराने लग्न झाल्यानंतर मात्र त्याची व कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याची आणि महाराष्ट्र केसरीसारखे अनेक मल्ल व्यसनांच्या मार्गावर गेल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. एकदा महाराष्ट्र केसरी झाला तरी पुन्हा या स्पर्धेत उतरणारेही मल्ल आहेत. परंतु पुन्हा महाराष्ट्र केसरी होऊन आणि तीच गदा मिळवून फारसे वेगळे काही साध्य होणार नाही. त्यामुळेच हर्षवर्धन आता पुन्हा महाराष्ट्र केसरी खेळणार नाही. त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आणि ऑलिम्पिकसाठी तयारी करून घेऊ, असे काका पवार सांगतात. महाराष्ट्राच्या तुलनेने अत्यंत लहान असलेल्या हरियाना राज्यातील मल्ल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मैदान गाजवतात मग महाराष्ट्राला हे का शक्य होत नाही, असा प्रश्न शौकिनांना पडणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील कुस्ती ही प्रामुख्याने मातीवर ओळखली जाते. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी मॅटवरील कुस्ती आवश्यक असणार आहे. मॅटवरील कुस्तीसाठी उद्योगपती, सरकार, कुस्तीगीर परिषद आणि सर्व मल्लांनी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कुस्ती केंद्राचे काका पवार यांनी व्यक्त केली आहे.

हरियानातील उद्योगपती पुढे आल्याने त्या राज्यातील मल्ल चांगली कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योगपती आणि शासन आणि त्याचबरोबर कुस्तीगीर संघटनेने याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवरील संघटनांनीही व्यावसायिकपणा दाखवून आपण ज्यांची निवड करू त्यालाच पाठवले जाईल, असा ठामपणा दाखवायला हवा. राजकारणामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे, होत असते.  भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कारभारातील सुधारणांसाठी न्यायाधीश लोढा यांच्या समितीच्या शिफारशी स्वीकारणे जसे अनिवार्य बनले आहे तसेच या संघटनांनाही त्या स्वीकारणे सक्तीचे करायला हवे. ही घडी खूपच विस्कळीत झाली आहे. ती व्यवस्थित बसायला हवी. ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा यात यश मिळवण्यासाठी सगळी यंत्रणाही सुरळीत व्हायला हवी. तरच ऑलिम्पिक 2024 चे लक्ष्य साध्य करणे मराठी मल्लांना शक्य होईल.

Deshdoot
www.deshdoot.com