सदृढ भारतासाठी…!
फिचर्स

सदृढ भारतासाठी…!

Balvant Gaikwad

मनुष्यबळाचे आरोग्यच चांगले नसेल तर कोणतेही अपेक्षित परिणाम साधता येणे शक्य नाही. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ नावाची संकल्पना मांडली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे.

 डॉ. संजय गायकवाड

तप्रधानांनी ‘फिट इंडिया स्कूल’ प्रकल्प जाहीर केला आहे. मुले आणि शिक्षक यांनी मिळून शाळेत प्रार्थनेपूर्वी 40 मिनिटांपर्यंत एकत्र क्रीडा प्रकार, योग आदी शारीरिक व्यायाम तंदुरुस्तीसाठी करावे, असे ठरवण्यात आले आहे. खेळ, योगाभ्यास याऐवजी अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, हीच समाज धारणा आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूलाही एखाद्याला अभ्यासाऐवजी खेळात रुची असेल तर त्याच्या पालकांच्या कपाळावर चिंतेचे जाळे पसरलेले दिसते. पालकांना सतत भीती वाटते की आपले मूल खेळात रमले तर तो अभ्यास करणार नाही. शाळेतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. शिक्षकही मुलांना खेळण्यावरून रागावतात. दिवसभर खेळलात तर अभ्यास कधी करणार, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

खेळाकडे, योगाभ्यासाकडे पाहण्याची दृष्टी तेव्हाच बदलेल जेव्हा खेळांमध्ये रोजगाराची निर्मिती होईल. खेळ आणि रोजगार हे दोन्ही एकत्र असल्यास लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. खेळाशी निगडीत रोजगार मिळाले तर पालकांच्या मनातही आपल्या मुलाच्या भविष्याशी निगडीत काही चिंता राहणार नाहीत. रोजगाराची, उज्ज्वल भवितव्याची काळजी याच कारणामुळे देशात खेळ आणि योग यांच्याविषयीचा उत्साह कमी दिसतो. मात्र फिट इंडिया कार्यक्रमानिमित्त या वातावरणामध्ये अनुकूल बदल करता येऊ शकतात.

सरकारच्या फिट इंडिया योजनेची सुरुवात शाळांपासून केली जात आहे, ही चांगली बाब आहे. क्रीडा प्रकार आणि योग यांच्या मदतीने मुले आणि शिक्षक दोघांचीही तंदुरुस्ती राखता येईल. अर्थात, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक शाळेमध्ये खेळाचे आणि योगाचे साहित्य, संसाधने उपलब्ध असतील. खासगी शाळा वगळता सरकारी शाळांमध्ये या संसाधनांची कमतरता जाणवते. अनेक विद्यालयांना मैदानेदेखील नसल्याने खेळणार कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तर विद्यालयात मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना विविध क्रीडा प्रकार, योग आणि इतर शारीरिक कवायतींमध्ये सहभागी करून घेता येईल.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते योगाभ्यास केल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचा तणाव दूर होईलच परंतु मन आणि मेंदू शांत राहण्यास मदत होईल. योगाचार्यांच्या मते योगाभ्यासाच्या मदतीने मेंदू आणि शरीर यांच्या एकतेचा समन्वय साधता येतो. योग संयमामुळे विचार आणि व्यवहार, वर्तणुकीला शिस्त लागते.
योगाभ्यासाचे एक वैशिष्ट असे की, व्यक्ती तरुण असो की ज्येष्ठ, तंदुरूस्त असो की कमजोर प्रत्येकासाठी योगाभ्यास फायदेशीरच आहे. योगाभ्यास नियमितपणे केल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्वचा चमकदार होते, शरीर निरोगी, तंदुरूस्त आणि बलवान होते. तसेच एकूणच शारीरिक, मानसिक, बौद्धिक शांतता लाभते.

योग ही शास्त्रीय आणि प्रामाणिक पद्धत आहे. त्यामुळे योगाभ्यासासाठी खूप साधनांची आवश्यकता नसते शिवाय अत्याधिक पैसेही खर्च करावे लागत नाहीत. त्याव्यतिरिक्त आधुनिक युगामध्येही योगाला पसंती दिली जाते याचे कारणच आहे की लोकांचे आयुष्य अधिकाधिक व्यग्र आणि घाईगडबडीचे झाले आहे. रसायनयुक्त औषधांमुळे शरीरात अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. परंतु योगाभ्यास केल्यास शरीरावर होणार्‍या प्रतिकूल परिणामांपासून बचाव करता येतो. एक चांगली गोष्ट अशी की, युनेस्कोने आपल्या प्रतिष्ठित अमूर्त सांस्कृतिक परंपरेच्या यादीत योगाभ्यास सामील केला आहे. योग हा कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. योग हा धर्म, विश्वास, आणि अंधविश्वास या सर्वांपलीकडे एक सर्वसाधारण प्रायोगिक विज्ञान असल्याचे मानले जाते.

योग हा आयुष्य चांगले, तंदुरूस्त आणि निरोगी कसे ठेवावे याची कला शिकवतो. आता या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन झाल्याने ही एक संपूर्ण उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच फिट इंडिया हा कार्यक्रम सर्वच शाळांमध्ये सुरू केला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही निरोगी राहू शकतात. थोडक्यात सरकारच्या फिट इंडियामुळे विद्यार्थीदशेतच मुलांना व्यायामाचे महत्त्व पटू शकते, त्यांना नियमित व्यायामाची, खेळाची सवय लागण्यासही मदत होईल. सध्या मानसिक आरोग्य हादेखील महत्त्वाचा पैलू असल्याने शाळकरी वयातील मुलांना योगामुळे मानसिक संतुलन राखणे कळेल आणि भविष्यातही नैराश्यातून होणार्‍या घटना काही प्रमाणात थांबवू शकतो. एकूणच योग आणि खेळ हे मुलांना स्पर्धेच्या युगात अधिक सक्षम होण्यास मदत करतील.

Deshdoot
www.deshdoot.com