अर्थव्यवस्थेलाच ‘करोना’ची लागण
फिचर्स

अर्थव्यवस्थेलाच ‘करोना’ची लागण

Balvant Gaikwad

देशात आलेल्या साथीचा विकार अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो का, असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. पण या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेच आहे. स्वाईन फ्लूसह अनेक विकारांनी ते दाखवून दिले आहे. भारतात बर्ड फ्लूने कुक्कुटपालन व्यवसायच मोडीत निघाला होता. हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आता चीनमध्ये अगोदर करोना व्हायरस आणि आता बर्ड फ्लू अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करत आहेत.

 कर्नल (निवृत्त) अनिल आठल्ये

सध्या जगात मंदीची स्थिती आहे. जागतिक विकासदराबाबत अजूनही संभ्रम आहे. कधी काळी सातत्याने दोन आकडी विकासदर गाठणारा चीनही काही वर्षांपासून सहा ते सात टक्क्यांच्या दरम्यान विकासदर नोंदवत आहे. वस्तूंची उलाढाल वाढावी, म्हणून चलनाचा दर घटवण्यासह अनेक उपाय चीनने केले आहेत. त्यातच आता तिथे करोना विषाणूंनी हाहाकार माजवला आहे. करोना व्हायरस आणि बर्ड फ्लूमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चीनपुढे आहे.

करोना व्हायरस आता अनेक देशांमध्ये पाय पसरत आहे. या विषाणूंची लागण झालेल्यांचे मृत्यू होत आहेत. करोनाचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम होऊ शकतो, याबाबत निश्चित आकडा समोर आला नाही; परंतु या विषाणूमुळे चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर संकटात सापडू शकते आणि आता जग एक झाले आहे. ग्रीससारख्या छोट्या देशांमधल्या आर्थिक संकटाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतो तसा चीनच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा फटका जागतिक अर्थव्यस्थेला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या जगभरातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देईल इतकी मजबूत किंबहुना, जगात पहिल्या क्रमांकावर जाण्याची क्षमता असलेली अर्थव्यवस्था म्हणून चीनकडे पाहिले जाते. त्यामुळे करोना विषाणूच्या परिणामांमुळे चिनी अर्थव्यवस्था अपेक्षित विकासदर गाठू न शकल्यास त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन मंदीसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. भारत अगोदरपासूनच आर्थिक मंदीसदृश्य स्थितीचा सामना करत आहे.

भारताची अर्थव्यवस्थाही विकसनशील म्हणून ओळखली जातो. त्यामुळे एकाच वेळी चीन आणि भारत अशा दोन महाकाय देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये समस्या निर्माण होणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरू शकते. अशा प्रकारच्या आपत्तींचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याची उदाहरणे या आधीही घडली आहेत. 2002-2003 मध्ये चीनमध्ये सार्सने भयंकर आव्हान निर्माण केले होते. त्याचा चिनी अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला होता. एका अहवालानुसार सार्समुळे चीनचा विकासदर सुमारे अडीच टक्क्यांनी घसरला होता. करोना विषाणू सार्सइतकाच महाभयानक ठरला तर चीन पुन्हा एकदा आर्थिक गर्तेत सापडू शकतो.

करोना व्हायरसचा चिनी शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. चीनच्या शेंजेन आणि शांघाय स्टॉक मार्केटमध्ये 3.52 आणि 2.75 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. करोना व्हायरस
मुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्यामुळे सरकारने नववर्षाची सुट्टी आणखी काही दिवस वाढवली. जपानमधल्या कारनिर्मिती करणार्‍या टोयोटा कंपनीने चीनमध्ये सद्यस्थितीत असणारे सर्व प्रकल्प काही काळ बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. करोना विषाणूच्या धास्तीने कंपनीने ही घोषणा केली आहे.

चीनमध्ये असलेल्या जपानी, कोरियन तसेच अन्य अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. अमेरिकेसह जगभरच्या विमान कंपन्यांनी चीनमधली उड्डाणे रद्द केली आहेत. चीनमध्ये पर्यटनाला जाण्याचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आले आहे. वुहानसारख्या शहराची आणि त्या भागाची ओळख वैद्यकीय शिक्षणाचे हब म्हणून आहे. त्याच भागात आता करोना व्हायरस असल्यामुळे तिथे गेलेले विद्यार्थी परत आले आहेत. याचा तिथल्या वैद्यकीय प्रवेशांवर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.

करोना व्हायरसमुळे चीनच्या मालकीच्या परदेशातल्या उद्योगांवरही संकट ओढवले आहे. इंडोनेशियात चीनच्या एका प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या सुमारे 40 हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. या प्रकल्पात एकूण 43 हजारांवर कामगार आहेत. त्यापैकी पाच हजार कामगार मूळचे चीनचे आहेत. करोना व्हायरसमुळे चीनचा विकासदर एक टक्क्याने घटू शकतो. अर्थव्यवस्थेचे 9.66 लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. प्राणघातक करोना विषाणूंनंतर आता चीनमध्ये बर्ड फ्लूचा धोकाही उद्भवला आहे. चीनच्या हुनान प्रांतात कोंबड्यांमध्ये धोकादायक एच 5 एन 1 पसरण्याच्या घटना घडल्या आहेत. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने चीनच्या कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्र्याशी झालेल्या संभाषणाचा हवाला देऊन वृत्त दिले आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव शायोयांग शहरातल्या शुआनक्विंग जिल्ह्यात झाला आहे. संसर्ग पसरल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक अधिकार्‍यांनी कोंबड्या मारून टाकल्या आहेत; मात्र आतापर्यंत हुनानमध्ये कोणत्याही व्यक्तीला एच 5 एन 1 संसर्गाची लागण झाल्याची माहिती नाही.

एच 5 एन 1 फ्लू विषाणूला ‘बर्ड फ्लू’ म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे पक्ष्यांमध्ये श्वसनाचा गंभीर रोग निर्माण होतो आणि मानवांमध्येदेखील हा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता बळावते. चीनमधले लोक घरातल्या पाळीव प्राण्यांना बाहेर फेकत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. प्राण्यांपासून हा व्हायरस पसरत असल्याची माहिती सगळीकडे पसरल्याने लोक प्राण्यांना घरातून बाहेर काढत आहेत. या प्राण्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यावर मात करायचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये गुंतवणूक करण्याचे धाडस कुणीच करणार नाही. तसेच आतापर्यंत चीनने कायम स्वस्त वस्तूंचा मारा करून अनेक देशांमधले व्यापार संतुलन बिघडवले होते.

चीनच्या सध्याच्या या परिस्थितीचा फायदा असे देश उठवण्याची शक्यता आहे. करोना विषाणू आणि बर्ड फ्लूचे निमित्त करून चीनच्या वस्तू बाजारात येण्यास अटकाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यावरचा कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्याची तयारी भारतापासून सुरू झाली आहे. त्याचाही परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. भारतात आलेल्या बर्ड फ्लूच्या संकटाने कुक्कुटपालन व्यवसाय मोडीत निघाला होता. प्रशासनाने पुढाकार घेऊन मोठी आर्थिक मदत केल्याने शेतकरी आणि कुक्कुटपालक उभे राहिले, हा लक्षात घेतले तर चीनपुढेही आता मोठे संकट असल्याची जाणीव होते. या संकटाला हे राज्य तसेच जग कसे सामोरे जाते आणि त्यात चीनचे खरेच केवढे मोठे नुकसान होते, हे आता आजमवायचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com