फिचर्स

माझा परममित्र दामूअण्णा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सिन्नरमधील एका विडी कामगार आई-वडिलांचा व स्वत: विड्या वळून शिक्षण घेण्याची जिद्द पुरी करणारा विडी कामगार दामू व एका विडी कारखानदाराचा मुलगा मी अशी आमची सर्वस्वी भिन्न पार्श्वभूमीत बहरलेली मैत्री! दामूचे आई-वडील शेतकरी, पण जेमतेम उत्पन्नामुळे तेही फावल्या वेळात विड्या वळत असत. फार कमी वयात क्वचितच मुलांना परिस्थितीची जाणीव होते. दामू मात्र अपवाद! माता-पित्यांची ओढाताण लक्षात आल्याने 10-12 वर्षांच्या वयातच आपल्या शिक्षणाच्या खर्चाचा भार आई-वडिलांवर पडू नये ही जाणीव त्याला अकाली पोक्त बनवणारी ठरली. शिक्षणाबद्दलची आस्था मात्र कायम होती.

देवकिसन सारडा

नांक 23 फेब्रुवारी 2020 हा रविवार नेहमीसारखा उगवला, पण मावळला मात्र माझ्या आयुष्यात एक न भरून येणारी पोकळी निर्माण करून! वयाच्या दहाव्या वर्षी सुरू झालेला व 77 वर्षे अखंड वृद्धिंगत झालेला मैत्रीचा ऋणानुबंध दामूअण्णाच्या निधनाने आता कायमचा दुरावला आहे. दामूची आणि माझी मैत्री हा एक विशेष दैवयोग !

सिन्नरमधील एका विडी कामगार आई-वडिलांचा व स्वत: विड्या वळून शिक्षण घेण्याची जिद्द पुरी करणारा विडी कामगार दामू व एका विडी कारखानदाराचा मुलगा मी अशी आमची सर्वस्वी भिन्न पार्श्वभूमीत बहरलेली मैत्री! सिन्नर त्याकाळी फार छोटे, म्हणजे जेमतेम 12-13 हजार लोकवस्तीचे पठारी भूभागावर वसलेले तालुक्याचे गाव! परिसरातील शेतीसुद्धा जिरायती! त्यामुळे तालुक्याच्या खेड्यापाड्यातील मजूरवर्गाला रोजगार पुरवणारा विडी उद्योग सिन्नरमध्ये वाढला. दामूचे आई-वडील शेतकरी, पण जेमतेम उत्पन्नामुळे तेही फावल्या वेळात विड्या वळत असत. फार कमी वयात क्वचितच मुलांना परिस्थितीची जाणीव होते. दामू मात्र अपवाद! माता-पित्यांची ओढाताण लक्षात आल्याने 10-12 वर्षांच्या वयातच आपल्या शिक्षणाच्या खर्चाचा भार आई-वडिलांवर पडू नये ही जाणीव त्याला अकाली पोक्त बनवणारी ठरली. शिक्षणाबद्दलची आस्था मात्र कायम होती.

आमची ओळख झाली त्यावेळी माझे वय 10 वर्षे तर दामूचे जवळपास 15 वर्षे! दामू पालिकेच्या प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात तर मी त्या वेळच्या नियमानुसार असलेली मुभा घेतली व चौथीनंतर इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. त्याकाळात इंग्रजी शाळेला नाताळची दहा दिवस सुटी असे. माझ्या बरोबरीची काही मुले गावात सायकली फिरवताना दिसत. म्हणून मीही वडिलांकडे हट्ट धरला. नाताळच्या सुटीच्या पहिल्याच दिवशी जरा कमी उंचींची सायकल भाड्याने घेऊन एका माणसाला सोबत देऊन मला शाळेच्या मैदानावर सायकल शिकण्याला वडिलांनी अनुमती दिली. त्याप्रमाणे दहाच्या बेताला मी मैदानावर पोहोचलो. सोबत नारायण नावाचा माणूस होता. सायकलचे हँडल व आसन दोन्ही हातात धरून व मला त्यावर बसवून नारायण सायकल फिरवत होता. त्यावेळी मैदानावर एक मुलगा बसलेला होता. तो नारायणला ओळखत होता. त्याने नारायणला थांबवले. ‘या पद्धतीने सायकल कशी शिकवणार? तू बघ, मी शिकवतो’ असे सांगून त्याने सायकल व मला ताब्यात घेतले आणि दहा मिनिटांत मी सायकल चालवू लागलो. ही दामूची आणि माझी पहिली भेट! घरी परतल्यावर नारायणने हा वृत्तांत वडिलांना सांगितला. बाबूराव तिकोनेंचा मुलगा म्हणताच वडिलांना बरे वाटले. ते बाबूरावांना ओळखत होते. योगायोगाने पाचवीच्या वर्गात दामू आणि मी सोबत झालो. आमची गट्टी वाढू लागली. वयाचे अंतर बरेच होते. मात्र दामूच्या वागण्यात पोरकटपणा नव्हता. त्यामुळे त्याची मैत्री मला दिलासादायक वाटे. मुलगा कोणाशी मैत्री करतो यावर वडिलांचे लक्ष असे. दामूशी झालेली माझी मैत्री त्यांनाही पसंत असावी. 1950 साली मी शालांत परीक्षा पास झालो. दामू मात्र नापास झाला. दोघांची शाळा सुटली.

दामूचे लग्न विद्यार्थीदशेतच 1948 साली झाले होते. मुलगी नाशिकची होती. काहीतरी बिनसले व दामूची पत्नी माहेरीच राहू लागली. तीही विडी कामगार होती. त्या उत्पन्नावर डोळा ठेऊन तिने सासरी जाऊ नये, असाच प्रयत्न माहेरची मंडळी करीत होती. नंतर लवकरच दामू जिल्हा लोकल बोर्डात नोकरीला लागला.

जिल्हा परिषद स्थापन झाल्यावर दामूची सेवा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली. सिन्नर ते नाशिक रोज एस. टी. बसने ये-जा सुरू झाली, पण परतण्यापूर्वी दामू नियमाने पंचवटीत रामदर्शनाला जात असे. तेथे त्याची पत्नीशी भेट झाली. पत्नी घरी येऊ इच्छिते याबद्दल त्याची खात्री झाली, पण माहेरच्या परिवारातून सुटका होणे सहज नव्हते. त्यावेळी आम्हा दोघांचा वकील झालेला शाळकरी मित्र नानासाहेब लेले नाशिकला वकिली करू लागला होता. त्याने कायद्याशी सुसंगत पर्याय सुचवला. मी, नाना व दामूने तो पर्याय थोडी जोखीम पत्करून व्यवस्थित पार पाडला. 14 वर्षांच्या वनवासानंतर दामूच्या सीतेला (म्हणजे यमुना वहिनीला) सुरक्षितपणे सिन्नरला पळवले. त्यानंतर दामूचा संसार 2018 मध्ये यमुना वहिनींच्या निधनापर्यंत सुरळीतपणे झाला.

सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक करांच्या वसुलीचे काम दामूकडे होते. त्याच्या साध्या-सरळ वागणुकीने त्याचे काम फार सोपे होई. रविवारी सिन्नरचा बाजार! त्या दिवशी बाजाराला येणारी खेडूत मंडळी दामूला भेटून आपापली कराची रक्कम त्याला देऊन पावती घेत. साहजिकच फिरतीची नोकरी असूनही दामूला क्वचितच फिरावे लागले. त्या मोकळ्या वेळेचा फायदा आम्हा काही मित्रांना मिळे. कुणालाही मदत करण्यास दामू सदैव तत्पर असे. 1957-58 साली सामाजिक कार्यात मीही भाग घेऊ लागलो. त्यानिमित्ताने दामूचा माझा संपर्क खूपच वाढला. त्याकाळातील दोन-तीन घटनांनी दामू आमचा कौटुंबिक घटक बनला. कामानिमित्त प्रवासाला जाताना दामू सोबत असला की वडील निश्चिंत असत. त्यामुळे दामूचा माझा वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्रभर आणि इतरत्र काही ठिकाणी भरपूर प्रवास झाला. नोकरीतील काम चोख बजावले जात असल्याने त्याला कधीही माझ्यासोबत फिरायला अडचण आली नाही. मित्रांचा सहवास सुटू नये म्हणून दामूने नोकरीत बढती कधीच स्वीकारली नाही. त्यामुळे आधी सिन्नर व आमचे स्थलांतर झाल्यावर नाशिकला आमच्या भेटीगाठी नियमित होतच राहिल्या.

सरकारी संस्थेच्या नोकरीतसुद्धा दामू कमालीचा प्रामाणिक होता. नोकरीच्या अखेरच्या काळात जिल्हाभरातील सरकारी शाळांचे अनुदान वितरणाची जबाबदारी वरिष्ठांनी विश्वासाने दामूवर सोपवली होती. कार्यालयातील अनेक सहकार्‍यांचा त्या मलईदार पदावर डोळा होता, पण दामूच्या निवृत्तीपर्यंत ती जबाबदारी दामूकडेच राहिली. कामानिमित्त कोणाच्याही भेटीगाठीत दामू कटाक्षाने चहादेखील घेत नसे. दामूने आयुष्यात कधी पादत्राण वापरले नाही. सर्व ऋतूत व कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर (मातीचे, खडीचे, डांबरी वा काँक्रिटचे) दामू अनवाणीच चालत राहिला. प्रकृतीने साथ दिली तोवर दरमहा त्र्यंबकेश्वरची वारी दामूने कधीच चुकवली नाही.

बाबूराव तिकोने हे विडी कामगार असूनही समाजात त्यांना खूप मान होता. त्यांच्या पश्चात दामूकडे कुटुंबातील वडीलकी आली; तीही त्याने तितक्याच उत्तमरितीने निभावली. सिन्नरमध्ये दामू व मी म्हणजे राम-भरताची जोडी म्हणून ओळखली जाई. दामूला दोन मुली! 2018 मध्ये पत्नी निवर्तली. त्याआधी आठ-दहा वर्षे त्या वृद्धापकाळामुळे थकल्या होत्या. त्याकाळात कन्या भारती व जावई अशोक सोनवणे यांनी दोघांना औरंगाबादला नेले. अशोक तेथे पोलीस अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यावर ते नाशिककर झाले. या सर्व काळात त्यांनी व भारतीने दामूअण्णाची सर्व प्रकारे काळजी घेतली. भारतीच्या तिन्ही मुलांचा म्हणजे दामूअण्णाच्या नातवांचा संसार सुरळीत सुरू झाल्याचा आनंद त्याने अनुभवला. एका पणतूला खेळवण्याची संधीही त्याला मिळाली. पणतू अद्वैत लवकरच दोन वर्षांचा होईल. दामूअण्णांना कोणतीही अडचण जाणवणार नाही, त्यांची वृद्धावस्था समाधानी व आनंदमय राहील यासाठी भारती आणि अशोक नेहमी दक्ष राहिले. कदाचित त्यामुळेच दामूअण्णा आणि यमुना वहिनींना दीर्घायुष्य लाभले. दामूच्या निधनाने माझ्या शालेय मित्र परिवारातील शेवटचा, पण अत्यंत निकटचा परममित्र कायमचा दुरावला आहे. मुले मोठी झाली म्हणून दामूला आम्ही सर्व मित्र ‘दामूअण्णा’ संबोधू लागलो. अनेकदा माझ्या काही मित्रांनी व पत्नीने सांगूनही मला मात्र दामूने कधीच एकेरी संबोधन वापरले नाही. त्यामुळे मी त्याच्यापुरता ‘बाबूशेठ’च होतो. कोणत्याही परिस्थितीत नीतिमूल्यांवर आधारित आपल्या तत्त्वांशी दामूने कधी तडजोड केली नाही. दामूच्या जाण्याने निर्माण झालेली मैत्रीतील पोकळी आता मलाही सतत डाचत राहील.

स्वर्गीय परममित्र दामूअण्णाच्या स्मृतीस अभिवादनपूर्वक आदरांजली !

Deshdoot
www.deshdoot.com