Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकोरोना आणि ऑक्सिजन

कोरोना आणि ऑक्सिजन

ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. जगण्याच्या लढाईत ऑक्सिजन हा सर्वांत महत्त्वपूर्ण घटक असून, कोरोनाच्या संकटाशी जग आज लढत असताना ऑक्सिजनची गरज वाढली आहे. कोरोना विषाणू फुफ्फुसे आणि श्वसनसंस्थेवर हल्ला करीत असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते आणि प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य राखणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. तज्ज्ञांच्या मते, आपल्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर आपण स्वतः तपासू शकतो. सहा मिनिटांत आपण दोनशे मीटर चालू शकत असू, तर आपण शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेच्या समस्येशी लढू शकतो.

जर आपण सहा मिनिटांत पाचशे मीटर अंतर चालून पार करू शकत असू, तर आपली परिस्थिती आणखी चांगली आहे आणि आपण कोरोनाला हरवू शकतो, असे मानता येईल. कोणत्याही जीवित प्राण्याला ऑक्सिजन हा अत्यावश्यक घटक आहे. ऑक्सिजन हा रंगहीन, चवहीन आणि गंधहीन वायू आहे. ऑक्सिजनला आपण शास्त्रीय भाषेत ‘ओ’ म्हणतो आणि ऑक्सिजनमध्ये दोन अणू असल्यामुळे ‘ओ-टू’ ही संज्ञा वापरली जाते. खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्यास ऑक्सिजनमुळे मदत होते आणि तो श्वसनाद्वारे ग्रहण केला जातो. आपल्याला अन्न मिळाले नाही तरी आपण काही दिवस जगू शकतो; मात्र ऑक्सिजनविना थोडा वेळही जीवित राहू शकत नाही, यावरूनच ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात येते.

- Advertisement -

सायनोबॅक्टेरिया हे ऑक्सिजनची निर्मिती करणारे पहिले जीव होते, असे आजवर शास्त्रज्ञ मानत असत. परंतु आता ब्रिटनमधील इम्पीरियल कॉलेजमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, सुमारे 3.6 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली. मनुष्य दिवसभरात जे काही ग्रहण करतो, त्यातील 75 टक्के भाग ऑक्सिजन हाच असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शास्त्रज्ञांच्या मते, सामान्य व्यक्ती एका मिनिटात 15 वेळा श्वासोच्छ्वास करते. अशा प्रकारे व्यक्ती दिवसाकाठी 21,600 वेळा श्वासोच्छ्वास करते. आपण दिवसाकाठी 15 ते 18 किलो ऑक्सिजन आत घेतो. अशारीतीने श्वास घेण्या-सोडण्याच्या प्रक्रियेचा घनिष्ट संबंध आपली आयुर्मर्यादा आणि आरोग्याच्या स्तराशीही असतो. पृथ्वीच्या वायुमंडलात सुमारे सहा लाख अब्ज टन हवा आहे. त्यातील 78 टक्के भाग नायट्रोजनचा आहे. उर्वरित भागात 21 टक्के ऑक्सिजन, 0.03 टक्के कार्बनडाय ऑक्साइड आणि 0.97 टक्के अन्य वायू आहेत. माणसाच्या शरीरातील सर्व भागांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा झाला, तरच शरीर योग्य प्रकारे काम करू शकते. ऑक्सिजनचा हा पुरवठा रक्ताच्या माध्यमातून केला जातो. आपल्या शरीराला अन्न आणि पाण्यातून अवघी 10 टक्के ऊर्जा मिळते तर उर्वरित 90 टक्के ऊर्जा ऑक्सिजनमुळे मिळते. सामान्यतः शरीरात ऑक्सिजनचा स्तर 95 ते 100 टक्के इतका असतो. जेव्हा हा स्तर 90 टक्क्यांपेक्षा खाली जातो, तेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे असे मानले जाते.

वातावरणातील 70 ते 80 टक्के ऑक्सिजन सागरी वनस्पती देतात असे मानले जाते. पृथ्वीवर समुद्राचे प्रमाण जमिनीपेक्षा अधिक असल्यामुळे जमिनीवरील वनस्पतींपेक्षा अधिक प्राणवायू सागरी वनस्पती देतात. जमिनीवरील वनस्पतींमध्ये पिंपळ, लिंब, वड तसेच तुळस या वनस्पती अन्य झाडांच्या तुलनेत अधिक प्राणवायू देतात. पिंपळाचा वृक्ष 24 पैकी 22 तासांपेक्षा अधिक काळ ऑक्सिजन देतो. बांबूचे झाड सर्वांत वेगाने वाढणारे झाड असते. हवा स्वच्छ करण्याबरोबरच बांबू अन्य झाडांच्या तुलनेत 30 टक्के अधिक ऑक्सिजन देतो. आपले अवयव व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी ऑक्सिजनचा विशिष्ट स्तर शरीरात राखणे आवश्यक असते. हा स्तर कमी होण्याच्या स्थितीला ‘हायजोफेमिया’ म्हणतात. श्वास घेण्यात अडचण येणे हे या आजाराचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. मेंदू, यकृत आणि मूत्रपिंडांसह अनेक अवयवांना पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाला नाही, तर हे अवयव खराब होतात. योगतज्ज्ञांच्या मते, श्वास रोखून एक मिनिट राहता आले तर शरीरात ऑक्सिजनचा स्तर योग्य आहे असे मानावे. पहाटेच्या वेळी मोकळ्या हवेत फिरल्यामुळे शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे रक्तप्रवाह गतिमान होतो आणि स्फूर्ती मिळते. शुद्ध हवेमुळे हाडे आणि स्नायूंना बळकटी मिळते तसेच त्वचेवर चमक येते. शुद्ध हवेमुळे पचनक्रियाही सुधारते. सकाळची शुद्ध हवा आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नवजीवन देते. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, बेचैनी किंवा भीती दूर करण्यासही शुद्ध हवा मदत करते. टीबी, दमा, अस्थमा आणि फुफ्फुसांच्या अन्य आजारांसाठीही शुद्ध हवेसारखे औषध दुसरे नाही. समजा, पृथ्वीवरून केवळ पाच सेकंदांसाठी ऑक्सिजन गायब झाला तर पृथ्वीवर हाहाकार माजेल. दिवसा अंधार होईल. पृथ्वी प्रचंड थंड होईल. धातूंचे तुकडे वेल्डिंग न करता एकमेकांना जोडले जातील. जगातील 21 टक्के ऑक्सिजन गायब झाला तरी आपल्या सर्वांचे कानाचे पडदे फाटतील. काँक्रिटच्या इमारती जमीनदोस्त होतील आणि समुद्राचे सर्व पाणी वाफ बनून गायब होईल.

वातावरणातील ऑक्सिजन गायब झाल्यास आपल्या पायाखालील जमीन धसून 10 ते 15 किलोमीटर खोल जाईल. परंतु जर वातावरणात ऑक्सिजनचा स्तर सध्याच्या दुप्पट झाला तर आपली वाहने कमी पेट्रोल-डिझेलमध्ये अधिक अंतर कापू शकतील. किड्यांचा आकार मोठा होईल. जगातील संपूर्ण ऑक्सिजन दर 2000 वर्षांनी ‘रिन्यू’ होतो असे मानले जाते. म्हणजेच जुन्या ऑक्सिजनच्या जागी नवा ऑक्सिजन येतो. ऑक्सिजन स्वतः ज्वलनशील नसला तरी अन्य वस्तूंच्या जलनाला साह्यभूत असतो. ऑक्सिजन स्वतः ज्वलनशील असता तर काडेपेटीची काडी ओढताच वातावरणाला आग लागली असती. एका संशोधनानुसार, सर्व प्रकारच्या कर्करोगाची सुरुवात ऑक्सिजनची कमतरता हीच असते.

आपल्या शरीराच्या विविध अवयवांचा विकास होण्यासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असतो. त्यामुळे आहारातही ऑक्सिजन अधिक देणार्‍या घटकांचा समावेश असावा, असे सांगितले जाते. मोड आलेल्या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचा संचार भरपूर प्रमाणात होतो. याखेरीज किसमिस, खजूर, आले, गाजर, हिरव्या भाज्यांमध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. आंबा, लिंबू, टरबूज आणि पपईसारखी फळे आपल्या मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखतात. जीवनसत्त्वे अधिक असलेली फळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवितात. टरबुजात अधिक प्रमाणात फायबर असते. तसेच लोहयुक्त पदार्थ आहारात ठेवल्यामुळे आपण अधिक प्रमाणात ऑक्सिजन ग्रहण करू शकतो. ऑक्सिजनचा शरीरातील प्रवाह वाढविण्याचे काम लोह करते. शिवाय भरपूर पाणी पिणेही आवश्यक असून, पाण्यामुळेही शरीरात ऑक्सिजनचा स्तर वाढतो. शरीराची अंतर्गत सफाई करण्याबरोबरच पाणी आपल्या शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढविते. सध्याच्या संकटाच्या काळात आरोग्य मजबूत राखणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी शरीरातील ऑक्सिजनचा स्तर चांगला राखणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे आणि प्राणायाम, योगासने करणे सर्वांत फायदेशीर ठरेल. सामान्य स्थितीत आपण 500 मिली ऑक्सिजन शरीरात घेतो. परंतु, प्राणायाम केल्याने 500 ते 10 हजार मिली ऑक्सिजन शरीरात घेणे शक्य होते. सहा मिनिटांत आपण किती अंतर चालू शकतो, याची परीक्षा स्वतःच घेऊन आपण कोरोनाच्या या संकटकाळात आपल्या शरीराची ऑक्सिजन ग्रहण करण्याची ताकद आजमावू शकतो आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करून हा स्तर वाढवू शकतो.

डॉ. प्राजक्ता पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या