ताणतणाव टाळण्यासाठी खळखळून हसा
फिचर्स

ताणतणाव टाळण्यासाठी खळखळून हसा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आज जागतिक हास्य दिन… सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो.

 पंकज भदाणे ,

रनाळे खुर्द ता.जि.नंदुरबार

ध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हसणे विसरत चालला आहे. तंत्रज्ञाननिर्मित आभासी दुनियेमुळे आयुष्यात माणसाचा निवांतपणा  हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा कमी झालाय, त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो.

हे टाळण्याचा साधा सरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. आयुष्यातील दुःखाचे विस्मरण करणे, हा खरा विनोदाचा उद्देश असतो. पूर्वीपासूनच आपण ऐकत आलो आहे. हसणं हे एक बेस्ट औषध आहे. पण या धकाधकीच्या जीवनात आपण हसणेही विसरून गेलो आहे. तुम्हाला आठवते का, तुम्ही या आधी अगदी मनापासून खदखदून आणि पोट दुखेपर्यंत कधी हसला होता? बरेच दिवस झाले ना! खरंच मनापासून हसल्यावर मन किती हलके आणि ताजे होते. पण रोज एवढे हसू यावे यासाठी एखादा तरी छानसा विनोद ऐकायला पाहिजे. पण काहीच विनोद असे असतात जे मनापासून आनंद देतात. हसल्याने जीवन निरोगी तर राहतेच, शिवाय आत्मविश्वास वाढतो. माणसाने खळखळून हसले पाहिजे. एकावेळेस बँकेत पैसे नसले तरी चालेल पण चेहर्‍यावर हास्य असावे कारण हास्य हीच खरी श्रीमंती असते. हास्य काय आहे? आनंद, गंमत वगैरे व्यक्त करणारा, तोंडाच्या कडा किंचित वर उचलून होणारा चेहर्‍यावरील अविर्भाव अशी शब्द कोशामध्ये त्याची व्याख्या केली आहे. हीच तर आहे स्मित हास्याची जादू ज्याद्वारे शब्दांपलीकडील  विचार व्यक्त करता येतात. ही गोष्ट वेगळी की हसण्याद्वारे राग, तिरस्कार व्यक्त करता येतात. हसल्याने खरंच काही फरक पडतो का जरा आठवा तुमच्यासमोर आलेल्या व्यक्तीचा हसरा चेहरा पाहून तुम्हाला कधी दिलासा मिळाल्यासारखे किंवा मनातली भीती दूर झाल्यासारखे वाटले का? स्मित हास्याने तणाव नाहीसा होऊ शकतो. सततची धावपळ आणि तणावामुळे होणारी चिडचिड यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. त्यावर औषध नव्हे तर हास्य हाच एकमेव उपाय असल्याने अनेक जण मान्य करीत आहेत. म्हणूनच जागोजागी हास्यक्लब निर्माण होत आहेत.

हास्ययोग हा योगाचे एक अंग आहे या प्रकारांमध्ये आपल्या शरीरामधील प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो प्रत्येक स्नायू मोकळा होतो. कारण नसताना हसणे अवघड आहे. म्हणूनच हास्यक्लब आपल्याला पहायला मिळतात. हसणे म्हणजे मनातील आनंदाला जन्म देणे होय. हसल्यामुळे खडतर जीवन सुद्धा सुलभ होते .मनाच्या प्रसन्नतेत हास्य प्रसन्नतेची जोडले जाते. जीवन हसत खेळत अवश्य जगावे, हसण्यामुळे स्वतः प्रसन्नतेचा अनुभव घ्यावा. दुसर्‍यांनाही द्यावा.

खळखळून आणि मनमोकळेपणाने असल्याने शरीरात एंडोर्फिम हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. त्यामुळे आहाराचे संतुलन ठेवण्यास मदत होते. हसल्याने आपली श्वसनक्षमता सुधारते श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी वाढतो .त्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो परिणामी शरीराची एनर्जी लेव्हल चांगली राहते. हसण्याचा परिणाम आपल्या वयावरही दिसून येतो. हसणे ही एक प्रकारची स्ट्रेचिंग एक्झरसाइज आहे. हसल्याने चेहर्‍याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि अँटीएजिंगला मदत होते. हसणं हे एक पेन किलर आहे. आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकारक्षमता आणि संसर्ग सोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते.त्यामुळे आजारी पडण्याची क्षमता कमी होते.

ज्या व्यक्तीला मनमोकळेपणाने खदखदून हसता येते तो माणूस सर्वात सुखी आहे, असे समजले जाते. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हसल्यामुळे चेहरा टवटवीत राहतो, हसणारी व्यक्ती सर्वांशी मिळून मिसळून राहते. त्याच्या शरीरात प्रतिकारक्षमता वाढते. हसल्यामुळे हृदयविकार होत नाही. शरीरातील ऊर्जा वाढते. ताण तणावापासून मुक्ती मिळते. वजन नियंत्रणात राहते. जीवन सकारात्मक राहण्यास उपयुक्त असते. असे अनेक फायदे हसण्याचे आहेत, ते विकत घ्यावे लागत नाही. हसण्याची कला फक्त माणसालाच मिळालेली आहे. या जागतिक हास्य दिनाच्या दिवशी आपण खळखळून हसण्याचा संकल्प करूया व इतरांनाही हसवूूया व आपले जीवन निरोगी आणि आनंदमयी करूया एवढीच अपेक्षा!

Deshdoot
www.deshdoot.com