नव्या संदर्भातला सजग गणेशोत्सव

jalgaon-digital
7 Min Read

दैनंदिन जीवनात आगमनावेळी आनंद आणि निरोपाच्या समयी हुरहुर या भावनांचा प्रत्यय असंख्य वेळा येत असला तरी गणरायाच्या संदर्भात तो दर वर्षी अतीव तीव्रतेने येतो याबाबत दुमत असू नये.

गणेशोत्सव उंबर्यावर येऊन ठेपलेला असताना सध्या मनामनात याच भावनांच्या लहरी उठत आहेत. मात्र कोरोनाचा दाट झाकोळ असताना यंदा गणेशोत्सवाच्या छटाही बदलत्या राहणार आहेत. स्वातंत्रलढ्याला नवीन बळ प्रदान करण्यास्तव सामाजिक शक्तींच्या एकत्रीकरणाचं ध्येय साधत सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साजरीकरणात तर यंदा आमूलाग्र बदल होत आहे. मात्र आपल्या आध्यात्मिक, आत्मिक, सांस्कृतिक, सामाजिक बैठकीवर अखंड विराजमान असणार्या गजाननाच्या पार्थिव मूर्तीच्या प्रतिष्ठापनेत आणि उत्सवरुपी कौतुकसोहळ्यात नेहमीचाच जोश, उत्साह असेल, यात तीळमात्र शंका नाही.

आगमनाप्रित्यर्थ होणार्या मोठ्या मिरवणुका, मंडपरुपी मयसभेत दहा दिवस पार पडणारे विविधगुणदर्शक कार्यक्रम, स्पर्धा, आरत्या, स्पिकर्सच्या भिंती, नजर हरवून टाकणारी अतिप्रखर उग्र रोषणाई अशा बाजारकेंद्री उथळ साजरीकरणाचं वळण टाळून थेट घर अथवा राऊळांमधल्या राजस बैठकांवर विराजमान होणारा गणेश यंदाच्या या आगळ्या उत्सवाचा आनंद अधिक संतोषाने अनुभवेल अशी आशा नव्हे तर विश्वास आहे. म्हणूनच आपणही उत्सवाला आलेली सूज उतरल्याचा आनंद व्यक्त करत विघ्नहर्त्या गणेशाकडे कोरोनाचं विघ्न दूर करण्याचं साकडं घालण्यास सज्ज होऊ या.

गणेशोत्सवाच्या साजरीकरणाने वेगवेगळी स्थित्यंतरं अनुभवली आहेत. पूर्वी ग्रामीण भागात साधारणपणे सात दिवसांचे गणपती असत.

सातव्या दिवशी म्हणजे गौरीसोबत गणपतीचं विसर्जन करून ही मंडळी शहरांमध्ये गणेशोत्सव पाहण्यासाठी येत. अशा रितीनं खास गणेशोत्सवासाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्‍यांची संख्या बरीच वाढू लागली. परिणामी, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि हा उत्सव अधिकाधिक व्यापक, आकर्षक तसंच नाविन्यपूर्ण करण्यावर भर दिला जाऊ लागला. केवळ लोकरंजन, सामाजिक प्रबोधन, सामाजिक सलोखा, सद्भावना एवढंच या गणेशोत्सवाचं स्वरूप राहिलं नाही. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही या उत्सवाचं महत्त्व उल्लेखनीय ठरत आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी गणेशोत्सव हे तात्पुरत्या काळातील का होईना, उदरनिर्वाहाचं साधन बनत आहे. विशेष म्हणजे या उत्सवात विविध जाती-धर्मातल्या व्यावसायिकांचा सहभाग लाभत आहे.

उदाहरण द्यायचं तर गणेशोत्सवासाठी सजावटीच्या साहित्याची विक्री करणार्यांमध्ये बहुतांश व्यावसायिक बोहरी समाजाचे आहेत. शिवाय या उत्सवासाठी लागणारा गुलाल, बुक्का उपलब्ध करून देणार्यांमध्ये आतार लोकांची संख्या बरीच मोठी आहे. यावरून गणेशोत्सवात जाती-धर्माचा कोणताही अडसर येत नसल्याचं दिसून येतं. असा हा एकमेव उत्सव आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लोकमान्य टिळकांनाही हेच अभिप्रेत होतं. यंदा मात्र कोरोनाने साजरीकरणाची ही परिमाणं बदलली आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा विचार नव्या संदर्भात करावा लागत आहे.

कोव्हिड-19 संसर्गाने होळीनंतर आलेल्या जवळपास प्रत्येक सणावर पाणी फिरवलेलं असताना आणि देवांना देवालयांमध्ये आणि माणसांना घरांमध्ये बंदिस्त केलेलं असताना गणेशोत्सवाच्या निमित्ताने खर्‍या अर्थाने ‘न्यू नॉर्मल’चा श्रीगणेशा होणार आहे. प्रदीर्घ टाळेबंदीमुळे मंदावलेल्या अर्थचक्राला गती देण्याचा, भीतीयुक्त वातावरणातून बाहेर पडत सावधपणे पुढे चाल घेण्याचा, संगणकाच्या पडद्यावरुन सुरू झालेलं शैक्षणिक वर्ष रुळण्याचा, आळसावून पडलेल्या बाजारपेठेने चैतन्यमय होण्याचा, सेवा व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सेवेस तप्तर राहण्याचा थोडक्यात बळजबरीने भोगाव्या लागलेल्या बंदिवासातून खर्या अर्थाने मुक्त होण्याचा श्रीगणेशा या उत्सवापासूनच होणार आहे. म्हणूनच मांगल्याचं आंदण देणार्या यंदाच्या गणेशोत्सवाचं महत्त्व खूप वेगळं आहे.

आज आपल्या मनात समाधान आहे कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गातून बचावल्याचं, अस्थिर अवस्थेतून स्थिरतेकडे वाटचाल होत असल्याचं, जीवनाकडे नव्या जाणीवेने आणि जीवनशैलीकडे व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी मिळाल्याचं… थोडक्यात, गणेशाप्रमाणेच आता आपल्याला चोहीकडे बारकाईने बघण्याची दृष्टी मिळाली आहे. त्याच्याप्रमाणेच पृथ्वीभ्रमणाने नव्हे तर माता-पित्याच्या आदरपूर्वक प्रदक्षिणेने सर्वव्यापकता साधली जाते हे आपल्याला समजलं आहे.

गजगती मंद असली तरी त्याच्यासारखी दमदार पावलं टाकल्यास इच्छित स्थळी खात्रीशीर पोहोचता येतं हे आपल्याला उमगलं आहे. प्रत्येक ठिकाणी चित्त्याच्या चपळाईने झेप घेण्याची मनीषा बाळगणं गरजेचं नसतं हे परिस्थितीने आपल्याला शिकवलं आहे. याच सुबुद्धतेचा परिणाम म्हणून वैश्विक महामारीच्या निमित्ताने विश्वाला गवसणी घालणारी आपली नजर आता पुन्हा घराच्या उंबर्याआड स्थिरावली असताना, घरातला सौख्य-सलोखा-सुसंवादाचा अर्थ नव्याने उमगलेला असताना, शेजारस्नेहाची चव चाखलेली असताना या विस्तारलेल्या अनुभवसिद्धीनिशी साजर्या होणार्या गणेशोत्सवाचं स्वरुपही व्यापक आणि उद्दात्त व्हावं ही अपेक्षा विफल ठरणार नाही.

गणेशोत्सव हा गणेश अर्चनेबरोबरच नानाविध उपक्रमांना जन्म देणारा महोत्सव आहे. समाजातल्या सर्व वर्गांना सवे घेऊन साजर्या होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्राथमिक पर्वात इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करणं, चेतनाजागृती हे ध्येय असलं तरी सुरूवातीपासूनच कलात्मकतेचं कोंदण लाभल्यामुळे या उत्सवाने सांस्कृतिक, सामाजिक प्रवाह वाहते करण्याचं कामही केलं आहे. सुरूवातीला गणेशोत्सवानिमित्त भरणार्या मेळ्यांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळालं होतं. आजही हे व्यासपीठ अनेकांना नावारुपाला आणण्यास मदत करणारं आहे.

समाजशक्तीचं पाठबळ मिळत असल्यामुळे यानिमित्ताने समोर येणार्या लहान पंखांनाही मोठं बळ मिळतं आणि बघता बघता ते आकाशभरारीस सज्ज होतात. यंदाचा गणेशोत्सव बराचसा वेगळा आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साजर्या होणार्‍या या उत्सवात विविध उपक्रमांवर बंधनं आहेत. मंडपांपासून भव्य मूर्तींपर्यंत आणि सजावटीपासून मिरवणुकींपर्यंत सगळ्यांच्याच मर्यादा पाळाव्या लागल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्सवावर विरजण पडणं स्वाभाविक आहे. मात्र नाराज न होता हीच समूहशक्ती अन्य विधायक कामांसाठी खर्ची पडली तर यंदाचा गणेशोत्सवही अपूर्व समाधान देऊन जाईल याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही.

आतापर्यंत 2020 हे वर्ष समस्त मानवजातीच्या सहनशक्तीचा अंत पाहणारं ठरलं आहे. सुरूवातीपासून अनेकोनेक संकटांची मालिका सुरू असल्यामुळे अनेक संसार विकल, बेजार झाले आहेत. वैश्विक महामारी, लांबलेल्या लॉकडाऊनमुळे घरघर लागलेले लघुउद्योग, हातावर पोट असणार्यांची झालेली दयनीय अवस्था, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या मुलांच्या शिक्षणाचा उडालेला बोजवारा, ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या थैमानाने कोकण किनारपट्टीची झालेली अतोनात हानी हे आणि यासारखे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.

मुख्य म्हणजे कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने आता सर्वसामान्यांना आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नाचं गांभीर्य समजलं आहे. त्यामुळेच समाज म्हणून एकत्र येताना गणेशोत्सवाच्या साजरीकरणानिमित्त होणार्या खर्चाचा ओघ यंदा या प्रश्नांच्या निराकारणाकडे वळवला तर या उत्सवाला एक वेगळा आयाम मिळू शकेल. यथाशक्ती आर्थिक मदतीबरोबरच श्रमदान, सेवादान, रक्तदान, घरगुती वस्तूंचं दान, विद्यार्थ्यांना ज्ञानदान, वृद्ध कलाकारांना मदत आदी मार्गांनीही आपण खारीचा वाटा उचलू शकतो.

भविष्यात येऊ शकणार्या अशा साथरोगांच्या संकटांचा सामना करण्यासाठी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विलगीकरण कक्षांच्या निर्मितीचे संकल्प सोडले जाऊ शकतात. एरवी या रिकाम्या जागेचा उपयोग सोसायटीतल्या सदस्यांच्या सोयीसाठी होऊ शकतो. याशिवाय एकट्या राहणार्या वृद्धांना मदत, निराशाग्रस्त लोकांचं समुपदेशन, संसर्गाने हतबल झालेल्यांना नव्याने उमेद देण्यासाठी पुढे केलेला मदतीचा हात हे सगळेच उपाय सामाजिक शक्तीच्या सबलीकरणाचं काम करतील. मुख्य म्हणजे यात आबालवृद्ध सहभागी होऊ शकतील. यंदा असा चाकोरीबाहेरचा विचार करु या आणि तबकातल्या दिव्याच्या प्रकाशाने गणपतीच्या मुखमंडलाबरोबरच अंधारलेली, काजळलेली मनं उजळण्याचाही प्रयत्न करु या.

उर्मिला राजोपाध्ये

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *