Friday, April 26, 2024
HomeUncategorizedउत्सव ऊर्जेचा !

उत्सव ऊर्जेचा !

प्रत्येकाच्या मनातच नाही तर अवघ्या आसमंतात आनंद, उत्साह निर्माण करणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. 14 विद्या, 64 कलांचा अधिपती श्री गणेश. ही कलांची देवता. असा हा सार्‍यांचाच आवडता, लाडका गणपती.

त्यामुळे सार्यांनाच गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. या उत्सवाच्या तयारीत सारे दंग असतात. गणेशोत्सवात सर्वत्र आनंद, उत्साह भरून राहिलेला असतो. घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने नेत्रदीपक रोषणाई, भव्य देखावे ही भक्तांसाठी मोठी पर्वणी ठरते.

- Advertisement -

परंतु यंदा या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. काही प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा आणि त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी गणेशाचं विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे शक्यतो घरीच विसर्जन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. सोसायटीत पाण्याचा हौद तयार करून त्यातही विसर्जन करता येईल. किंवा फिरत्या हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. गेले काही महिने आपण कोरोनाच्या व्याधीशी लढतोय.

पण अजुनही या व्याधीचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळातही सार्‍यांनी पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंच्या सूचनांचं पालन करण्यात आलं तसंच आताही देण्यात आलेल्या सूचनांचं पालन केलं जायला हवं. खरं तर मार्च ते ऑगस्ट या कालावधीत काही महत्त्वाचे सण-उत्सव येऊन गेले. परंतु कोरोनाच्या संकटामुळे हे सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता आले नाहीत. गणेशोत्सवाबाबतही असंच असणार आहे. अर्थात, श्री गणेशाच्या कृपेने हे ही विघ्न दूर होईल, अशी आशा आहे.

माझं लहानपण पुण्यात गेलं. त्यावेळी आम्ही पुलाच्या दुसर्‍या बाजुला रहायचो. माझं शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण स्टेशनजवळील सेंट मीराज स्कूल अँड कॉलेजमध्ये झालं. अकरावीत असताना मी नाटक करू लागले. त्यावेळी सर्वप्रथम पुणे फेस्टिव्हलमध्ये कला सादर करण्याची संधी मिळाली. यात मी ‘भोर भयी पनघटपे’ या प्रसिध्द गाण्यावर नृत्य सादर केलं होतं. त्या वर्षी पुण्यातला गणेशोत्सव खर्‍या अर्थाने पाहिला असं म्हणता येईल. मग हा गणेशोत्सव खूप वेगळा असतो, हे लक्षात आलं.

कलाकारांसाठी गणेशोत्सवाचं महत्त्व मोठं असतं. त्यांच्या कलांना या व्यासपीठावर उत्तम वाव मिळतो. अनेक ठिकाणी श्री गणेशाच्या आरतीला बोलावलं जातं. गणेशोत्सवाच्या काळात पुणे फेस्टिव्हलमध्ये कला सादर करण्याची संधी मिळणं ही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते.गणेश कला-क्रीडा मंदिरासारखं भव्य नाट्यगृह, रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती, प्रेक्षकांमध्ये असणारा उत्साह, ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर अशा वातावरणात कला सादर करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तो मला घेता आला हे भाग्यच म्हणावं लागेल.

माझ्या माहेरी मराठ्यांकडे गणपती नसतो. साहजिक गणेशोत्सवासाठी आम्ही घरी श्री गणेशाची मूर्ती आणत नाही. मात्र, मुंबईतल्या मामाकडे दीड दिवसांचा गणपती असायचा. त्यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतल्या मामाकडे आवर्जून जाणं व्हायचं. किंबहुना, ते जाणं निश्चित असायचं. त्यावेळी गणेशोत्सवासाठी छानशी सजावट करताना मोठा आनंद मिळायचा, समाधान वाटायचं. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी हरितालिकेचा उपवास असायचा. ‘तू हरितालिकेचा उपवास कर. म्हणजे चांगला जोडीदार मिळेल’ असं आवर्जून सांगितलं जायचं. आजच्या आधुनिक युगातही ही धारणा बर्याच प्रमाणात कायम असल्याचं दिसून येतं. सकाळ-संध्याकाळ गणपतीची पूजा, आरती, प्रसादाची तयारी हे सारं मोठ्या भक्तीभावनेने होत असे. अर्थात आजही हा भक्तीभाव कायम आहे.

लग्नानंतर सासरी घाटणेकरांकडे आले. माझ्या सासरी गौरी-गणपती असतात. हा परिवार तसा मोठा आहे. तीन भावंडं आणि दोन बहिणी अशी पाचजणांची कुंटुंबं गौरी-गणपतीसाठी आवर्जून एकत्र येतात. अर्थात, हे उत्सव तीन भावंडांमध्ये दर वर्षी एकाकडे या पध्दतीने होतात. सर्वजण मिळून मोठ्या उत्साहाने गौरी-गणपतीची तयारी करतात. संपूर्ण घरात आनंद, उत्साहाचं वातावरण असतं. अर्थात, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे परिवारातले सर्वजण गौरी-गणपतीच्या सणासाठी एकत्र येणं कठीण आहे. परंतु या संकटाचं गांभीर्य लक्षात घेता ही अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे. त्याच वेळी हे संकट लवकरात लवकर दूर होवो, अशी प्रार्थना श्री गजाननाच्या चरणी करून पुढल्या वर्षीचा गणेशोत्सव तितक्याच उत्साहात, जल्लोषात साजरा करू, अशी अपेक्षा व्यक्त करता येईल.

सहा वर्षांपूर्वी आम्ही काही कलाकारांनी एकत्र येऊन ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. त्यापूर्वी मला ढोलवादन करण्याची खूप इच्छा होती. परंतु आपल्याला ते जमेल का, त्यासाठी कुठे जायला हवं हे समजत नव्हतं. त्यामुळे कलाकारांच्या ढोल पथकात मी आवर्जून भाग घेतला. ढोल वादनाचं शास्त्रशुध्द शिक्षण घेतलं. त्यासाठी बराच सराव केला. अर्थात, ढोलवादन करणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्या ढोलाचा मोठा दोर कंबरेभोवती बांधायचा, ढोलाचं ओझं सांभाळायचं आणि हे करताना विशिष्ट ठेक्यात ढोल वाजवत रहायचं, यासाठी तन-मनाची तयारी लागते. मुख्यत्वे तुम्ही सतत तीन-चार तास वा अधिक वेळ ढोल वाजवत असाल तर हात दुखणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. त्या दृष्टीने पहिल्या वर्षी ढोलवादन करणं कठीण गेलं. पण नंतर व्यवस्थित जमू लागलं. आम्ही दर वर्षी चित्रीकरणाचं नियोजन करून जवळपास महिनाभर सराव करतो. गणेशोत्सवात ढोल वादनातून मिळणारी ऊर्जा पुढे वर्षभर कायम राहते. गणेशोत्सवात ढोलपथकाचं सुरू असलेलं वादन, तो माहोल, मिरवणुकांमधील तो जोश या सार्या बाबी अविस्मरणीय असतात. ढोलपथक सुरू झाल्यानंतर पहिली तीन वर्षं आम्ही कुठल्या ना कुठल्या मानाच्या गणपतीसमोर वादनाची सेवा रूजू केली. अलिकडे आम्ही गणेशोत्सवात सातव्या दिवशी मुंबईत श्री सिध्दीविनायकाच्या चरणी ढोलवादनाची सेवा बजावत आहोत. अर्थात, यंदा ही संधी कितपत प्राप्त होते, हे सांगणं कठीण आहे.

सर्व समाजाने एकत्र यावं, त्यांच्यात बंधूभाव वाढीस लागावा, एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरूवात करण्यात आली. त्यापूर्वी केवळ घरगुती गणेशोत्सवच होत असे. परंतु सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात झाल्यानंतर सामाजिक सलोखा वाढण्यास मदत झाली. अर्थात, बदलत्या काळात या गणेशोत्सवाचं स्वरूपही बदललं. याला अधिक प्रमाणात उत्सवी स्वरूप प्राप्त झालं. मोठमोठ्याने वाजणारे स्पीकर्स, डॉल्बीच्या भिंती, धांगडधिंगा यातून इतरांना होणार्‍या त्रासाचा मुद्दा चर्चेत आला. वास्तविक, हा बुध्दीदात्याचा उत्सव आहे. गणपती हा कलांचा अधिपती आहे. साहजिक अशा गणेशोत्सवात उपजत कलांना वाव मिळणं गरजेचं ठरतं. त्याच बरोबर हा उत्सव सार्यांना आनंद, समाधान देणारा ठरावा हे ही तितकंच खरं. उत्सवाचा मूळ उद्देश कायम लक्षात ठेवायला हवा. अर्थात, आपल्याकडे नवरात्र असो, दिवाळी असो वा अन्य महत्त्वाचे सण असोत; त्यात रोषणाईवर, जल्लोषावर, फटाक्यांच्या आतषबाजीवर भर दिला जातो. तसा तो गणेशोत्सवात दिला जाणं साहजिक आहे. फक्त याचा कुठेही अतिरेक होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.

कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन संपल्यानंतर आयुष्य लगेचच जोमानं सुरु होणार नाही. परिस्थिती सर्वसाधारण व्हायला वेळ लागणार, हे खरं आहे. त्याच वेळी अभिनय आणि या कलेशी संबंधित गोष्टी सोडल्या तर मी दुसरं काही करू शकणार नाही, याचीही जाणीव आहे. खरं तर हा कलाकारांसाठी ‘टफ टाईम’ आहे. मात्र, ही वेळही निघून जाईल, अशी आशा आहे. तशी श्री गणेशाच्या चरणी मनोभावे प्रार्थना. त्याच्या कृपेने सारं काही व्यवस्थित व्हावं, हीच अपेक्षा आहे.

– श्रुती मराठे,प्रसिध्द अभिनेत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या