मंत्रमुग्धतेचा श्रावण
फिचर्स

मंत्रमुग्धतेचा श्रावण

उन्हाच्या तलखीनं शिणलेली शरीरं आणि मनं निवांत गारवा शोधत असताना श्रावणाच्या ओलाव्याने सपूंर्ण सृष्टीतच एक श्रान्त भाव असतो. शहरात, जंगलात, रानांमध्ये, पर्वतावर,उघडया माळरानावर, श्रावण एकाच हिरवळीच्या भावनेनं बरसत असतो. पडणार्या प्रत्येक थेबांतून पुनश्च जीवन निर्माण करण्याची अमर्याद क्षमता श्रावणात आहे. सोसलेले उन्हाळे, तडाखे, सारं काही वाहून मनाला स्वच्छ करणारा असाही एक द़ृष्टिकोन श्रावणाविषयी ठेवता येतो. कारण अपार उन्हाचा निचरा करून शांतवण्याचं सामर्थ्य श्रावणाच्या ओल्या स्वभावात आहे. तसेच ताणरहित मनाची अवस्था दूर करण्याचं सामर्थ्य देखील श्रावणात आहे.

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

‘समुद्र बिलोरी आईना, सृष्टीचा पाचवा महिना’ अशी कविवर्य बा. भ. बोरकरांची नितांत सुंदर कविता आहे. श्रावणाची सुरुवात आणि बा.भ. च्या ओळी नित्य आठवतात. दरवर्षी त्यातला गोडवा नव्यानं अनुभवाला येतो. निसर्ग असाच आहे नित्य नुतन. त्याला जुनेपणा स्पर्शत नाही. मग प्रश्न पडतो निसर्गनिर्मित मानव का जुना होतो.? नव्याच्या हव्यासापाठी किती आपण वेडे होतो. जे निसर्गनियमानुसार संपणार त्याला धरून ठेवण्याचा वृथा प्रयत्न करतो. एक सुंदर विचार करायला लावणारी कथा! एक निसर्गप्रेमी झाडाला विचारतो गळणार्या पानांविषयी. तुला दु:ख ,वाईट वाटत नाही का? झाडाचं उत्तर विचार करायला लावणारं आहे. ते म्हणतं, ‘अरे माझ्या टोकाशी नवीन कोवळी पालवी येेतेय. तिचं स्वागत करायचं, तिला निसर्गाचे नियम शिकवायचे. ते महत्वाचं की गळून ,ज्यांचं जीवन पूर्ण जगून झालंय त्यांच्या विचारानं दु:ख करायचं? जो जन्माला आला तो जाणारच. हो ना? त्याला मी आनंदानं निरोप दिलेला आहे.’ असा आपण विचार करावा, अशी शिकवण श्रावण देतो.

पाचव्या महिन्यातील नवनवतीची, धरेची गर्भछाया हिरव्या रंगानं जशी फुलुन येते त्याचं सुदंर वर्णन बा.भ. बोरकरांनी केलेलं आहे. पुढे वाढत जाणार्या सुखाच्या कल्पनेनं सुखावलेलं धरतीचं तृप्त रूप डोळा भरून पाहण्याचं सौख्य श्रावण देतो. त्याच्या या देण्यानं आनंदित न होणारा असा कोणीच नसावा.तप्त उन्हाच्या तलखीनं शिणलेली धरती आषाढात पावसाच्या आगमनानं सुखावते, सैलावते आणि श्रावणातल्या शीतल जलधारांनी चहु अंगानं फुलते. पानोपानी पावसाची गाणी आणि थेंब थेबं पाऊस थांबला तरी पडणारं पाणी. वळचणीच्या आधारानं पडत राहतं. आकाशापासून तेे धरतीपर्यंत आपलेपणाचा ओलावा सार्या श्रावणात झिरपत राहतो.

आपल्यात सामावून घेण्याचा हा श्रावणाचा गुण मनापासून भावतो. त्याच्यात आपपरभाव नाही. तो मनापासून सर्वाना सवार्ंगानी भिजवतो. जसा भाव तसा देव. तसंच श्रावणाचं असतं. जसा भाव तसा तो भावतो. कविजनांचा, पे्रमीजनांचा तो प्राणसखा आहे. बळीराजाचा तो जीवनसखा आहे. एकूण काय तो सर्वांचा आवडता. देवाधिदेव महादेवाला तो अधिकच प्रिय आहे. त्यामुळे श्रावणातल्या सोमवारी प्रत्येक शिव मंदिरात अफाट गर्दी झालेली दिसते. आजची तरुण पिढी सश्रद्ध राहिली नाही असं म्हटलं जातं. पण श्रावणातल्या सोमवारी प्रत्येक शिवमंदिरापुढे होणार्या गर्दीत तरुणाईची संख्याही अधिक असल्याचं दिसतं.

उन्हाच्या तलखीनं शिणलेली शरीरं आणि मनं निवांत गारवा शोधत असताना श्रावणाच्या ओलाव्यानं संपूर्ण सृष्टीतच एक श्रान्त भाव असतो. शहरात, जंगलात, रानांमध्ये, पर्वतावर, उघडया माळरानावर, श्रावण एकाच हिरवळीच्या भावनेनं बरसत असतो. पडणार्‍या प्रत्येक थेबांतून पुनश्च जीवन निर्माण करण्याची अमर्याद क्षमता श्रावणात आहे. उघडया बोडक्या पर्वतावरदेखील नकळत हिरवळ उगवून जाते. रुक्ष माणसालासुद्धा एखाद्या मायेचा स्पर्श लाभला तर आतला खडकाळपणा कोमल होऊन जातो. असाच श्रावणाचा स्वभाव लाभलेल्या व्यक्ती क्वचितच भाग्यवंतांच्या सहवासात येतात. श्रावणाच्या स्वभावाच्या व्यक्तींना देवानं मोठ्या प्रेमानं तयार केलेलं असावं असं वाटतं.

जो कोणी आपल्या सहवासात येईल त्यांना भारूनच टाकायचं, भावनांनी ओलंचिंब करायचं आणि सहवासानं फुलून यायला भाग पाडायचं. किती नाना रूपं सृष्टीची! किती नाना रंगाची हिरवी छाप असलेली ही वनश्री मनाला मोहून टाकते. विविध हिरव्या, पोपटी छटा, प्रौढ हिरव्या छटा. हिरवेपणाचं किती म्हणून कौतुक सागांयचं! कोवळ्या वयापासून ते परिपक्व वयापर्यंत हिरव्या रंगाचा रंगोत्सव या दिवसात बघायला मिळतो. नकळत काही ओळी आठवून जातात.

‘आला श्रावण-श्रावण घेवुनी पावसाच्या सरी,

पत्री-फुलांचा बहर, खेळ उन्ह पावसाचा नद्यांना महापूर!!

आला श्रावण-श्रावण घेवूनी पावसाच्या सरी,

गाभुळलेली धरित्री शालू नेसली गर्भरेशमी

ऑफिसच्या काचेच्या खिडक्यांच्या तावदानावरं बाहेरील पावसाचे टप्पोरे थेंब थांबलेले असतात. हळूहळू ते ओघळत जातात. खिडकीच्या तळाशी एक छोटासा थेंबांचा समुद्र तयार होतो. अशाच आठवणी मनाच्या तळाशी जमा होतात आणि मनाशी हिशेब सुरू होतो. कोण आपलं, कोण परकं ? हळव्या क्षणी जे तुटून गेले त्यांच्या आठवणी विव्हल करतात. मनाची दारं उघडावी आणि पाऊस पडण्याच्या एखाद्या निवांत क्षणी आठवणींना परवानगी द्यावी. त्या बेट्या मागचा पुढचा विचार न करता कोसळत जातात.

सोस रे माझ्या जीवा तू ,

सोसण्याचा सूर होतो .

सूर साधी ताल जेव्हा,

भार त्याचा दूर होतो.

काही प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यांना तसंच सोडावं लागतं. देवावर वाहिलेल्या निर्माल्याप्रमाणं त्यांना पावसाच्या वाहत्या पाण्यात सोडावं लागतं. नियतीनं ठरवलेल्या कालचक्राप्रमाणं जसा निसर्ग चालतो तसाच प्रयत्न आपण करावा. हे तर आपल्याला शिकायचं असतं आणि याचं शिक्षण श्रावण देतो. किती आणि कसं घ्यायचं ते आपण ठरवायचं.

श्रावणामध्ये काय नाही? सार्या सृष्टीला मुग्ध सौंदर्य देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याची ही नानाविध रुपं साकारावी अशी वाटली नाहीत असा कलाकारच नाही. अगदी कवीपासून चित्रकारापर्यंत आणि एख़ाद्या लेखकापासून चित्रपट दिग्दर्शकापर्यंत अनेकांनी श्रावणाची नानाविध रुपं रेखाटली आहे. श्रावणाचं आगमन झालं की प्रेमी जनांच्या मनात एक वेगळंच का़हूर निर्माण होतं. त्यांची ही अवस्था अनेक चित्रपटांमधून पडद्यावर व्यक्त झाली आहे. त्यामुळेच श्रावणाच्या आगमनाबरोबर अनेक गाणीही ओठांवर उमटू लागतात. अगदी सावन का महिना, पवन करे सोर’पासून ‘श्रावणात घननिळा बरसला’पर्यंत. लताच्या कोकीळकंठांनी या गाण्यांना सजवलं आहे तेवढंच श्रावणाच्या चित्रणाने त्यांना जिवंत केलं आहे.

सोसलेलें उन्हाळे, तडाखे, सारं काही वाहून मनाला स्वच्छ करणारा असाही एक द़ृष्टिकोन श्रावणाविषयी ठेवता येतो. कारण अपार उन्हाचा निचरा करून शांतवण्याचं सामर्थ्य श्रावणाच्या ओल्या स्वभावात आहे. तसेच ताण रहित मनाची अवस्था दूर करण्याचं सामर्थ्य देखील श्रावणात आहे. मनाच्या शांतीसाठी महादेवासारखे दुसरे दैवत नाही.हलाहलासारखे विष पचविणार्या महादेवाचा लाडका प्रिय श्रावण तुम्हा आम्हाला सुखकारक होत.

अरुणा सरनाईक

Deshdoot
www.deshdoot.com