Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedकलांचा अधिपती

कलांचा अधिपती

गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, थाटामाटात साजरा होत आहे. अतिशय उत्साही वातावरणात संपन्न होणार्‍या गणेशोत्सवाचं सार्‍यांनाच आकर्षण असतं.

सर्वत्र आनंद, समाधान भरून राहिलेलं असतं. परंतु या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा होत आहे. साहजिक या उत्सवात नेहमीचा उत्साह, जल्लोष याची कमतरता जाणवणार आहे. खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतला खास उत्सव. याचं कारण या उत्सवाची सुरूवात पुण्यातून झाली. नंतर तो इतरत्र साजरा होऊ लागला आणि आता तर तो जगभरात मोठ्या आनंदाने, भक्तीभावाने साजरा होत आहे. यंदा मात्र पुण्यातच कोरोनाचा अधिक प्रसार दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम असणार नाही. गणेशभक्तांच्या मनात याची खंत असणार आहे. वास्तविक, पुण्यातल्या गणेशोत्सवाचं भव्य दिव्य रूप पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातूनही लाखो भक्तगण आवर्जून येत असतात. त्यांच्या तुडुंब गर्दीने वाहणारे रस्ते, आकर्षक रोषणाई, भव्य-दिव्य देखावे ही या गणेशोत्सवाची मुख्य वैशिष्ट्यं असतात. परंतु यंदा हे सारं पहायला मिळणार नाही. साहजिक गणेशोत्सवाचा तो उत्साहही असणार नाही. परंतु गणेशभक्तांच्या मनात असणारी भक्तीची भावना तितकीच महत्त्वाची असते हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे यावेळी कोरोनाच्या संकटाचा विचार करता सार्यांनी आपापल्या घरीच गणेशपूजन, आराधना याद्वारे हा उत्सव साजरा करायला हवा. किंबहुना, हा श्री गणेशाचाच आदेश आहे, असं मानावं.आपला यंदाचा उत्सव भव्यदिव्य स्वरूपात असू नये ही त्याचीच इच्छा असावी.

- Advertisement -

अशा परिस्थितीत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे येत्या काळात अशी संकटं येत राहिली तर आपल्याला पुरेपूर काळजी घेऊन सण-उत्सव साजरे करावे लागतील. हा बदल गरजेचा ठरणार आहे. गणपती अथर्वशीर्षात ‘त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम’ असं म्हटलं आहे. आपल्या शरीरात असणार्या मूलाधार चक्रातून आज्ञाचक्राला आदेश मिळतात आणि त्यानुसार आपल्याकडून विहीत कार्य पार पाडलं जातं. परंतु मूलाधार चक्रातून आदेशच निघाले नाहीत तर काय होईल? यावरून मूलाधार चक्राचं महत्त्व लक्षात येतं. अशा या श्रीगणेशाची उपासना सर्वांगिण प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. आम्हा कलाकारांसाठी क्रिएटिव्हीटी अर्थात नवनिर्मिती महत्त्वाची ठरते. त्या दृष्टीनेही गणेश उपासना महत्त्वाची आहे. किंबहुना, आम्हा कलाकारांच्या आयुष्यात श्री गणेशाचं विशेष असं स्थान राहिलं आहे.

याचं मुख्य कारण गणपती ही कलेची देवता आहे. तो कलांचा अधिपती आहे, असं म्हटलं जातं. त्याचे आशीर्वाद कलाकारांसाठी महत्त्वाचे असतात. गणेशोत्सवाच्या काळात या गजाननाच्याच निमित्ताने विविध कार्यक्रमांद्वारे कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. कलाकारांना व्यापक प्रमाणात व्यासपीठ उपलब्ध होतं, रसिकांची भरभरून दाद मिळवण्याचं भाग्य लाभतं.

कलाकार स्वत: कलेत रमणारा माणूस असतो. त्यामुळे कार्यक्रम असोत वा नसोत, कलाकाराचा रियाज, अभ्यास सतत सुरू असतो. कला हा कलाकाराचा व्यवसाय नाही तर त्याच्या जीवनशैलीचा भाग आहे. आपण जेवण करतो, श्वास घेतो तशी कला कलाकारांच्या तना-मनात भिनलेली असते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात जाहीर कार्यक्रम होत नसतील तर आम्ही सांगितीक मार्गातून श्रीगणेशाची आराधना करू.

अर्थात, गणेशोत्सवात कला सादर करण्याचा, गाण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. आम्ही गणपतीच्या मुर्तीसमोर बसून गात आहोत, असं वाटतच नाही. तर गणपती बाप्पा आमच्याकडून गाऊन घेतोय, असंच वाटत रहातं.त्या चैतन्यमूर्तीसमोर बसल्यावर गळ्यातून आपोआप स्वर बाहेर निघू लागतात. मग अशा गाण्याचा आनंद आणि समाधान काही वेगळंच असणं साहजिक आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने असे कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक रंगत जातात आणि रसिक प्रेक्षक त्यात देहभान हरपून रंगतात.

कोरोना हे मानवजातीवर आलेलं पहिलं मोठं संकट आहे, असं म्हणता येणार नाही. यापूर्वी प्लेग, देवी अशा विकारांच्या प्रसारामुळे हाहाकार माजला होता. परंतु या व्याधींवर नियंत्रण मिळवणं, त्या हद्दपार करणं शक्य झालं. त्याच पध्दतीने कोरोनाचं संकटही लवकरच दूर होईल, अशी आशा आहे.

त्यानंतर पुन्हा पूर्वीच्याच उत्साहात आणि आनंदात जाहीर कार्यक्रम होऊ लागतील. त्याद्वारे कलाकारांना आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करता येईल. अर्थात, या संकटकाळात ऑनलाईन कार्यक्रम प्रक्षेपित केले जात आहेत. परंतु समोर प्रेक्षक बसले असताना कला सादर करणं, त्याला प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद यातलं समाधान ऑनलाईन कार्यक्रमात लाभत नाही. खरं तर आम्ही कलाकार इतके नशीबवान आहोत की कलेचा स्वत:लाही आनंद घेता येतो आणि दुसर्यांनाही देता येतो. थोडक्यात, कलेद्वारे लोकांना अस्सल आनंद दिला जातो. म्हणूनच आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो.

आम्ही मुळचे गोव्याचे आणि गोव्यात गणेशोत्सवाचं मोठं महत्त्व आहे. आपल्याकडे दिवाळीत उडवले जात नाहीत इतके फटाके गोव्यात गणेशोत्सवाच्या काळात उडवले जातात. जोडीला पणत्यांची आरासही असते. गोव्यातलं मंगेशी हे आमचं गावं. तिथं आम्हा पुरोहितांची घरं आहेत. लहानपणी बाबा आम्हाला गणेशोत्सवासाठी आवर्जून मंगेशीला घेऊन जायचे. त्यांचा त्या वेळचा उत्साह काही वेगळाच असायचा. बाबा आम्हा मुलांकडून गणेशोत्सवासाठी सजावट करून घ्यायचे. पुरोहिताचं घर असल्याकारणाने गणेशोत्सवात आमच्या घरी अनेकांचं येणं-जाणं व्हायचं. या काळात वेगवेगळे खाद्यपदार्थ केले जायचे. या कारणांमुळे आमच्यासाठी गणेशोत्सव अविस्मरणीय असायचा. नंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो.

मात्र, माझा चुलत भाऊ अजुनही मंगेशीच्या देवळात पौरोहित्य करतो. मला वेळ असतो तेव्हा आम्ही आवर्जून गावी जातो आणि घरातल्या गणपतीसमोर गायन सेवा करतो. दरम्यान, मी सांगितिक क्षेत्रात वडिलांना साथ करू लागलो. या काळात कार्यक्रमांच्या निमित्ताने बराच प्रवास करता आला. एकदा वडिलांसह अमेरिकेत कार्यक्रमासाठी गेलो होतो. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तिथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. अमेरिकेत न्यू जर्सीतल्या महाराष्ट्र मंडळातर्फे साजर्या होणार्या गणेशोत्सवात आम्हाला कला सादर करण्यासाठी बोलावलं होतं. तोही अनुभव अविस्मरणीय होता.

मी सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वप्रथम कुठे गायलो ते आठवत नाही. परंतु पुण्यातल्या सारसबाग गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, मुंबईतली गिरगावातली 100 वर्षांंपूर्वीची गणेशोत्सव मंडळं या ठिकाणी आवर्जून गायन सेवा रूजू केली. पुण्यात एक काळ असा होता की, गणेशोत्सवात चौकाचौकात गायकांच्या गायनाचे कार्यक्रम होत असत. त्यात अनेक दिग्गज कलाकारांचं गायन ऐकण्याची संधी मिळाली.

ते वातावरणच काही वेगळं होतं. नंतर गणेशोत्सवात ऑर्केस्ट्रा, नाटक यांना महत्त्व आलं आणि गायनाचे, विशेषत: शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम मागे पडले. परंतु आता अशा कार्यक्रमांना पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याच वेळी गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाचीही चर्चा होताना पहायला मिळते. खरं तर गणपती हा अभिजात कलांचा देव आहे. त्याच्या उत्सवात दर्जेदार संगीत ऐकवलं तर तो खूष होईल. त्याऐवजी गणेशोत्सवात धिंगाणा घातल्यास गणपतीला तो भावणार का, हा विचारात घेण्याजोगा भाग आहे. त्यामुळे टिळकांना अभिप्रेत असणारं गणेशोत्सवाचं स्वरूप आणि दर्जा कायम राहणं गरजेचं आहे.

मुख्यत्वे आता आपण निर्सगार्ची काळजी घेत सण-उत्सव साजरे केले पाहिजेत. निसर्गाची कसल्याही प्रकारची हानी होणार नाही, याकडे लक्ष दिलं पाहिजे. गणेशोत्सवकाळात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात निर्माल्य विसर्जित केलं जातं. गणेश मूर्तींचंही विसर्जन होतं. परंतु नदी ही आपली माता आहे. तिच्या पाण्यामुळे आपण जिवंत आहोत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे नदीचं पावित्र्य कुठेही कमी होता कामा नये. तुम्ही निसर्गाला चांगलं काही दिलं तर निसर्गही तुम्हाला चांगलंच देणार हा संदेश कोरोनाच्या संकटकाळात आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे. निसर्गाला जपाल तेवढं येणार्या पिढीला चांगलं आयुष्य जगायला मिळेल, हा विचार मनामनात रूजवणं ही आता काळाची गरज आहे.

– शौनक अभिषेकी ,सुप्रसिध्द गायक

- Advertisment -

ताज्या बातम्या