Friday, April 26, 2024
HomeUncategorizedड्रॅगनला घरचा आहेर

ड्रॅगनला घरचा आहेर

एका विषाणूने जगावर अधिराज्य गाजवलं. जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. कोट्यवधी लोकांना बेरोजगार केलं. कोरोना असं या विषाणूचं नाव. त्याची निर्मिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, असं सांगितलं जात होतं. कोरोनाच्या विषाणूची माहिती सर्वात अगोदर देणार्‍या डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलादी पडद्याआड काहीही लपवलं जात असलं, तरी कधी ना कधी त्याला वाचा फुटतेच. जगातल्या बहुतांश देशांनी कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली, याचा शोध घेतला जात असला, तरी अद्याप जग कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. अमेरिका तर सुरुवातीपासून कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा करत आली आहे.

जगात सध्या दोनशेहून अधिक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. दोन कोटींहून अधिक रुग्ण, चार लाखांहून अधिक मृत्यू आणि दररोज वाढती रुग्णसंख्या यावर मात कशी करायची, हा वैज्ञानिकांपुढचा प्रश्न आहे. जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचं काम अनेक वैज्ञानिक करत आहेत. लसींचं उत्पादन अंतिम टप्प्यात आहे. कोरोनावर अजून औषध उपलब्ध नाही.

- Advertisement -

काही ठिकाणी औषधांवरही संशोधन सुरू आहे. असं असलं तरी काही प्रश्न आजही कायम आहेत. कोरोना विषाणू कुठून आला? त्याची उत्पत्ती कशी झाली, या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. अनेक देशांनी चीनवर आरोप लावला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती झाली, असं सांगितलं जातं; परंतु चीनने हे आरोप वारंवार नाकारले. अलिकडेच मात्र नोबेल पुरस्कारविजेत्या वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरला असल्याचा दावा केला.

2008 मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारे फ्रान्सचे वायरोलॉजिस्ट लूक मॉटेंग्नियर यांनी चीनमधल्या प्रयोगशाळेत एड्सवर लस बनवण्याच्या प्रयत्नांमधून कोरोनाचा जन्म झाला असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातल्या विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेत झाली असून हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा लूक यांनी केला आहे. लस बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक विषाणू तयार झाला असल्याचं ते म्हणाले. लूक यांनी दावा केला आहे की कोरोना विषाणूच्या जीनोममध्ये एचआयव्ही आणि मलेरियाचे घटक सापडले.

वुहानची बायोसेफ्टी लॅब 2000 पासून कोरोना विषाणूवर संशोधन करत आहे. त्यामुळे नोवेल कोरोना विषाणू एखाद्या प्रकारच्या औद्योगिक अपघाताचा परिणाम असू शकतो. चीनच्या मुख्य वायरॉलॉजी प्रयोगशाळेचे संचालक युवान झिमिंग यांनी वैज्ञानिकांचा हा दावा खोडून काढला असला तरी कोणतेही पुरावे दिले नाहीत. कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याचं त्यांनी स्पष्टपणे नाकारलं. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या पी4 लॅबमध्ये प्राणघातक विषाणूंवर अध्ययन केलं जातं; पण कोरोनाचा जन्म या प्रयोगशाळेत झाला असल्याची बातमी ही अफवा आहे. प्रयोगशाळेत काम करण्याचे नियम आणि कायदे अत्यंत कठोर असल्याचं त्यांनी सांगितलं.

जगात हाहाकार माजवणार्या कोरोना विषाणूबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीवरून चीनवर पहिल्यापासूनच संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. या विषाणूची प्रयोगशाळा जगाला पाहण्यासाठी खुली करण्याचं चीनने जाहीर केलं; परंतु त्यानंतर भारताच्या गलवान खोर्यात घुसखोरी करून चीनने या प्रश्नावरचं लक्ष दुसरीकडे वळवलं. अमेरिका तसंच युरोपमधील अनेक देशांनी चीनला दोषी ठरवत हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा आरोप केला होता. यामध्येच आता चिनी महिला शास्त्रज्ञाची भर पडली आहे.

चीनमधल्या एका महिला व्हायरॉलॉजिस्टने कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा खळबळजन दावा केला आहे. तसंच आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या व्हायरॉलॉजिस्ट महिला शास्त्रज्ञाचं नाव डॉ. ली मेंग असं आहे. चिनी सरकारच्या धमकीनंतर त्या सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. प्राणाच्या भीतीने त्यांनी चीनमधून पळ काढून अमेरिकेत आश्रय घेतला आहे. डॉ. ली मेंग म्हणाल्या की जगभर विळखा घालणार्या या कोरोना महामारीची निर्मिती वुहानमधल्या प्रयोगशाळेत झाली आहे. हा विषाणू मानवनिर्मित आहे, याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत.लवकरच मी ते जगासमोर आणणार आहे.

कोरोना विषाणूबद्दल चीनने जगापासून खूप गोष्टी लपवून ठेवल्या आहेत, अशी माहिती मिळते. कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या मांस बाजारातून झालेली नाही. मांस बाजार हा स्मोक स्क्रीन आहे. विषाणू ही निसर्गाची निर्मिती नाही. हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला असून मानवनिर्मित आहे. कोरोना विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंटसारखा आहे. या आधारावर हा विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होतं. कोणत्याही विषाणूमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसं आहे की तो मानवनिर्मित आहे.

कोरोना विषाणू मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे, असं चीनचे भारतातले राजदूत सुन वीदोंग यांनी स्पष्ट केलं. अर्थात त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नव्हती. कोरोनाचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातल्या सीफूड मार्केटमधून झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

आज एका विषाणूने अख्खं जग वेठीस धरलं आहे. त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. सर्वच सरकारं हताश झाली आहेत. एका विषाणूने जगाच्या सीमा धूसर केल्या. उच्च-नीच, जात-पात-धर्म असं सगळं काही विसरायला लावलं आहे. चीनच्या हलगर्जीपणामुळे हा रोग संपूर्ण जगात पसरला. आपण या विषाणूबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवली, याचा चीनला खेद ना खंत. उलट तो देश आपल्याकडील गोपनीयतेच्या भिंती किती मजबूत आहेत, यावर खूश होत आहे; परंतु आता या भिंतीलाही सुरुंग लागला आहे.

या विषाणूचं नाव कोरोना असं पसरवण्यात चीनला यश आलं आहे. सतत या नावाचा उल्लेख करून जगसुद्धा याला कोरोना या नावानेच ओळखू लागलं. हे दुसरं तिसरं काही नसून चीनच्या परराष्ट्रविषयक धोरणाचा विजय म्हणावा लागेल. या विषाणूला जगाने चीनमधल्या शहराच्या नावाने ओळखू नये, हीच चीनची इच्छा होती. ज्या प्रांतातून तो पसरला त्याचं नाव या विषाणूला गेलं असतं तर चीनचं नाव खराब झालं असतं. खरं तर हुबे किंवा वुहान हेच त्याचं नाव असायला हवं होतं. या नावामुळे लोकांच्या मनात चीनचं नाव सतत घोळत राहील आणि काही दिवसांनंतर आपल्याला बाजारपेठ मिळणं दुरापास्त होऊन आर्थिक मंदी येईल, याची चीनला खात्री होती. त्यामुळेच चीनने अतिशय धूर्तपणे या साथीच्या रोगाला अमेरिकेला जबाबदार धरलं आणि त्या राष्ट्रानेच हा रोग पसरवल्याचे आरोप केले. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकादरम्यान शाब्दिक युद्ध पेटलं; परंतु यामध्ये ट्रम्प यांचं म्हणणं अधिक तर्कसंगत वाटतं. रोगांची किंवा विषाणूंची नावं अशा प्रकारे निवडली जातात की सामान्यातल्या सामान्य माणसालाही त्याच्या नावावरून त्याची लक्षणं आणि उगम सहज समजू शकेल. यापूर्वी अनेक वेळा व्हायरस, रोग आणि सिंड्रोम यांची नावं त्यांच्या मूळ ठिकाणांवरून किंवा उगम स्थानावरून ठेवण्यात आली होती.

सिंगापूर इअर, यलो फिवर, स्पॅनिश फ्लू, मंगोलियन सिंड्रोम, मंगोलियन स्पॉट, जर्मन गोवर, जपानी एन्सेफलायटीस, वेस्ट नाईल व्हायरस, स्वाइन फ्लू, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, सार्स ही काही यासंदर्भातली काही उदाहरणं वानगीदाखल देता येतील. हे सर्व रोग त्यांच्या मूळ ठिकाणांच्या नावावरून ठरवले गेले तर वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस असं त्याचं नाव नसण्यातच चीनने केलेल्या खेळीचं यश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या