लढा अस्मितेचा : ठेवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा

लढा अस्मितेचा : ठेवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा

आज मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन त्या निमित्त संदीप तीर्थपुरीकर यांचा विशेष लेख...

औरंगाबाद - संदीप तीर्थपुरीकर :

भलेही भारताला स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मिळाले असले तरी मराठवाड्याला भारतीय संघराज्यात सहभागी होण्यासाठी तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवस ताटकळत राहायला लागले.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी खऱ्याअर्थी मराठवाडा मुक्त झाले. निजाम संस्थानाला भारतात विलीन व्हावे लागले तो हाच दिवस. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मराठवाड्याच्या अस्मितेच्या लढ्याला आज ७२ वर्षे झाली असून या चित्तथरारक लढ्याचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीला चित्ररूपात पाहायला मिळावा यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने सिद्धार्थ उद्यानात 'हैदराबाद मुक्तिसंग्राम-मराठवाड्याची अस्मिता' नावाने भव्य संग्रहालय उभारले आहे. याठिकाणी दरवर्षी ध्वजारोहण केले जाते. राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत १७ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजारोहण सोहळा साजरा होतो.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील स्वातंत्र्यसेनानींचा सन्मान व लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. आजच्या पिढीला केवळ पुस्तकी स्वरूपातच या लढ्याविषयी माहिती मिळत असली तरी प्रत्यक्षात दृश्य रूपाने पाहण्याची संधी या संग्रहालयाच्या माध्यमातून मिळत आहे. वर्षभरात विविध शाळा याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन करून मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते.

'हैदराबाद मुक्तिसंग्राम- मराठवाड्याची अस्मिता' संग्रहालयाविषयीची माहिती

औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकापासून काहीशा अंतरावर असलेल्या सिद्धार्थ उद्यानात २० हजार स्क्वेअर फूट जागेवर हा भव्य प्रकल्प उभा राहिला आहे, सुमारे १२ हजार स्क्वेअर फुटाचे एक मजली बांधकाम असून आतमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाची माहिती देणारी शब्द-चित्र कृती आकर्षक रितीने तयार करण्यात आली आहे.

दालन सर्वसुविधा युक्त असून येथे व्यवस्थापक केबीन, संदर्भ ग्रंथांसाठीचे स्वतंत्र दालन, अग्निशमन यंत्रणा, व्हिडिओ-ऑडिओसाठी विशेष कक्ष इत्यादी निर्माण करण्यात आले. दालनामध्ये मुक्तिसंग्रामाचा संक्षिप्त इतिहास देताना, प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे-माहिती तसेच अन्य माहितीही आहे.

मराठवाड्यातील प्रमुख संतश्रेष्ठांचे पूर्णाकृती पुतळे

संत ज्ञानेश्वर (आपेगाव)

संत एकनाथ (पैठण)

संत गोरा कुंभार (तेर, उस्मानाबाद)

संत नामदेव (नरसी, हिंगोली)

संत जनाबाई (गंगाखेड, परभणी)

संत रामदास स्वामी (जांब समर्थ, जालना)

मी मराठवाडा पद्य

मराठवाड्याचे श्रेष्ठत्व आणि परिचय देणारे पद्य दर्शनी भागात असावे ही संकल्पना. यादृष्टीने प्रचलित अथवा प्रकाशित काव्य घेण्यापेक्षा नवीन निर्मिती केली गेली. सर्व संदर्भ एकत्रित करत ही रचना केली गेली.

दर्शनी भागातील म्युअरल

या दालनात प्रवेशताच मुक्तिसंग्रामाची प्रतिकात्मक रचना असलेले (किमान टू डायमेन्शन) भित्तीचित्र असावे या उद्देशाने रझाकारांचे अत्याचार, प्रदेशातील रयत आणि आंदोलनांमधून सर्व धर्मियांचा सहभाग हा आशय सांगणारी रचना केली गेली आहे. अन्य म्युअरल्समध्ये लढ्याच्या अनुषंगाने शब्द चित्रांद्वारे भिंतीवर शिल्प आहेत.

एकूण ३१ पॅनल्समधून हैदराबाद संस्थानाचा इतिहास आणि पार्श्वभूमी

-हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ, सन १८०० पासून नोंद

-१८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य बंडाचा संस्थानावर परिणाम आणि सहभाग

-१९०० नंतरच्या दोन दशकातील लोकमान्य टिळक युगाचा संस्थानावर प्रभाव

-या कालावधीत आर्य समाज आणि हिंदू महासभेचा निजामाविरुद्धचा प्रतिकार आणि लढा

-संस्थानातील जनजागृती कार्याचा मागोवा

-१९२० पासून मुक्तिलढ्याशी संबंधित ठळक घटनांचा समावेश

- हैदराबाद स्टेट काँग्रेस, कृती समिती आणि महाराष्ट्र परिषदेविषयी

- सत्याग्रह आंदोलन १९३८ (हिंदू महासभा, आर्य समाज आणि स्टेट काँग्रेस)

- मक्रणपूर परिषद १९३८

- वंदेमातरम चळवळ १९३९

- कामगार चळवळ १९४०

- जंगल सत्याग्रह, सशस्त्र कॅम्प

- भारत सरकारचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष पोलिस अ‍ॅक्शन.

या संदर्भांसह एकूण २८ पॅनल्स मध्ये सचित्र संक्षिप्त इतिहासाची सचित्र मांडणी. तसेच तीन पॅनल्समधून भूमिका व प्रास्ताविकाची मांडणी केली गेली आहे.

२८ पॅनल्स

यामधून इतिहासाचे संक्षिप्त स्वरूप मांडतना प्रामुख्याने तत्कालीन कागदपत्र, छायाचित्रे, मुद्रित वर्तमानपत्रे, मुक्तिसंग्रामावर आधारित संशोधन निबंध, प्रमुख पुस्तके यांचा समावेश यामध्ये संदर्भ म्हणून उपयोग करण्यात आला आहे. हे करत असताना सल्लागार समितीमधील सदस्यांशी चर्चा करून हा इतिहास रेखाटला गेला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com