जो बिडेन, कमला हॅरिस आणि आपण

जो बिडेन, कमला हॅरिस आणि आपण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बिडेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी स्थलांतरितांबाबत उदार धोरण स्वीकारायचं ठरवलं असून उच्चशिक्षितांना मोठ्या प्रमाणावर व्हिसा देण्याचं ठरवलं आहे. त्यांनी कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली आहे. या पदासाठी निवडणूक लढवणार्‍या त्या पहिल्या गौरेतर अमेरिकन भारतीय महिला असणार आहेत....

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी स्थलांतरितांबाबत उदार धोरण स्वीकारायचं ठरवलं असून उच्चशिक्षितांना मोठ्या प्रमाणावर व्हिसा देण्याचं ठरवलं आहे. रोजगार आधारित व्हिसावर ट्रम्प प्रशासनाने घातलेली बंदी आपण उठवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्रम्प यांनी एच1बी व्हिसावर बंदी घातली असून सध्या ग्रीनकार्ड देण्याचंही थांबवलं आहे. बिडेन यांनी पर्यावरणाविषयीही पोषक असं धोरण ठरवलं असून ट्रम्प यांची जागतिक व्यापारविरोधी धोरणं बाद करण्याचा पण केला आहे. बिडेन विजयी होऊन ही धोरणं प्रत्यक्षात आली तर त्याचा जगाला आणि भारताला फायदाच होणार आहे.

कोरोनाच्या आपत्तीचं निमित्त करून अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा मनोदय ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. वास्तविक, कोरोनाशी मुकाबला करण्यात ट्रम्प यांना अपयश आलं आहे. अमेरिकेत कोरोनाचे 55 लाख रुग्ण असून त्यापैकी 29 लाख बरे झाले आहेत. परंतु पावणेदोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील कोरोनाविरोधात आपण खूप चांगली कामगिरी करत असल्याच्या थाटात ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. अमेरिकन सरकारने टाळेबंदीही जाहीर केली नाही आणि स्वतः ट्रम्पही दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत मास्क घालत नव्हते. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीस रंग भरू लागला आहे. जो बिडेन यांनी कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली आहे. या पदासाठी निवडणूक लढवणार्‍या त्या पहिल्या गौरेतर महिला असणार आहेत. निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स यांचं आव्हान असेल. पेन्स हे सध्या अमेरिकेचे उपाध्यक्ष आहेत.

कमला या कॅलिफोर्नियातून खासदार म्हणून निवडून आल्या असून तिथल्या ऍटर्नी जनरल म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पोलीस खात्यात विविध सुधारणा व्हाव्यात म्हणून त्या सतत आग्रह धरत असतात. त्या 55 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल स्थलांतरित होते. कमला यांच्या आई श्यामल गोपालन-हॅरिस यांचा जन्म चेन्नईत झाला. त्या कर्करोग संशोधक होत्या. अकरा वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. कमला यांचे वडील डोनाल्ड हॅरिस यांचा जन्म जमैकाचा. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. कमल आणि त्यांची बहीण माया यांच्या बालपणीच आई-वडील विभक्त झाले. कमला यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. 2017 मध्ये त्या खासदार म्हणून निवडून आल्या. अमेरिकेच्या इतिहासात किमान दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. 1984 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने गिराल्डिन फेरारो यांना तर 2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाने सारा पालिन यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही स्त्रियांचा निवडणुकीत पराजय झाला. अमेरिकेला कधीही गौरेतर उपाध्यक्ष लाभला नाही. बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकले. या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांचा विजय झाल्यास, अमेरिकेत एक नवा इतिहास रचला जाईल.

कमला हॅरिस विजयी व्हाव्यात, ही केवळ अमेरिकेतल्या भारतीयांचीच नव्हे तर आपल्या देशातल्या लोकांचीही इच्छा असेल. ट्रम्प यांच्यासारखा अविवेकी अध्यक्ष पुन्हा निवडून येण्याची शक्यता दिवसेंदिवस अंधुक होत चालली असून जो बिडेन अध्यक्ष होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होण्याची नक्कीच शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, आपण केवळ एकाच टर्मपुरता अध्यक्ष राहणार असल्याचं बिडेन यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. अशा वेळी 2024 मध्ये कमला या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतात. कमला हॅरिस हे भारतीय-अमेरिकन समाजाच्या राजकीय उत्कर्षाचं ठळक उदाहरण आहे. अमेरिकेतले 45 लाखांच्या संख्येतले भारतीय-अमेरिकन हे उच्चशिक्षित आहेत. हा वांशिक समुदाय सधन आहे. हा वर्ग झपाट्याने अमेरिकन राजकारणात प्रवेश करू लागला आहे. निवडणूक लढवून विजय मिळवला जातो तेव्हा आपल्याला या देशाने स्वीकारलं आहे, असं स्थलांतरित समुदायातल्या व्यक्तीला वाटतं. आज भारतीय अमेरिकनांपैकी दोघेजण अमेरिकेतल्या दोन प्रांतांचे गव्हर्नर असून दहाजण राष्ट्रीय संसदेत आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार हा स्त्री वर्गातला असेल, असं आश्वासन बिडेन यांनी दिलं होतं. बहुसंख्य अमेरिकन जनतेच्या दृष्टिकोनातून कमला या ‘ब्लॅक अमेरिकन’ म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्या वर्गातूनही बिडेन यांना मोठा पाठिंबा मिळू शकतो. जून महिन्यामध्ये जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाची अमेरिकन पोलिसांकडून हिंसक पद्धतीने नाहक हत्या झाली. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कृष्णवर्णीयांविरुद्धच्या या राक्षसी वर्तनामुळे अमेरिकेतच नव्हे, तर जगभर संतापाची लाट उसळली होती. त्यातून अमेरिकन पोलिसांना असलेली अमर्याद सत्ता आणि व्यवस्थेतले दोष पुढे आले. दमनकारी इतिहासाच्या खुणा हटवण्यासाठी जमाव रस्त्यावर आला. व्यवस्थेविरुद्ध सुरू असलेल्या या लढ्यात एका जमावाने बॉस्टनमधल्या कोलंबसच्या पुतळ्याचा शिरच्छेद केला. फ्लॉइडच्या हत्येमुळे वंशद्वेषविरोधी आंदोलनाला धार आली असून ट्रम्प यांच्या उजव्या, वंशवर्चस्ववादी सत्तेविरुद्ध असंतोष व्यक्त होऊ लागला आहे.

कमला हॅरिस या वांशिक तसंच स्त्री-पुरुष समानतेचं प्रतीक बनल्या आहेत. वास्तविक, भारतीय-अमेरिकन समुदाय हा अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने खूप छोटा आहे. तरीही या समुदायातल्या प्रतिनिधीची उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड व्हावी, हे लक्षणीय आहे. याउलट, काहीशे वर्षांचा इतिहास असलेल्या अमेरिकेचा अविभाज्य भाग असलेल्या लॅटिनोजना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेली नाही. 19 नोव्हेंबर 1493 रोजी कोलंबस या युरोपियन दर्यावदर्याला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपमधून आलेल्या साथीच्या अनेक रोगांमुळे तसंच युरोपियनांशी झालेल्या संघर्षात जवळजवळ 95 टक्के मूळ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले. युरोपियनांच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे त्यांचं प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन-अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली आणि मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये रहावं लागलं. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं. 1860 च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरी आजही तिथल्या कृष्णवर्णीयांविरुद्धचा श्वेतवर्णीयांचा असंतोष धुमसतच आहे.

दुसरीकडे, भारतीय अमेरिकन समुदाय हा आता अमेरिकेच्या मुख्य धारेत आला आहे. त्यामुळे कमला हॅरिस उपाध्यक्ष झाल्या तर त्या भारताला खास वागणूक देतील, असं मानायचं कारण नाही. त्यांना अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र धोरण चौकटीत राहूनच काम करावं लागणार आहे. फक्त अन्य कोणा अमेरिकन व्यक्तीपेक्षा त्यांना भारताची अधिक ओळख असेल, हे नक्की. परंतु त्या बिडेन यांच्यापेक्षा अधिक उदारमतवादी विचाराच्या आहेत. कमला यांचा दृष्टिकोन प्रागतिक, खुला आणि सर्वसमावेशकवादी आहे. भारतातलं नरेंद्र मोदी सरकार हे उजव्या विचारांचं असलं, तरी त्यांच्याबरोबर सहकार्याने काम करत, उभय देशांचं हित पाहणं हेच अमेरिकेच्या आगामी अध्यक्ष व उपाध्यक्षांचंही कर्तव्य असेल.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कमला हॅरिस यांनी आरोग्यक्षेत्रातल्या सुधारणांना पाठिंबा दिला. तसंच कागदोपत्री नोंद नसलेल्या स्थलांतरितांनाही नागरिकत्व देण्याची मानवतावादी भूमिका घेतली. सॉल्ट वेपन्सवर बंदी घालावी, असा आग्रह त्यांनी धरला. तसंच श्रीमंतांवर कर लादण्याचं समर्थन केलं. ट्रम्प प्रशासनाला अडचणीत आणणारे टोकदार प्रश्नही त्यांनी अनेकदा विचारले. विशेष म्हणजे, कमला हॅरिस यांनी स्मार्ट ऑन क्राइम : अ करियर प्रॉसिक्युटर्स प्लॅन टु मेक यूएस सेफर, सुपरहिरोज आर एव्हरीव्हेअर आणि द ट्रुथ्स वुइ होल्ड तसंच अमेरिकन जर्नी ही पुस्तकंही लिहिली आहेत. लहान मुलांसाठीही त्यांनी लेखन केलं आहे. मात्र सॅन फ्रॅन्सिस्कोच्या जिल्हा ऍटर्नीपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी वैधानिक मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला, असा आरोप झाला होता. तसंच त्यांच्या पतीच्या लॉ फर्मच्या क्लायंट असलेल्या एका कंपनीविरुद्धची चौकशीही त्यांनी रोखून धरल्याचं प्रकरण गाजलं होतं.

कमला हॅरिस यांना निवडणुकीसाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. परंतु त्या शेवटी अमेरिकेच्या नेत्या आहेत आणि अमेरिकेचं राष्ट्रहित जपणं हेच त्यांचं प्रथम कर्तव्य असेल आणि ते योग्यच आहे. त्यामुळे भावनेच्या भरात जाऊन भारतीयांनी भाबडेपणाने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा करणं, गैरच ठरेल.

- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com