नाथाभाऊ, आव्हान अजून संपलेलं नाही !

भाजपात गेली चार दशकं तन-मन-धनाने योगदान दिलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. भाजपाने अन्याय केल्याने नाथाभाऊंना राष्ट्रवादीत जावं लागलं. मात्र, राष्ट्रवादीत गेल्यावर सर्वच प्रश्न चुटकीनिशी सुटतील; असे खडसे समर्थकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. भाजपाप्रमाणेच राष्ट्रवादीतही प्रस्थापित व्हायचे असेल तर नाथाभाऊंना आक्रमक स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. जुळवून घेण्याची संयमी भूमिका घ्यावी लागेल... हेमंत अलोने
नाथाभाऊ, आव्हान अजून संपलेलं नाही !

नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा त्यांच्या रुतब्याला साजेसा झाला. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे पाऊण डझन मंत्री सोहळ्याला हजर होते.

या सर्वांची उपस्थिती खडसेंचे राजकीय वजन अधोरेखित करत होती. खडसे आल्याने खान्देशात पक्ष बळकट होईल; खडसे काय चीज आहे ते दाखवू देऊ, असे विधान पवारांनी केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ‘टायगर अभी जिंदा है’ सांगत खडसेंचे महत्त्व विषद केले.

प्रवेशानंतर खडसेंनी माझ्यामागे इडी लावली तर मी ‘सीडी’ लावेल, असे सांगून भविष्यात आपण आक्रमकच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांचा वावर. पवार चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांना उद्याचं राजकारणही स्पष्ट दिसतं. खडसे पक्षात आल्यानंतर खान्देशातील सध्याच्या नेत्यांचा क्रम खाली सरकणार आहे. त्यामुळे उगाच पक्षात भांडण-तंटे नकोत, म्हणून सर्वच प्रमुख नेत्यांना व्यासपीठावर खडसेंच्या सोबत बसवलं.खडसेंच्या विरोधात जे वर्षानुवर्षे एकाकी लढले, त्या जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्यांना सूत्रसंचलनाची जबाबदारी दिली गेली. भुसावळचे संतोष चौधरी आणि खडसेंचे राजकीय वाद अवघ्या जिल्ह्याला ज्ञात आहेत. ते चौधरीही प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार झालेत. यातून सर्वांनाच ‘एकोप्या’चा संदेश दिला गेला.

आपल्या सोबत 10 आमदार व 10-15 माजी आमदार आहेत, असे नाथाभाऊ परवा म्हणाले होते. सध्या आमदार असलेले एकही जण खडसेंसोबत जाहीरपणे असणार नाही, हे अपेक्षितच होते. कारण पक्षांतर बंदीची कुर्‍हाड कोसळण्याची भीती आहे. याचमुळे खडसेंच्या स्नुषा खा. रक्षा खडसे यांनीही भाजपातच राहणे पसंत केले आहे. खडसे समर्थक भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही भाजपासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

खडसेंचे खंदे समर्थक भुसावळचे नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी आज सोशल मीडियात टाकलेल्या एका पोस्टवर भाजपाचे कमळ ठळकपणे वापरले आहे. यातून त्यांनीही द्यायचा तोच संदेश दिला आहे. एकूणच काय तर नाथाभाऊंच्या जवळ असलेली पण पदावर असलेली मंडळी मनाने भाऊंसोबत तर तांत्रिकदृष्ट्या भाजपासोबत असणार आहेत. 10 ते 15 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे नाथाभाऊंनी सांगितले होते. मात्र, तसे घडले नाही. तळोद्याचे माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी, जळगावचे माजी आमदार गुरुमुख जगवाणी या दोघांसह 72 जणांनी खडसेंसोबत प्रवेश केला. यातही खान्देशातील ‘माजीं’ची संख्या अधिक आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अकोला येथील काही समर्थकांचाही प्रवेश झाला. यातून खडसेंचे नेतृत्व केवळ खान्देशपुरते मर्यादित नसल्याचा संदेश दिला गेला.

खडसेंच्या पक्ष प्रवेशाला जे महत्त्व पवारांनी दिले, त्यावरुन खडसेंचे पुनर्वसनही साजेसेच होणार, हे स्पष्ट आहे. खडसेंसाठी नियोजन आयोगात पद निर्माण करण्यात येणार असल्याच्या वावड्या दोन दिवसांपासून उठत असल्या तरी खडसे हे त्यावर संतुष्ट होणारे नाहीत.

दमदार खात्याचे मंत्रिपदच त्यांना हवे असणार आणि पवारांनी त्याची तजवीजही केलीच असणार. लवकरच खडसे मंत्रिमंडळात दिसतीलही. खान्देशात राष्ट्रवादी भक्कम करायची असेल तर आणि राज्यस्तरावर खडसेंचा प्रभावी उपयोग करुन घ्यायचा असेल तर त्यांना मोठी जबाबदारी देणे अपरिहार्यच आहे.

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, उद्या त्यांना मोठे मंत्रिपद मिळाले म्हणजे सर्वकाही सुरळीत झाले; असे खडसे समर्थकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रमच म्हणावा लागेल. राज्यस्तरावर म्हणा की, जिल्हास्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठाबहूल नेतृत्वाची संख्या तुलनेने मोठी आहे. खडसे राष्ट्रवादीत आल्यामुळे किमान खान्देशात पहिल्या क्रमांकाचे नेते म्हणून खडसेंकडेच पाहिले जाईल. त्यामुळे सध्याच्या प्रस्थापित मराठाबहूल नेतृत्वाला खडसेंचे नेतृत्व लगेच मान्य करणे थोडे जिकिरीचेच जाईल.

रेल्वे रुळ बदलतानाही खडखडाट होतोच. नवे नेतृत्व आल्यानंतर सध्याच्या नेतृत्वाला जुळवून घेताना थोडा खडखडाट संभवतो. येथेच नाथाभाऊंची कसोटी लागणार आहे. चार दशकांपासून खडसे भाजपात होते. राष्ट्रवादी आणि काँगे्रस हे त्यांचे परंपरागत विरोधक होते. भूतकाळात राजकीय अभिनिवेषातून ही मंडळी दुखावली गेली असल्यास आता त्यांच्यासोबत काम करताना नाथाभाऊंना भूतकाळ विसरावा लागणार आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास भुसावळच्या संतोष चौधरींशी त्यांचे राजकीय वैमनस्य होते. दोघांनीही एकमेकांवर कमरेखालचे वार केले आहेत. आता त्याच चौधरींसोबत नाथाभाऊंना काम करायचे आहे.

सावकारे प्रत्यक्ष सोबत नसले तरी मनाने ते जवळच असल्याने ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागणार आहे. भाजपात नाथाभाऊंचा 40 वर्षे वावर होता. मात्र, राष्ट्रवादीत आल्या आल्याच ‘सिनिअ‍ॅरिटी’ मिळवण्याची घाई केल्यास वाटचालीत अडथळे संभवतात.

खडसे राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे समर्थक आज ना उद्या येतीलच. येणार्‍या निवडणुकांमध्ये काय चित्र असेल, हे आजच सांगता येणार नसले तरी त्याची पायाभरणी मात्र आतापासूनच होणार आहे. खा. रक्षा खडसे येणार्‍या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी भाजपा सोडणार नाहीत. त्यामुळे रक्षा खडसेंसाठी काही निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपात राहूच द्यावे लागणार आहेत. सत्ता पदे देताना नवे कार्यकर्ते व जुणे कार्यकर्ते यांच्यात संतुलन ठेवावे लागणार आहे.

अन्य सहकारी संस्थांमध्ये पदे देतानाही काळजी घ्यावी लागणार आहे. घरातच पदे दिल्याचा आरोप नाथाभाऊंवर झाला आहे. आता त्यांना तशी काळजी घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संभाव्य सत्ताबदल करतानाही दक्षता घ्यावी लागणार आहे.

राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसे आता सत्ताधारी आघाडीचे नेते झाले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हेदेखील सत्ताधारी आघाडीतच आहेत. आ. पाटील यांनी खडसेंची कन्या सौ. रोहिणी यांचा केलेला पराभव खडसे विसरतील, असे वाटत नाही. स्वतः आ. पाटील यांनीही खडसेंचा हस्तक्षेप मुक्ताईनगर मतदारसंघात खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. गरज पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असेही आ. पाटील म्हणतात. खडसे मंत्री झाल्यास साहजिकच त्यांना जळगावचे पालकमंत्रिपद हवे असणार.

आज हे पद सेनेच्या गुलाबराव पाटलांकडे आहे. शिवसेना हे पद सहजासहजी सोडेल, असे वाटत नाही. पालकमंत्री शिवसेनेचा असताना खडसेंचा वरचष्मा राहिल्यास किमान जिल्ह्यात आघाडीत संघर्ष उभा राहू शकतो. तो टाळणे नाथाभाऊंसाठी कौशल्याचे असेल. त्यामुळे शिस्तीची एक चौकट खडसेंना पाळावी लागणार आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केला, महत्त्वाचं पद मिळालं म्हणजे नाथाभाऊंचे प्रश्न संपणारे नाहीत. त्यासाठी त्यांना आक्रमक स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा पक्षांतर झाले, पण संघर्ष कायमच राहील. (उत्तरार्ध)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com