Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनाथाभाऊ, संक्रमण लाभदायी ठरो !

नाथाभाऊ, संक्रमण लाभदायी ठरो !

भाजपाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे खान्देशातील वजनदार नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून आज शुक्रवारी राष्ट्रवादीचे घड्याळ ते मनगटावर बांधणार आहेत.

तब्बल चार दशके भाजपात घालविल्यानंतर ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला; त्याच राष्ट्रवादी पक्षात नाथाभाऊंना जावे लागते आहे, हे वेदनादायीच आहे.

- Advertisement -

नाथाभाऊंबाबत भाजपा नेतृत्व अन्यायाने वागले, हे निर्विवाद असले तरी ही स्थिती का ओढवली; याचाही ताळेबंद मांंडला गेला पाहिजे.

1990 साली खडसे प्रथम विधानसभेवर निवडून आले आणि 2019 पर्यंत ते विधानसभेत होते. विधानसभेत एक अभ्यासू चेहरा अशी ख्याती त्यांनी सुरुवातीपासूनच मिळवली होती.

स्थापनेपासून भाजपासोबत असलेल्या खडसेंनी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखणार्‍या काळात त्यांनी पक्षासोबत ओबीसींचा लोंढा जोडला. पक्षाला जनाधार मिळवून दिला, सत्तापदेही मिळवून दिली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या खान्देशच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपाचा मजबूत गड बनविला.

या काळात नाथाभाऊ केवळ खान्देशचे राहिले नाहीत तर त्यांनी राज्यस्तरावर भाजपाचे नेतृत्व केले. पहिल्या युती शासनात महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली. त्याचा खुबीने उपयोग करुन घेतला. काँग्रेसच्या काळात वर्षानुवर्षे रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती दिली. स्वतंत्र तापी पाटबंधारे महामंडळ स्थापन केले. 2009 ते 2014 या काळात खडसे विरोधी पक्षनेते झाले. सुरुवातीला आणि नंतरही महत्त्वाची मंत्रिपदे भुषवली असली तरी खडसेंच्या कारकिर्दीला खर्‍या अर्थाने बहर आला तो विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधीतच.

सत्ताधार्‍यांना सळो की पळो करुन सोडले. राज्यात आघाडीची सत्ता असली तरी 2014 पर्यंत खान्देशबाबतचे सर्व निर्णय नाथाभाऊंना विश्वासात घेतल्याशिवाय होत नसत. याच काळात नाथाभाऊंवर आरोपांच्या फैरीही झडल्या. खुद्द शरद पवारांनी तोडपाणी विरोधी पक्षनेता म्हणून खडसेंना अंगावर घेतले.

भाजपाचा आक्रमक तसेच आश्वासक चेहरा म्हणून खडसे पुढे आले. विरोधी पक्षनेता म्हणजे पक्षाचा सभागृहातील नेता असतो, पुढे सत्ता आल्यास आपसूक मुख्यमंत्रिपदावर दावाही असतो. खडसे विरोधी पक्षनेते असतानाच भाजपात केंद्रीय पातळीवर मोदी पर्वाचा उदय झाला. याच काळात खडसेंना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद देण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. ‘एक व्यक्ती, एक पद’ याप्रमाणे खडसेंनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले असते तर विरोधी पक्षनेते पद सोडावे लागले असते.

मात्र, पुढे सत्ता यायची असेल तर मलाच विरोधी पक्षनेतेपद सांभाळावे लागेल असे नाथाभाऊंनी निक्षून सांगितले. खडसेंनी नकार दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे प्रदेशाध्यक्षपद चालून गेले. केंद्रात भाजपांतर्गत बदलेलेली समीकरणे पाहता फडणवीस केंद्रीय नेतृत्वाच्या गुड बूकमध्ये गेले तर खडसे ऐकत नाही; असा संदेश वरपर्यंत गेला.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेसोबतची अनेक वर्षांची युती तोडण्यासाठी खडसेंना पुढे केले गेले. युती तुटली, निवडणूक झाली मात्र भाजपाचे स्वबळावर सत्तेचे मनसुबे उधळले गेले. पुढे मुख्यमंत्री आपल्यालाच व्हायचे आहे, हे गृहित धरुन खडसेंनी प्रकृती साथ देत नसतानाही निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या मनात वेगळेच होते. खडसेंऐवजी गुड बूकमध्ये असलेल्या फडणवीसांच्या नावावर पक्षाने एकमत केले. नाथाभाऊंसाठी हा मोठा धक्का होता. शपथविधीच्या आधीच नाथाभाऊ अडून बसले. नाथाभाऊंनी ज्यांना आमदार केले ते 20- 25 आमदार तरी नाथाभाऊंसाठी आग्रही राहतील, किमानपक्षी खान्देेशातील भाजपा आमदार तरी खडसेंसाठी अडून बसतील, अशी अटकळ होती.

मात्र, असे झाले नाही. खडसेंसाठी तो पहिला अपशकून होता. अखेर दोन नंबरचे मंत्रिपद, अर्धा डझन वजनदार मंत्रिपदे देऊन खडसेंची मनधरणी केली गेली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचूनही मुख्यमंत्री दालनापर्यंत न जाता आल्याने खडसे नाराज होतेच. खडसे अनुभवी तुलनेने फडणवीस अगदीच नवखे. खडसेंचा दरारा फडणवीसांपेक्षा मोठा. मंत्रिमंडळ बैठकीतही खडसेंचाच तोरा. अधिकार्‍यांवर रुबाबही खडसेंचाच. यातच मुख्यमंत्र्यांबाबत ‘लूज टॉकिंग’. पंढरपुरात बहुजन मुख्यमंत्र्यांचा राग आळवला.

या सार्‍या प्रसंगी फडणवीस शांत राहिले. मात्र ‘वर’ पर्यंत सारे पोहचवीत राहिले. वर्ष-दीड वर्ष खडसे शॉडो कॅबिनेट चालवित राहिले. दरारा आरेरावीपर्यंत पोहोचला. वक्फ बोर्डाच्या जमिनीची दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली. मोदींसोबत उठबस असलेल्या काही उद्योगपतींनाही याची झळ पोहोचल्याची चर्चा रंगू लागली. दाऊदच्या बायकोशी फोनवर संभाषण, भोसरीतील जमीन खरेदी प्रकरण अशी अनेक प्रकरणे एकामागोमाग समोर आणली गेली. नाथाभाऊ आरोपांनी घेरले गेले. आरोपांमागील बोलविता धनी कोण आहे, हे खडसेंनी वारंवार ध्वनीत करण्याच्या प्रयत्न केला. विरोधक शांत असले तरी स्वकियांनाच खडसेंची अडचण होऊ लागली. अखेर जून 2016 मध्ये खडसेंचा राजीनामा घेतला गेला व शहाजोगपणे आपण स्वतःहून राजीनामा दिला; असे खडसेंना सांगायला लावले.

चौकशी समिती नेमली, अहवाल आल्यावर खडसे निर्दोष ठरतील, असे फडणवीसच म्हणू लागले. खडसेंचे निर्दोषत्व सिध्द झाल्यावर त्यांना पुन्हा सन्मानाने मंत्रिमंडळात घेऊ, अशीही ग्वाही दिली गेली. मात्र, चौकशीचे गुर्‍हाळ सुरुच राहिले. भाजपाच्या सत्ता काळात चौकशी समितीचा अहवालही मांडला गेला नाही. केवळ आरोप झाल्यावर राजीनामा मागणार्‍या भाजपा नेतृत्वाने अन्य कलंकित मंत्र्यांबाबत मात्र सोईची भूमिका घेतली. तीन वर्षे खडसे संघर्ष करीत राहिले, फडणवीसांवर आरोप करु लागले. केंद्रीय नेतृत्वाने खडसेंना साधी भेटही दिली नाही. खडसेंचा अपमान सुरु असताना पध्दतशिरपणे गिरीश महाजनांना बळ दिले गेले. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक अशी प्रतिमा त्यांची तयार झाली. सुरुवातीला नाथाभाऊंच्या पादुका ठेवून जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळणार, असे सांगणार्‍या चंद्रकांत पाटलांनीही खडसेंना झुलवित ठेवण्याशिवाय काहीही केले नाही.

खडसे समर्थकांचा उद्रेक वाढत होता, निर्णय घेण्यासाठी दबाव वाढत होता. मात्र, खडसेंनी ठाम भूमिका घेण्यास टाळाटाळ केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी रक्षा खडसे यांना उमेदवारी देतानाही नाथाभाऊंचा जीव टांगणीला लागला होता. नाथाभाऊंच्या सभांना मोठा टीआरपी मिळत होता, गोपीनाथ गडावरही खडसेंनी भाजपाला थेट आव्हान दिले. मुलाखती, बातम्यांमधून नाथाभाऊ झळकत राहिले. इशार्‍यांवर इशारे देऊ लागले; मात्र निर्णय होत नव्हता. पक्षाशी एवढे फाटले की, भाजपाने गेल्या निवडणुकीत थेट तिकिटच कापले. कन्या रोहिणी खडसेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. मात्र, बळ भलतीकडेच दिले. खडसेंचे परंपरागत विरोधक चंद्रकांत पाटील आमदार झाले.

कन्येचा पराभव खडसेंच्या जिव्हारी लागला. सारे काही समजत होते पण तरीही निर्णय होत नव्हता. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सार्‍याच पक्षांची आवतनं येत होती. असे म्हणतात, विधानसभेच्या वेळी नाथाभाऊंच्या नावाचा एबी फॉर्मही राष्ट्रवादीने दिला होता, मात्र खडसेंनी तेव्हाही कच खाल्ली. खडसेंसारखा मुरब्बी नेता पक्षाबाबत एवढा आशावादी कसा राहिला; हे कोडेच आहे. खडसेंची नाराजी हा चेष्ठेचा विषय झाला. रिपाइंच्या रामदास आठवलेंनी नाथाभाऊंना आमंत्रण दिले. आपले सरकार आणू असेही सांगितले. आठवलेंची भूमिका प्रामाणिक असेलही पण राज्यस्तरावर तो चेष्ठेचाच विषय झाला.

खडसेंच्या पक्षांतराबाबतचे अनेक मुहूर्त सांगितले गेले. मात्र, खडसेंनी मौन सोडले नाही. अखेर बुधवारी खडसेंनी भाजपाचा त्याग केला. चार दशकांची सोबत दोन ओळींच्या राजीनाम्याने संपुष्टात आली. राजीनामा देताना खडसे भावुक होते. मात्र, फडणवीसांवर ठपका ठेवण्यास ते विसरले नाहीत. आज नाथाभाऊ राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधणार आहेत. त्यांच्यासोबत कोण कोण असेल, हे अद्याप स्पष्ट नाही.

नाथाभाऊ सांगतात 10 आमदार सोबत आहेत, पण तसे चित्र आज तरी दिसत नाही. मनाने असतीलही पण जाहीरपणे समोर येऊन पक्षाशी पंगा घेण्याची कोणाची तयारी नाही. खडसेंच्या स्नुषा रक्षाताईदेखील भाजपातच राहणार आहेत. पद वाचवण्यासाठी कदाचित ही आगतिकता असेल. अशीच स्थिती काही अन्य आमदारांचीही असू शकते.

मात्र, नाथाभाऊंच्या रुपाने राष्ट्रवादीला भक्कम बहुजन चेहरा मिळाला आहे. खान्देशात राष्ट्रवादीच्या भरभराटीला हे पोषकच ठरेल. नाथाभाऊंची नवी इनिंग आजपासून सुरु होत आहे. महत्त्वाचे सत्तापद त्यांना निश्चितच मिळेल. ते भाजपातून राष्ट्रवादीत संक्रमण करीत आहेत. हे संक्रमण भाऊंच्या राजकीय भविष्यासाठी तसेच खान्देशच्या विकासासाठी लाभदायक ठरो, ही अपेक्षा. (पूर्वार्ध)

- Advertisment -

ताज्या बातम्या