शास्त्रीय संगीतातील हिमालय
फिचर्स

शास्त्रीय संगीतातील हिमालय

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आज मन खूपच उदास आहे. विव्हल आहे. डोळ्यांमधून ओघळणार्‍या अश्रूंवर माझे नियंत्रण नाही. आज मी माझ्या गुरुजींच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेऊ शकत नाही.

पंडित जसराज यांच्यासारखे गुरू मला लाभले हे माझे सौभाग्य होय. त्यांच्या संगीतविश्वाशी जोडून घेणे, त्याची अनुभूती घेणे हा एक अलौकिक अनुभव होय. पंडित जसराज मला त्यांच्या प्रिय शिष्यांमध्ये समाविष्ट करीत असत, याहून मोठे भाग्य कोणते! त्यांच्या प्रेमवर्षावात मी अखंड भिजत राहिलो. मन, आत्मा, विचार, भाव हे सारेच या वर्षावाने धन्य झाले. त्यांच्या एवढ्या आठवणी आहेत, की त्यातली नेमकी कोणती सांगावी, असा प्रश्न पडतो. विचार थांबले आहेत. तरीही गुरूंना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करीत आहे.

पंडित जसराज हे शास्रीय संगीताच्या क्षितीजावर तळपणारा सूर्य होते. शास्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांनी नवनवीन प्रयोग केले. 1970 मध्ये त्यांनी नव्या धाटणीच्या जुगलबंदीचा प्रयोग सुरु केला. त्याला जसरंगी म्हटले जाते. यामध्ये एक गायक आणि एक गायिका आपापल्या रागामध्ये गातात आणि अंतिमतः दोघे एका स्केलवर येतात. असा प्रयोग त्यापूर्वी झाला नव्हता. श्री वल्लभाचार्य यांनी रचलेल्या मधुराष्टकममध्ये भगवान श्रीकृष्णाची अत्यंत मधुर स्तुती आहे. पंडितजींनी ती आपल्या माधुर्यपूर्ण स्वरातून घराघरात पोहोचवली. वयाच्या 82 व्या अंटार्क्टिकावर आपल्या स्वरांची पखरण करणारे पंडितजी अद्वितीय आणि एकमेव होते. सातही खंडांमध्ये आपले कार्यक्रम करणारे पंडितजी हे पहिले भारतीय होते. पंडित जसराजांची वैश्विक पातळीवर लोकप्रियता इतकी प्रचंड आहे आणि त्यांच्या स्वरांवर प्रेम करणारा वर्ग इतका मोठा आहे की इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने अंतराळातील एका ग्रहाला त्यांचे नाव दिले. या ग्रहाचा क्रमांक आहे 300128. या संख्येचंही एक वैशिष्ट आहे, ते म्हणजे तो उलटा वाचल्यास ती गुरुजींची जन्मतारीख आहे. शास्रीय संगीताकडे दुर्बोध म्हणून पाहणार्‍या वर्गाला या अवीट कलेची गोडी लावण्याचे आणि ते सहजसुलभ बनवून सुश्राव्य करण्याचे काम पंडितजींनी केले.

आयुष्यभर त्यांनी प्रयोगशीलता जोपासली. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही त्यांचा स्वरांवरचा ताबा जराही ढळत नसे. ही किमया त्यांनी साधना, रियाज आणि श्रद्धेतून साधली. त्यांचा श्वास आणि ध्यास केवळ स्वर हाच होता. उच्चारांमधील स्पष्टता आणि शुद्धता ही त्यांच्या ख्याल गायकीची वैशिष्टे होती. ख्याल गायकीनंतर ते एखादे भजन सादर करायचे तेव्हा सभोवतालचे वातावरण पूर्णतः अध्यात्मिकतेनं भारुन जायचे. 1990 मध्ये पंडित जसराज इंदौरच्या विख्यात शनिमंदिरात शनैश्चर जयंती समारंभासाठी आले होते. मी त्यांच्याकडूनच संगीत शिक्षण घेण्याचे निश्चित केले होते. त्यांना भेटून संगीत शिकविण्याची विनंती केली. त्यांनी व्यस्ततेचे कारण सांगून मला साफ नकार दिला. परंतु मी निश्चय केलाच होता. त्यांचे छायाचित्र मी माझ्या रियाजाच्या खोलीत लावले आणि त्यांच्याकडे पाहून रियाज करू लागलो. त्यांचे संगीत ऐकत राहिलो. अभ्यास करीत राहिलो. हा घटनाक्रम सहा वर्षे सुरू होता.

महाराष्ट्रात अकोला येथे त्यांचा कार्यक्रम आहे, असे एकदा समजले. मी तो ऐकण्यासाठी गेलो. त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी तानपुरा घेऊन मंचावर बसायला सांगितले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. संधी मिळताच त्यांना माझे संगीत ऐकविले. ते म्हणाले, अरे हे तर माझ्या प्रकारातीलच संगीत आहे. मी लागलीच म्हणालो, गुरुजी, तुमच्याकडून तर शिकलो आहे. ते म्हणाले, मी तर तुला शिकवलेच नाही. मला माझे सगळे शिष्य लक्षात आहेत. मी त्यांना सांगितले की, मी तुमच्या छायाचित्राकडे पाहून रियाज करतो. ते भावूक झाले आणि उद्गारले, तुम्ही लोक असे का करता? तेव्हापासून मी त्यांच्या जवळचा झालो. एकलव्याप्रमाणे मला कायम आश्रमाबाहेर राहावे लागले नाही. त्यांनी मला आपलेसे केले हे माझे परम सौभाग्य आहे.

1999 नंतर त्यांच्या वारंवार भेटीगाठी झाल्या. त्यांचे सान्निध्य आणि स्नेह मला मिळाला. ते सतत संगीतातच आकंठ बुडालेले असत आणि तेच आपल्या शिष्यांना शिकवीत असत. त्यांची शिकविण्याची पद्धत अगदीच वेगळी होती. समोरासमोर बसून गुरु-शिष्य परंपरेतील शिक्षण तर ते देतच असत; शिवाय चालताना, बोलताना काही ना काही शिकवीत असत. गायनाचे नियम आणि रियाज या बाबतीत ते कठोर होते. माझ्या शिक्षणाच्या पहिल्याच दिवशीची गोष्ट आहे. ते मला राग भैरवमधील ख्याल शिकवीत होते. एका जागेवर मी वारंवार अडकत होतो. ती जागा मी भरून काढूच शकत नव्हतो. जेव्हा 20-25 वेळा प्रयत्न करूनही मला जमले नाही, तेव्हा त्यांनी तानपुरा हाती घेतला. मी समजून चुकलो की, आता योग्य प्रकारे गायले नाही, तर ते मला मारतीलच. त्याच मुद्रेत ते उठून उभेही राहिले. घाबरलेल्या अवस्थेतच मी ती जागा पुन्हा एकदा गायिली. तेव्हा ते म्हणाले, अच्छा... म्हणजे तू याच पद्धतीने शिकणार तर..!

खूप आठवणी आहेत पंडितजींच्या काय-काय सांगू? पंडितजींनी नेहमीच नवे संगीतकार, गायक, वादक यांना प्रोत्साहन दिले आणि शक्य ती सर्व प्रकारची मदतही केली. एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला की ते त्याच्या बारीक-सारीक गोष्टींचीही काळजी घेत. माझ्या महत्त्वाकांक्षी इंदौर म्युझिक फेस्टिव्हलसाठी त्यांना आमंत्रित करण्यानिमित्ताने मी मुंबईला त्यांच्याकडे गेलो होते. यावेळी जो चालक सोबत आला होता, तो नवीन होता. त्याने मला विचारले, तुम्ही इंदौरचे आहात का? मी होकार दिल्यावर त्याने विचारले, तुमच्या मुलीचे नाव सानिका आहे का? मला आश्चर्यच वाटले. वाहनचालकाला हे कसे ठाऊक? मी त्यांना विचारले तेव्हा त्याने खुलासा केला की, आदल्याच दिवशी काहीजण गाडीतून मुंबईच्या रस्त्यावरून जात होते आणि एका गाडीच्या मागे सानिका नाव लिहिले होते. पंडितजींनी सर्वांना विचारले सानिका शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का? सर्वांनी नकार दिल्यावर पंडितजी म्हणाले, सानिका म्हणजे कृष्णाची बासरी. एवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी सर्वांना सांगितले की, इंदौरला माझा गौतम नावाचा शिष्य आहे, त्याच्या मुलीचे नाव सानिका आहे. याचाच अर्थ पंडितजींची माया, स्नेह केवळ समोरासमोर नव्हता. संपूर्ण कुटुंबाशी त्यांचा स्नेह जडत असे. जानेवारी महिन्यातच माझी पत्नी अदिती हिच्या वाढदिवसाला पंडितजींनी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी बातचित केली होती. पंडितजी तेव्हा बडोदा येथे होते.

ज्या-ज्यावेळी ते इंदौरला येत असत, त्या-त्यावेळी घरचेच जेवण करणे पसंत करीत असत. अर्थात बाहेरचे अन्न तसेही ते कधीच खात नसत. परंतु इंदौरला आल्यावर माझी पत्नी आदिती हिच्या हातचे जेवण त्यांना आवडत असे. उज्जैनच्या सिंहस्थात ते आले होते तेव्हा इंदौरहून त्यांची फ्लाइट लेट झाली. मी आणि अदिती टिफिन घेऊन विमानतळावर पोहोचलो. विमानतळाच्या प्रतीक्षालयात गप्पा मारताना त्यांनी विचारले, एखादा कागद आहे का तुझ्याजवळ? मी होकार दिल्यावर ते म्हणाले, घे लिहून. मी लिहू लागलो; परंतु काही समजले नाही. ते म्हणाले, हा राग बहार आहे. मी म्हणालो, तो तर मला येतच नाही. तेव्हा ते झटकन बोलले, म्हणून तर शिकवतोय. अशा रीतीने गुरूजींकडून जे काही शिकायला मिळाले ती माझी मोठी संपदा आहे. त्या संगीताची साधना करणे हेच माझ्ये ध्येय आहे. सुनील बुद्धिराजा यांनी लिहिलेल्या ‘रसराज-जसराज’ या पुस्तकात पंडितजींच्या शिष्यांच्या यादीत मला स्थान मिळाले, हा माझा गौरवच आहे. त्यामुळे आलेली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न हेच जीवन आणि हेच संगीत!

पंडितजींनी सांगितलेली एक गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. ते म्हणाले होते, एकवेळ स्वतःला विकावे लागले तरी चालेल; परंतु घरी आलेल्या कोणत्याही कलाकाराला नाराज होऊन परत जाऊ देऊ नका. या वाक्यावरूनच पंडितजींची उंची समजून येते. कला आणि कलाकाराला त्यांच्या मनात किती आदराचे स्थान होते, हे यातून दिसून येते. असा सरस्वतीपुत्र आपल्याला लाभला हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. मी माझ्या गुरूजींना शतशः प्रणाम करतो. त्यांना आदरांजली वाहतो.

गौतम काळे,शास्त्रीय गायक, इंदूर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com