Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपरिवर्तन आणि नवा भारत

परिवर्तन आणि नवा भारत

समाज जीवनात दोन प्रकारे परिवर्तन होत असते. एक अंतर्गत परिवर्तन आणि दुसरे बाह्य परिवर्तन. प्रत्येक कालखंडात समाजमनाच्या अंतर्मनाचे परिवर्तन होईल,

असे काही विषय समोर येत असतात. या मानसिक परिवर्तनाचा प्रभाव व्यक्तीकडून कुटुंबावर आणि कुटुंबाकडून सामाजिक व्यवहारावर पडत असतो. हाच बदल राष्ट्राची तत्कालीन ओळख बनतो. इंटरनेटच्या प्रसारामुळे जग लहान झाले आहे. यापुढे आणखी बदल घडून येतील. परंतु आजचे हे परिवर्तन पाहून ते आणणारा आणि परिवर्तित होणारा समाजही बुचकळ्यात पडला आहे. हे सर्व कशासाठी घडत आहे, अशा शब्दांत हे आश्चर्य एकमेकांशी बोलताना व्यक्त होत असते आणि ते एक सुचिन्ह आहे.

- Advertisement -

भारतात एकत्र कुटुंबाची प्रथा अनेक वर्षे होती. चार-चार पिढ्या एकत्र राहत असत. लोक अन्य राज्यांत किंवा परदेशांतही नोकरी किंवा छोटा व्यवसाय करण्यासाठी जात असत. त्यातील अधिकांश लोक आपल्या कुटुंबाला आपल्या आईवडिलांच्या किंवा भावांच्या भरवशावर सोडून जात असत. आपल्या कमाईचा मोठा हिस्सा ते आपल्या गावी पाठवीत असत. परंतु 1950 ते 60 च्या दशकापासून नोकरीसाठी बाहेर जाणारा माणूस, भले नोकरी छोटी असो वा मोठी असो, अगदी कारखान्यांमध्ये मजुरी करणारा माणूससुद्धा आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ लागला. हा माणूस वर्षातून एकदा आपल्या गावी हमखास येत असे. आपल्या समाजजीवनात परिवर्तन होण्यास हे एक मोठे कारण ठरले. अन्य राज्यांमधील किंवा देशांमधील राहणीमान, पोशाख, भाषा आदींचे संस्कार लोकांवर होऊ लागले. परंतु या परिवर्तनाचा वेग खूपच कमी होता.

महिला ज्यावेळी नोकरीसाठी घराबाहेर पडू लागल्या, तेव्हा कुटुंबांमध्ये मोठे परिवर्तन घडून आले. गेल्या चार दशकांपासून कामकरी महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे ही एक गरज बनून गेली आहे आणि तिथेच या महिलांच्या मुलांचे संगोपन होते. घरातील तरुण महिला कामावर जाऊ लागल्यानंतर ज्येष्ठांना घरात राहणे अवघड होऊ लागले. त्यांच्यासाठी सरकारी आणि खासगी वृद्धाश्रमांची व्यवस्था सुरू झाली. पाळणाघरात मुले आणि वृद्धाश्रमात ज्येष्ठ मंडळी सुखी राहू शकत नाहीत, ही उघड बाब आहे. परंतु परिवर्तन तर सुरूच राहिले. परिवर्तन आणण्यात सरकारचा आणि व्यवस्थेचा मोठा हातभार राहिला. परंतु गेल्या सहा वर्षांमध्ये जे परिवर्तन घडून आले, त्याची कल्पनाच पूर्वी कधी केली गेली नव्हती. आठ कोटी गरिबांच्या घरांमध्ये दिवे आणि कंदिलाच्या ऐवजी विजेचे बल्ब आले आणि त्यांचे चिमुकले अंगण उजळले. जंगलातून लाकूडफाटा आणणे किंवा शेतातून, पायवाटेवरून चालत गेलेल्या गाई-म्हशींचे शेण गोळा करून त्यापासून शेण्या बनवणे, त्या पेटवून स्वयंपाक करताना डोळे चोळणे आणि पुसणे हेच आपले नशीब आहे असे मानणार्‍या महिलांच्या घरात गॅस सिलिंडर पोहोचला. अशा अनेक गोष्टींमुळे समाजात मोठे परिवर्तन दिसून येऊ लागले.

गावे एकमेकांना जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणण्याची योजना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती. परंतु 2014 पासून सरकारच्या या मोहिमेने जोर धरला आणि आजमितीस ज्या गावांना रस्ता पोहोचलेला नाही, अशी गावे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच उरली असतील. पंतप्रधानांनी ‘आयुष्मान भारत’ योजनेची घोषणा केल्यानंतर एका आठवड्यातच आजारी स्त्री-पुरुषांना आणि मुलांना त्याचा लाभ होऊ लागला. आजाराच्या वेळी उपचारांची खात्री असण्याची भावना सर्वांत मोठी आहे. ज्यांच्या घरांमध्ये आजतागायत कोणत्याही आजाराने प्रवेश केलेला नाही, त्या घरांमधील लोकांनाही आज खात्री आहे की, आपल्या खिशात फुटकी कवडी नसली तरीसुद्धा आपल्याला उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही. कारण बाकी काही नसले तरी आपल्याकडे ‘आयुष्मान भारत’ योजनेचे पाच लाख रुपये आहेत. स्वयंपाकासाठी चूल घरांमध्ये आवश्यक असते. त्याचबरोबरीने प्रत्येक घरात पाणी आवश्यक असते.

गावागावात पाण्याच्या पाइपलाइन विस्तारण्यात येत आहेत. पाणी, वीज, स्वच्छ इंधन आणि रस्ते… सुखमय जीवनाचे हेच खरेखुरे आधार होत. बदल दिसत आहे. रस्ते चांगले होण्याचा मोठा प्रभाव लोकांच्या मनावर पडत असतो आणि आता तो दिसतो आहे. शेतकरी खूश तर जग खूश, असे म्हणतात. अन्नदात्याची मनस्थिती चांगली असावी, यासाठी सरकारने विशिष्ट रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर पोहोचविण्याची योजना सुरू केली. 2015 मध्येच सरकारने सुरू केलेल्या जन-धन योजनेचा परिणाम दिसून येऊ लागला होता. घोषित रक्कम लाभार्थीच्या थेट बँक खात्यात पोहोचू लागली.

गावात राहणारे जे लोक दररोज कामासाठी शहरात येतात, त्यांच्याकडून गावात होणार्या बदलांची माहिती दररोज मिळत असते. आमच्या घरी कामास असलेल्या दोन भावांकडून अशीच माहिती मिळते.

कोरोनाकाळातील दुसर्‍याच महिन्यात त्यांच्या घरातील सर्व खातेदारांच्या (दोन महिला आणि तीन पुरुष) खात्यावर दोन-दोन हजार रुपये आले. सुविधांनी युक्त अशा या बदलाला इंटरनेट आणि डिजिटल क्रांती कारणीभूत आहे, हे मान्य करावे लागेल. गावातून बाहेर जाऊन कमाई करणार्या पुरुषांना घरी आपल्या पत्नीला पैसे पाठविताना असंख्य अडचणींचा मुकाबला करावा लागत असे. त्यांची कमाई मधल्या मध्ये लुटणारेही होते.

आज त्या पत्नीच्या थेट खात्यात पैसे येतात. तेही अगदी मोजक्या मिनिटांत. अशा सर्व सुविधा मनुष्याच्या आणि समाजाच्या व्यवहारांत परिवर्तन आणत असतात. आज तंत्रज्ञानाच्या नवनवीन आविष्कारांना व्यवहारात आणले जात आहे. समाजात सुख आणि शांती दिसत आहे. मनुष्यजीवनात आलेल्या परिवर्तनामुळेच समाजही बदललेला दिसतो आहे. हा बदल सकारात्मक भावना उत्पन्न करणारा आहे. शोषण, शोषक आणि शोषित यासारखे शब्द समाजातून हद्दपार होऊ लागले आहेत. रामराज्यात वर्णन केलेली व्यवस्था जशीच्या तशी आजच्या समाजात आणण्याची भाषा करणे ही अतिशयोक्ती ठरेल. राज्यव्यवस्थेचा तो एक आदर्श आहे. परंतु तरीही प्रत्येक शासकाकडे जनतेच्या जीवनात आनंद आणण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. या इच्छाशक्तीच्या बळावरच नियम आणि व्यवस्था तयार होते.

प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने दोन हात दिले आहेत. प्रत्येक माणूस कमावतो आणि खातो. प्रत्येकाकडील कौशल्य वेगवेगळे असते. कोणत्याही आपत्तीत सरकार आपल्याला मदत करेल अशी खात्री प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. अशी खात्री वाटू लागणे हाच बदल असतो. कोरोनाकाळात ‘सेवा दूत’ बनून हजारो लोक सरसावले आणि प्रत्येकाला दिवसरात्र सेवा मिळाली. हा मोठा बदल मानला पाहिजे. पोलिस, डॉक्टर, नर्स, सरकारी अधिकारी, कर्मचारी आतापर्यंत लोकांच्या अपशब्दांचेच धनी ठरत असत. आज त्याच लोकांच्या तोंडून या कर्मचार्‍यांची प्रशंसा बाहेर पडत आहे. त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. या सार्‍याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधले पाहिजे. एवढे मोठे परिवर्तन अखेर घडले कसे? अशाच प्रकारे अनेक क्षेत्रांमध्ये आज परिवर्तन दिसत आहे. म्हणूनच समाज बदलल्यासारखा वाटत आहे.

– डॉ. मृदुला सिन्हा,माजी राज्यपाल, गोवा

- Advertisment -

ताज्या बातम्या