उद्दिष्ट दोन अब्ज लसींचं !

उद्दिष्ट दोन अब्ज लसींचं !

आज प्रत्येकजण कोरोना लसीच्या प्रतीक्षेत आहे. पुढच्या वर्षाच्या प्रारंभी प्रभावी लस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.आपल्याकडे भारत बायोटेक कंपनीच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांकडे, त्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही लस कधी उपलब्ध होणार, कोरोनाविरोधात ती कितपत प्रभावी ठरणार, याबाबत या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी व्यक्त केलेलं मनोगत.

‘कोवॅक्सिन’ ही व्हेरो-सेल व्यासपीठावर तयार करण्यात आलेली निष्क्रिय स्वरुपाची लस असून अशा प्रकारच्या लसींच्या निर्मितीची प्रक्रिया आणि पद्धत विज्ञानाचे सर्व निकष पूर्ण करणारी आणि स्वीकारार्ह आहे. आयसीएमआरकडून मिळालेला कोरोनाचा निष्क्रिय विषाणू पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये विलग करण्यात आला. त्यानंतर भारत बायोटेकने या निष्क्रिय विषाणूपासून लसनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली. पोलीओ, रेबिज, रोटाव्हायरस, जपानी एनसेफॅलिटिज, चिकुनगुन्यासारख्या आजारांवरील लस तयार करणार्‍या भारत बायोटेकला निष्क्रिय स्वरुपाच्या लसनिर्मितीचं संपूर्ण ज्ञान आणि अनुभव आहे. याच अनुभवाच्या बळावर कंपनीने सार्स-कोव्ह-2 म्हणजेच कोरोना विषाणूवरील लसीच्या निर्मितीला सुरूवात केली.

गेल्या काही दशकांपासून आपण अशा निष्क्रिय स्वरुपाच्या लसींचा वापर करत आलो आहोत. हंगामी फ्लू, पोलीओ, परट्यूसिस, रेबिज, जपानी एनसेफॅलिटिजच्या लसनिर्मिती प्रक्रियेत याच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यातल्या निष्क्रिय किंवा मृतवत विषाणूमुळे लस टोचल्यानंतर संसर्ग होण्याचा किंवा विषाणू स्वत:ची प्रतिकृती तयार करण्याची कोणतीही शक्यता उरत नाही. ही लस म्हणजे रोगप्रतिकारक क्षमतेसाठी फक्त एक मृत विषाणू असतो आणि अँटीबॉडिजही विषाणूंविरोधात प्रभावीपणे काम करू लागतात.

प्रत्येकजण कोरोनाविरोधी लसीची अत्यंत आतुरतेने वाट बघत आहे. लस कधी येणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. लसनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल सांगायचं तर ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. एखादी लस बाजारात यायला दहा ते पंधरा वर्षांचा काळ लागू शकतो. रोटा व्हायरसची लस बाजारात आणायला आम्हाला 16 वर्षांचा कालावधी लागला होता.

टायफॉईड काँजुगेट लसीला बारा वर्षं लागली. लसींच्या निर्मितीला लागणारा प्रदीर्घ कालावधी बघता कोरोनाची लसनिर्मिती प्रक्रिया त्या मानाने खूप वेगाने होते आहे असंच म्हणावं लागेल. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोवॅक्सिन उपलब्ध होऊ शकेल, असं मला वाटतं. अर्थात हे सगळं या लसीला परवानगी देणार्‍या संस्थांवर अवलंबून आहे.

लसीला परवानगी देणार्‍या संस्थांकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे लसीला मंजुरी देऊन विक्री सुरू करणं किंवा पहिल्या तसंच दुसर्या चाचणीनंतरही समाधान न झाल्यास तिसर्या चाचणीचा आग्रह धरणं. मात्र विविध देशांमधली कोरोना लसनिर्मिती तसंच लसीला मंजुरी देण्याची वेगवान प्रक्रिया बघता कोवॅक्सिन या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असा विश्वास वाटतो. कोवॅक्सिनचे मानवी चाचण्यांचे सगळे टप्पे यशस्वीपणे पार केल्यास मोठ्या प्रमाणावर डोस उपलब्ध करून देणं फारसं कठीण नाही. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर अगदी कमी कालावधीत लस बाजारात येईल.

या लसीच्या चाचण्यांबद्दल सांगायचं तर सुरूवातीला आम्हाला पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातल्या चाचण्यांची परवानगी मिळाली. या चाचणीसाठी आम्हाला 1200 कार्यकर्ते हवे होते. देशभरातल्या दहापेक्षा अधिक केंद्रांमध्ये चाचण्या सुरू करण्यात आल्या. यासाठी आम्हाला कोविड निगेटिव्ह लोकांची निवड करायची होती. कोरोना तपासणी केल्यानंतरच त्यांची या चाचणीसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या कार्यकर्त्यांना लस द्यावी लागली. आम्ही सर्वचजण कोवॅक्सिनच्या निर्मितीसाठी अगदी प्रामाणिकपणे झटत आहोत.

आमची व्यावसायिक कंपनी असली तरी आर्थिक लाभ किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी आम्ही काम करत नाही. विषाणूंची संख्या वाढायला पंधरा दिवसांचा काळ लागतो. सगळं काही एका दिवसात होत नाही. त्यामुळे प्रत्येक चाचणीनंतर निकाल यायला किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. आम्हाला सुरक्षित आणि दर्जेदार लस उपलब्ध करून द्यायची आहे आणि यासाठी काही काळ जावा लागणार हे लोकांनी समजून घ्यायला हवं.

लसीची चाचणी नेमकी कशी केली जाते, काय प्रक्रिया असते याबद्दल मी थोडी माहिती देतो. लस टोचल्यानंतर एखाद्या विषाणूने आपल्यावर हल्ला केला आहे, असा समज शरीर करून घेतं. ही लस निष्क्रिय असते. म्हणजे त्यातले विषाणू निष्क्रिय किंवा मृत झाले असल्यामुळे त्यांची संख्या वाढत नाही. मात्र आपण विषाणूच्या संसर्गाला बळी पडलो आहोत, असं शरीराला वाटतं. हा संसर्ग रोखण्यासाठी शरीर त्या निष्क्रिय प्रथिनाचा प्रतिकार करू लागतं.

शरीराची रोगप्रतिकारक क्षमता त्या दृष्टीने काम करू लागते. शरीराने या विषाणूविरोधात लढण्याची क्षमता विकसित केली की विसाव्या दिवशी आम्ही या चाचणीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या रक्ताचे नमुने घेतो. हे रक्ताचे नमुने आमच्या प्रयोगशाळेत पाठवले जातात. तिथे रक्ताचा संपर्क सक्रीय विषाणूशी घडवला जातो. या वेळी रक्तातल्या सक्रीय विषाणूची संख्या वाढता कामा नये. ही संख्या वाढली नाही तरच लस प्रभावी आहे, असं म्हणता येईल.

कोरोना लसीच्या निर्मितीची वेगवान प्रक्रिया बघता तिचे दीर्घकालीन दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, अशी धास्ती अनेकांना वाटत आहे. आमची कंपनी 22 वर्षं जुनी आहे. आजवर आम्ही 16 लसी उत्पादित केल्या आहेत. आम्ही नव्या कोर्‍या लसींची निर्मिती केली. रोटा व्हायरस, टायफॉईड काँजुगेटविरोधी लसी ही त्याचीच काही उदाहरणं आहेत. टायफॉईड काँजुगेटची जगातली पहिली लस आम्हीच तयार केली. त्यामुळे आम्हाला या क्षेत्राचं पूर्ण ज्ञान आहे.

दुसरं म्हणजे भारतीय कंपन्यांची उत्पादनं कमी दर्जाची असतात, असाही समज प्रचलित आहे. मात्र हा समज चुकीचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या दर्जात्मक परिमाणांचं पालन आम्ही करतो. जीएसके, सॅनेझीसारख्या कंपन्या आणि भारत बायोटेकच्या लसी आणि औषधांचा दर्जा समान असतो.

सुरक्षेच्या दृष्टीनेही आम्ही त्याच मानकांचं पालन करतो. त्यामुळे कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीपेक्षा आम्ही तसूभरही कमी नाही. आता लसीच्या दुष्परिणामांबद्दल सांगायचं तर कोरोना हा पूर्णपणे नवा विषाणू आहे. ही नव्या आजाराची साथ आहे. त्यामुळे या विषाणूच्या वागणुकीबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. याबाबतचा अभ्यास ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे.

आम्ही रोटा व्हायरसच्या लसी मोठ्या प्रमाणावर उत्पादित करतो. भारत बायोटेक रोटा व्हायरस लसींची जगातली सर्वात मोठी उत्पादक आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आम्ही रोटा व्हायरसच्या 300 दशलक्ष लसी उत्पादिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लसींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणं शक्य आहे. अर्थात, एक अब्ज तीस कोटी लसींच्या निर्मितीसाठी आम्हाला इतरांची साथ लागणार आहे. त्या दृष्टीनेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. लसीला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही 100 ते 200 दशलक्ष डोस उत्पादित करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. या नव्या विषाणूला समजून घेतल्यानंतरच पुढे जाता येणार आहे.

यासाठी आम्ही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तयारी ठेवली आहे. रणनीती, धोरणं ठरवत आहोत. मात्र यासाठी काही काळ जावा लागणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर किंमतीबाबत बरेच प्रश्न विचारले जातात. कोरोना लसनिर्मिती प्रक्रियेसाठी तुम्ही किती पैसे गुंतवले हा प्रश्न अनेकजण विचारतात. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी रोटा व्हायरसच्या लसीचं उदाहरण देतो. अमेरिका आणि युरोपमध्ये रोटा व्हायरसची लस 85 डॉलर्सना मिळते आणि आम्ही या लसीचा एक डोस एक डॉलरला विकणार असल्याचं माननीय पंतप्रधानांना सांगितलं होतं. आम्ही एवढ्या कमी किंमतीत ही लस उपलब्ध करून देतो. महत्त्वाची बाब म्हणजे हे करताना दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. भारतीय कंपन्यांना अजिबात कमी लेखू नका, असं मी आवर्जून सांगेन.

मुख्य म्हणजे रोटा व्हायरसची लस आम्ही 120 देशांना पुरवतो. देश कोणताही असला तरी आमच्या एका डोसची किंमत एक डॉलरच असते. मात्र कोरोना लसीची किंमतही एवढी असेल, असं मी आत्ताच ठामपणे सांगू शकणार नाही. पण ती शक्य तितक्या कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसंच ही लस सर्वात आधी कोणाला दिली जाईल, याबाबतचा निर्णय आम्ही नाही, तर सरकारच घेईल.

- डॉ. कृष्णा एल्ला,व्यवस्थापकीय संचालक, भारत बायोटेक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com