लस भविष्यात, प्रतिबंध आत्ता

लस भविष्यात, प्रतिबंध आत्ता

प्रत्येकजण कोरोनावरील लसीची आतुरतेने वाट बघत आहे. ही लस कधी उपलब्ध होणार, ती किती प्रभावी ठरणार अशा प्रश्नांची उत्तरं मिळायला काही काळ जावा लागेल. त्यामुळे सध्या तरी हा विषाणू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांना पर्याय नाही. कोणत्याही आजाराला प्रतिबंध करणं महत्वाचं असतं. जीवनशैलीत सकारात्मक बदल करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. त्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार्या मुद्द्यांचा हा आढावा.

उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला असं म्हटलं जातं. एखादा आजार झाल्यानंतर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी आधीपासून काळजी घेणं योग्य ठरतं. काही आजार लसीकरणाने आटोक्यात ठेवता येतात. 2025 पर्यंत क्षयरोगाचा नायनाट करण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. एके काळी थैमान घालणारा देवीसारखा आजार आता अस्तित्वात नाही. आजारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. आज बर्याच आजारांवर प्रभावी औषधं उपलब्ध आहेत. मात्र कोणताही आजार झाल्यावर शारीरिक त्रास होणारच. त्यातच औषधोपचारांवर होणारा भरमसाठ खर्च बघता नको तो आजार, असंच वाटून जातं. सध्या जीवनशैलीशी संबंधित मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉल अशा आजारांचं प्रमाण वाढत आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायामाने या आजारांना दूर ठेवता येतं. मात्र सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हे सगळं मागे पडलं आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आरोग्याची हेळसांड केली जात आहे. याच कारणामुळे अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत पन्नाशी-साठीनंतर होणारे आजार आता पंचवीशी-तिशीतच गाठू लागले आहेत. विविध उपकरणं, दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे शारीरिक हालचाल, चालणं कमी होऊ लागलं. बैठ्या जीवनशैलीने यात भर घातली. मुलं मैदानी खेळांपेक्षा स्मार्टफोनमधले गेम्स खेळण्यात धन्यता मानतात. बाहेरचे, प्रक्रिया केलेले, पाकिटबंद पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. वेदनांपासून तात्पुरता आराम मिळवण्यासाठी वेदनाशामक औषधं घेतली जातात. वेदनेच्या मुळापर्यंत जाऊन कायमस्वरुपी उपचार घेणं टाळलं जात आहे.

निरोगी जीवनशैलीचा अंगिकार किती महत्त्वाचा आहे हे कोरोना विषाणूमुळे आपल्या लक्षात येऊ लागलं आहे. साध्या डोळ्यांना न दिसणार्या या विषाणूने आपलं आयुष्यच बदलून टाकलं. घरातून बाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो. गर्दीची ठिकाणं टाळावी लागतात. भाज्या, फळं स्वच्छ धुवून आणि निर्जंतुक करूनच साठवून ठेवावी लागतात. घरात येणारी प्रत्येक वस्तू, पदार्थ निर्जंतुक केला जात आहे. दुधाने पोळल्यानंतर आपण ताकही फुंकून पिऊ लागलो आहोत. कोणताही धोका पत्करण्याची आपली तयारी नाही. आजार किती तापदायक ठरू शकतो, हे कोरोना विषाणूने दाखवून दिल्यामुळे आता वारंवार हात धुणं, प्रतिबंधात्मक उपाय, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं, ताजं व सकस अन्न खाणं अशा गोष्टी केल्या जात आहेत. हातांवरच्या रोगजंतूंमुळे रोगराई पसरत असल्याचं माहीत असूनदेखील हात धुण्याकडे अनेकदा दुर्लक्षच होत असे. मात्र कोरोनामुळे आता ती सवय लागली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कोविड-19 म्हणजे फ्लू. मात्र त्यावर अजूनही प्रभावी औषध उपलब्ध झालेलं नाही. लसींवर काम सुरू आहे. मात्र लस कधी उपलब्ध होणार हे सांगता येत नाही. त्यातच लस घेतल्यानंतर कोरोनापासून किती काळ संरक्षण मिळणार याबद्दल शास्त्रज्ञ अचूकपणे काहीही सांगू शकत नाहीत. सध्या चाचण्यांवर चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र अजून तरी यश दृष्टिपथात आलेलं नाही. आता आपल्याला कोरोना विषाणूसोबत रहावं लागणार असल्यामुळे प्रतिबंधाशिवाय पर्याय नाही. त्यातच भविष्यात कोरोनासारखे इतर आजार उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच आपण निकोप, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करायला सुरूवात करायला हवी.

आपलं शरीर वातावरणातल्या रोगजंतूंचा, विविध आजारांचा सामना करायला सक्षम असतं. मात्र आपण शरीराला ती संधीच देत नाही. शरीराचा पूर्ण क्षमतेने वापरच होत नाही. बैठी जीवनशैली, आरामदायी आयुष्य जगताना आपण आपल्या शरीराला पांगळं करू लागतो. मुळात शरीराला नैसर्गिक सुरक्षाकवच लाभलं आहे. विषाणूने हल्ला केल्यावर शरीरात इंटरफेरॉन स्रवू लागतं. या रसायनामुळे विषाणू पहिल्या टप्प्यातच नष्ट होतो. शरीराला आराम मिळाल्यावर इंटरफेरॉन स्रवू लागतं. याच कारणामुळे आजारपणात आरामाचा सल्ला दिला जातो. पांढर्या पेशी हे शरीराचं दुसरं सुरक्षा कवच असतं. सायटोटॉसिक्स हा पांढर्या पेशींचा एक प्रकार आहे. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर या पेशी परफॉरिन नामक रसायनाद्वारे संसर्ग भेदतात. यानंतर ग्रेंजाईम्सची निर्मिती करून संसर्ग नष्ट केला जातो. तिसरं सुरक्षा कवच म्हणजे अँटीबॉडिज (प्रतिपींड). विषाणूशी लढत असताना शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अँटीबॉडिज तयार करत असते. याच अँटीबॉडिजमुळे एकच विषाणू शरीरावर पुन्हा हल्ला करू शकत नाही. हे नैसर्गिक सुरक्षा कवच अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला पुरेशी झोप घेणं, नियमित व्यायाम, ताणतणाव कमी करणं, योगासनं, सकस आहार, ङ्गकफ जीवनसत्त्वयुक्त आंबट फळांचं सेवन, भरपूर पाणी पिणं, न्याहरी करणं असे नेम पाळावे लागतात.

आयुर्वेदात निरोगी जीवनशैलीला महत्त्व देण्यात आलं आहे. या शास्त्राने ब्राह्ममुहुर्तावर उठायला सांगितलं आहे. ब्राह्ममुहुर्त म्हणजे सूर्योदयाआधीचे दोन तास. या काळात आपण स्वत:ला दिवसभरासाठी तयार करू शकतो. शरीराला आवश्यक ते पोषण देऊ शकतो. अगदी ब्राह्ममुहुर्त जमला नाही तरी शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करायला हवा. काही काळानंतर तुम्हाला ही सवय लागेल आणि लवकर उठल्यावर ताजंतवानं वाटेल. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चेहर्यावर पाणी मारा. हा डोळ्यांचा खूप चांगला व्यायाम आहे. घसा बसल्यावर आपण गुळण्या करतो. मात्र नियमित गुळण्या केल्यामुळे घशातले मुलायम टिश्यू स्वच्छ होतात. आयुर्वेदाने अभ्यंगाचं महत्त्व सांगितलं आहे. आंघोळीआधी अंगाला तेल लावायला हवं. रोज एवढा वेळ नसेल तर आठवड्यातले किमान तीन दिवस तरी अभ्यंगस्नान करायला हरकत नाही. त्यातही नाक, डोकं, कोपर, पायांचे तळवे, कान आणि हात या अंगांना तेलाने मालिश करायला हवं. नियमित व्यायाम आणि योगासनांमुळे शरीरात रक्ताचा संचार वाढतो तसंच शरीर लवचिक बनतं.

आजाराला प्रतिबंध करणं हे आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्ट आहे. तसंच शरीराचा आजार समूळ नष्ट करण्यावर या शास्त्राचा भर असतो. उपचार करण्यापेक्षा रोग न होण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याबाबत आयुर्वेदात बरंच काही नमूद करण्यात आलं आहे. या शास्त्रात आहारावर भर दिला जातो. स्वयंपाकघरातच आरोग्याची अनेक गुपितं दडली आहेत. संतुलित आणि पोषक आहारामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते शिवाय शरीराची वाढही अगदी योग्य पद्धतीने होते. शरीरातल्या त्रिदोषांचं संतुलन राखण्यासाठी आहारात सहा रसांचा समावेश करायला हवा. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे वातावरण आणि उपलब्धतेनुसार खाद्यपदार्थांची निवड करायला हवी. आपल्याकडे चातुर्मासात कांदा-लसूण वर्ज्य केला जातो. आषाढी एकादशीआधी कांदेनवमी येते. या दिवशी कांद्याचे पदार्थ खातात. पुढील चार महिने मात्र कांदा लांब ठेवला जातो. यामागेही शास्त्र आहे. सूर्यास्ताआधी जेवण्याचंही महत्त्व आहे. आहार, विहार, दिनचर्या, ऋ तुचर्या यांचं पालन केल्यास आपण आजार नक्कीच दूर ठेऊ शकतो. सध्याच्या धकाधकीच्या काळात सगळ्या नियमांचं पालन शक्य नसलं तरी शक्य तितक्या गोष्टी निश्चितच अंगिकारता येतील.

कोरोना किंवा इतर कोणत्याही आजाराशी लढताना ही निकोप, निरामय जीवनशैली नक्कीच कामी येऊ शकते. आपल्या आयुष मंत्रालयानेही संसर्ग झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात काही आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत. अश्वगंधा, शतावरीसारख्या वनौषधी प्रतिकारक्षमता वाढवण्यास सक्षम आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्र आपल्या परीने कोरोनावर औषध, लस शोधत आहे. मात्र आयुर्वेदासारख्या काही हजार वर्षांची परंपरा असणार्या शास्त्राची मदतही या कामी होत आहे. कोरोनाला नष्ट करण्यासाठी विविध वनौषधींवर संशोधन सुरू आहे. भारत आणि अमेरिका यावर संयुक्तपणे अभ्यास करत आहेत. आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. आयुष मंत्रालयही याबाबत प्रयत्नशील आहे. कोरोना नामक शत्रुसोबत आपला लढा सुरू आहे आणि यापुढेही तो सुरू राहणार आहे. मात्र या निमित्ताने आपल्या काही सवयी बदलल्या आहेत. कोरोनासह वावरताना बरेच बदल स्वीकारावे लागणार आहेत. येत्या काळात बर्याच गोष्टी अंगवळणी पाडून घ्याव्या लागणार आहेत. कोरोनावर लस येईल तेव्हा येईल मात्र तोपर्यंत किंवा त्यानंतरही फक्त लसी आणि औषधांवर अवलंबून न राहता शरीराला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.

श्रीशा वागळे

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com