करोना चाचण्या आणि लोकांमधील गैरसमज

करोना चाचण्या आणि लोकांमधील गैरसमज

करोनाने लोकांना बरेच काही शिकविले मग ते आत्मनिर्भयतेपासून अगदी वैद्यकीय तपासण्यांपर्यंत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याविना कुठेतरी वाचून तपासण्यांचे अपूर्ण ज्ञान असल्याने अनेक संभ्रम व भीती निर्माण होतांना दिसते आहे. वायरल टेस्टचा अंतिम निष्कर्ष रुग्णाच्या लक्षणांवर अवलंबून नसून हा चाचणीचा दिवस व शरिरातील वायरल लोड यावर अवलंबून असतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास लक्षणे दिसत नाही अशावेळी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मात्र स्वतःहूनच तर्क-वितर्क लावले जातात.

भारतात कोरोनाची साथ आल्यापासून संशोधनाने वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येऊ लागल्या. सुरवातीस घशातील स्त्राव घेऊन कोरोनाची लागण झाली आहे हे समजायला लागले व त्यामुळे रुग्णाचे उपचार व विलगीकरण करणे शक्य झाले. परंतु टेस्टला लागणारा वेळ अधिक असल्याने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येऊ लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांची तपासणी होऊ लागली. या टेस्टमुळे अगदी कमी वेळात समजते की रुग्ण बाधित आहे किंवा नाही. हे झाले कोरोनाबाधित रुग्णांच्या बाबतीत. मग रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे हे कसे समजायचे? त्याकरिता अँटीबॉडीज टेस्ट करावी लागते. कोणताही आजार होऊन गेल्यावर काही रोगप्रतिकारक घटक तयार होतात त्यांना अँटीबॉडीज म्हणतात. आता भारतात कोरोना प्लाझ्मा थेरपीदेखील उपचाराचा एक भाग म्हणून दिली जाते. आता सविस्तरपणे प्रत्येक चाचणी संबंधी सविस्तर जाणून घेऊ या.

1. RT-PCR - स्वॅब टेस्ट

कोरोना हा विषाणूंच्या गटातील आजार असून तो साध्या सूक्ष्मदर्शनाखाली दिसू शकत नाही. ही कोरोनाची खात्रीशीर टेस्ट असून ही जर पॉझीटिव्ह आली तर कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे म्हणता येते.

कोरोना विषाणूचा संसर्ग प्रथम घशाला होतो व रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास त्याचा शिरकाव फुफ्फुसात होतो. लक्षणे दिसू लागल्यानंतर 8 दिवसांच्या आत ही टेस्ट करावी. 8 ते 10 दिवसांनंतर श्वासनलिकेतील किंवा थुंकीचा तपास करावा लागतो.

या टेस्टसाठी कापसाच्या बोळ्यावर घशातून स्त्राव घेतला जातो व तो विशिष्ट अशा वायरल ट्रान्सपोर्ट द्रव्यात ठेऊन तपासणीसाठी पाठवला जातो. वायरल ट्रान्सपोर्ट पदार्थामुळे तो विषाणू जीवंत राहण्यास मदत होते. त्यानंतर प्रयोगशाळेत त्यातील रायबोन्यूकलेइक ऍसिड (RN-) वेगळे करून विषाणूंची संख्या व क्षमता तपासली जाते.

रिपोर्टसाठी साधारण 24 ते 48 तासांचा कालावधी लागतो. जर रिपोर्ट पॉझीटिव्ह असेल तर त्यावर लक्षणांनुसार योग्य ते उपचार करावे लागतात आणि काहीच लक्षणे जरी नसली तरीहीदेखील व्यक्तीचे विलगीकरण करावेच लागते. कारण त्या व्यक्तीद्वारे समाजात खूप मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारण 80% ते 85% लोकांमध्ये ज्यांना आधीपासून कुठलीही व्याधी नाही, असे रुग्ण 10 ते 12 दिवसात पूर्णतः बरे होतात व त्यांच्या शरिरात अँटिबॉडीज तयार होण्यास सुरूवात होते.

2. रॅपिड अँटीजन टेस्ट

ठढ-झउठला लागणारा वेळ लक्षात घेता रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. नावाप्रमाणेच याचे निदान रॅपिड म्हणजे अगदी 30 मिनीटांत होते. समूह संसर्ग (community spread) सुरू झाल्यावर जास्तीत-जास्त लोकांची तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्णाचे विलगीकरण करून रोगाचा प्रसार आटोक्यात आणता येतो. या टेस्टमध्ये नाकातील स्त्राव घेतला जातो व तपासला जातो. अँटीजन हा विषाणूचाच एक भाग असल्याने ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर कोरोनाने आपल्या शरीरात शिरकाव केला आहे हे समजते व रुग्णावर लवकर उपचार सुरू करता येतात. अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ठढ-झउठ टेस्ट करावी लागत नाही. मात्र रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असूनदेखील टेस्ट जर निगेटिव्ह आली तर मात्र खात्रीसाठी ठढ-झउठ टेस्ट करावी लागते.

वरील दोन्ही चाचण्यांमध्ये जर व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर एक निष्पन्न होते की शरिरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे व विषाणू सक्रिय असून इतरांना संसर्ग होऊ शकतो. म्हणून घाबरून न जाता स्वतःहून विलगिकरण केल्यास कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही.

3. अँटिबॉडी टेस्ट

नैसर्गिकच रोगाचा प्रतिकार करण्याची देणगी मानवाकडे देखील आहे. कुठलाही विषाणूजन्य आजार होऊन गेल्यावर 2 ते 3 आठवड्यांनंतर रक्तात त्या आजाराच्या अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारक घटक.

या अँटिबॉडीज शरिरात शिरकाव केलेल्या विषाणूवर हल्ला करतात व त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. शक्यतो अशाप्रकारे तयार झालेल्या अँटिबॉडीज या बरेच वर्ष शरिरात राहतात व परत त्याच आजाराचा संसर्ग होण्यापासून बचाव करतात व त्याचा कोणताही दुष्परिणाम शरिरावर होत नाही. आपण आतुरतेने वाट बघत असलेली लसदेखील याचप्रमाणे काम करणार आहे.

अँटिबॉडी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर समजावे की रोगाचा प्रादुर्भाव होऊन गेला आहे आणि ती व्यक्ती आजारातून मुक्त झाली आहे. तसेच त्या व्यक्तीमुळे कोणालाही संसर्ग होऊ शकत नाही. थोडक्यात तुम्ही पूर्णतः सुरक्षित आहात व तुमच्यामुळे कोणालाही त्याची बाधा होणार नाही हे निश्चित होते. अशा व्यक्ती खरंतर प्लाझ्मा डोनर म्हणून योग्य असतात. प्लाझ्मा म्हणजे रक्तातील पिवळसर द्रव पदार्थ.

कोरोनाबाधित रुग्ण आजारातून पूर्णतः मुक्त झाल्यावर त्याच्या शरिरात तयार झालेल्या अँटिबॉडीज ब्लड बँकमध्ये प्लाझ्माफेरेसिसच्या सहाय्याने वेगळ्या केल्या जातात व आवश्यकतेनुसार त्यांचा वापर गंभीर रुग्णांवर केला जातो. अशाप्रकरे जर जास्तीत-जास्त लोकांनी प्लाझ्मा डोनेट केले तर ब्लड बँकमध्ये विशिष्ट तापमानात प्लाझ्मा साठवून ठेऊ शकतो व गरजेनुसार त्यांचा वापर रुग्णांवर करू शकतो.

सतर्क रहा व काटेकोरपणे नियमांचे पालन करा. आपल्या हलगर्जीपणामुळे अनेक कोरोना योद्धाना आपला जीव गमवावा लागत आहे याचे भान ठेवा. योग्यवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या टेस्ट मनात संभ्रम आणि भीती निर्माण करणार नाहीत व कोरोना लवकरात-लवकर आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल.

डॉ सई नेमाडे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com