
कोणताही देश अंतर्गत प्रश्नांनी त्रस्त असतो तेव्हा अस्मिता जागवत इतर देशांशी असलेलं वैर चर्चेत आणलं जातं. चीनमध्ये हेच घडत आहे. त्यामुळे व्यूहात्मकदृष्ट्या फार महत्त्वाचं नसूनही चीनने आततायीपणासाठी आधी गलवान खोर्याची आणि आता पेंगाँग लेक परिसराची निवड केली. देशांतर्गत असंतोष वाढत असताना चीन पाकिस्तानच्या साथीने सीमाभागांमध्ये कुरापती काढत आहे. ही तिरकी चाल बारकाईने समजून घ्यायला हवी.
एकीकडे वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे मात्र युद्धाची तयारी करायची, दुसर्याला गाफील ठेवून कोंडी करायची, हे युद्धात क्षम्य असलं तरी ही तिरकी चाल आहे आणि अशी तिरकी चाल करायची, वेळ का येते हा स्वंतत्र अभ्यासाचा विषय आहे. कोणताही देश अंतर्गत प्रश्नांनी त्रस्त असतो. सत्ताधार्यांना हे प्रश्न सोडवण्यात यश येत नाही. नागरिकांचा रोष वाढत जातो तेव्हा त्यावरचा जालीम उपाय हा भावनिक मुद्यांचा आधार असतो. त्यानेही भागलं नाही की मग इतरांवर हल्ले करण्याची योजना आखली जाते, शेजारच्या देशांशी कुरापती काढल्या जातात.
पाकिस्तान हे आपल्या जन्मापासून करत आला आहे. आता चीनही त्याच वाटेवरून जात आहे. गलवान खोरं व्यूहात्मकदृष्ट्या चीनसाठी फार महत्त्वाचं नाही. तरीही त्याने याच खोर्याची निवड का केली, असा प्रश्न पाच मेपासून भारताचे लष्करी अधिकारी वारंवार उपस्थित करत होते आणि चीनची तिरकी चाल ओळखून सर्व सैन्य एकाच भागात केंद्रीत करू नका, असा सल्ला देत होते. त्याचं कारण भारतीय लष्कराला गलवान खोर्यात गुंतवून ठेवून पाकिस्तानच्या मदतीने अन्य भागांमध्ये कुरापती काढण्याचा चीनचा हेतू लष्करी अधिकार्यांच्या लक्षात आला होता. त्यासाठी पाकिस्तानला पुढे करायचा, चीनचा कुटील डाव आहे. चीन आणि रशियासारख्या हुकूमशाही देशांमध्ये विरोधकांना फारसा आवाज नसतो. तसा सूर काढला तर त्याला विषारी चहा पाजून संपवलं जातं किंवा गोळ्या घातल्या जातात. पेंगाँग लेक परिसरातल्या चीनच्या ताज्या हालचालींनंतर हे नव्याने अनुभवायला मिळत आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी स्वतःची तहहयात अध्यक्ष म्हणून निवड करून घेतली. त्यानंतरही त्यांच्या काही निर्णयावरून पक्षातच मतभेद झाले. जिनपिंग यांच्यावर टीका करणारी काई शिया या चीनी नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. जिनपिंग हे चीनमध्ये सर्वशक्तीशाली झाले आहेत. पक्षात आणि देशात त्यांना कोणीही विरोध करू शकत नाही. जिनपिंग यांनी संपूर्ण जगाला चीनचं शत्रू बनवलं आहे. चीनमधल्या समस्यांपासून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी जिनपिंग यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
आजीवन अध्यक्षपदावर राहण्यासाठी केलेली घटनादुरुस्ती चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं. कोरोना संसर्गाच्या मुद्यावरही त्यांनी चीन सरकारवर टीका केली. वुहानपासून सुरू झालेला संसर्ग जगभरात पसरला. चीन सरकारला कोरोना संसर्गाची माहिती सात जानेवारी रोजी समजली होती; मात्र त्यांनी 20 जानेवारीपर्यंत ही माहिती लपवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. हाच आरोप अमेरिकाही करत होती. जगही त्याच भूमिकेत आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, चीन, जर्मनी, रशिया, अमेरिका आणि भारतही चीनच्या विरोधात गेला.
आता श्रीलंका आणि नेपाळ हे देशही चीनबरोबर राहिलेले नाहीत. विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न सर्वच सत्ताधारी करत असतात. आता चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने शिया यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काई शिया यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असल्याचं पक्षाने म्हटलं आहे. गंभीर राजकीय समस्यांवर भाष्य केल्यामुळे काई शिया यांच्याकडून पक्षाच्या राजकीय शिस्तीचं उल्लंघन झालं असल्याचं पक्षाने म्हटलं आहे.
चीनमधल्या घडामोडींचे अभ्यासक ऍडम नी म्हणतात, कोरोनाच्या महासाथीनंतर चीन कम्युनिस्ट पक्षातल्या जिनपिंग यांच्या वर्चस्वापुढे प्रश्न निर्माण झाले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षात गटबाजी सुरू असून अनेक गट निर्माण झाले आहेत. सध्याचा काळ चीनसाठी आव्हानात्मक असल्यामुळे हे गट एकत्र आहेत. जिनपिंग यांच्या कार्यपद्धतीवर याआधी अनेकदा टीका झाली आहे. जिनपिंग यांनी पक्षांतर्गत विरोधकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे अनेकजण जिनपिंग यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
या पार्श्वभूमीवर चीनने अंतर्गत प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हाँगकाँग, तिबेट, भारत, रशियाविरोधात कुरघोडीचं राजकारण सुरू केलं आहे. काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमाप्रश्नी वाद सुरू आहे. दोन्ही देशांमधला तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू असताना चीन सीमाभागात जोरदार हालचाली करत आहे. चीनने अरुणाचल आणि भूतान सीमेवरील तिबेटी नागरिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनला नेमकं काय साध्य करायचं आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि भूतान सीमेजवळ असणार्या 96 गावांमधल्या लोकांचं चीन सीमेपासून दूर असणार्या ठिकाणी पुनर्वसन करत आहे. या ग्रामस्थांना नवीन घरं देण्यात आली असून यामध्ये वीज, पाणी आणि इंटरनेटसारख्या सुविधा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सीमेलगतच्या भागात चीनकडून जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे.
भारत आणि भूतान सीमेजवळील तिबेटी लोकांना हटवण्याचं काम 2018 पासूनच सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी ले गावातल्या 72 जणांचं नवीन घरात स्थलांतर करण्यात आलं होतं. ही नवी घरं जुन्या मूळ घरांपासून दूरवरच्या अंतरावर आहेत. चीन 30 सप्टेंबरपर्यंत सर्व 96 गावांमधल्या लोकांच्या पुनर्वसनाचं काम पूर्ण करणार आहे. त्यानंतर या ग्रामस्थांना या नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
अरुणाचल प्रदेशचा तवांग हा भाग आपला असल्याचा दावा चीन करतो. तवांग हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचं चीन सांगतो. तवांग हा बौद्ध धर्मातल्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. 1962च्या युद्धात चिनी सैन्य तवांगपर्यंत पोहचलं होतं. भारतीय सीमा भागात चीनने आपलं हवाई संरक्षण मजबूत केलं आहे. एअर डिफेन्स सिस्टीम अपग्रेड केली गेली असून एकूण सेवेचा आता विस्तारही करण्यात येत आहे.
चीन डोकलामजवळ असणार्या सिक्कीमजवळील आपल्या हद्दीत अर्ली वॉर्निंग रडार साइट्सजवळ क्षेपणास्त्रं तैनात करत आहे. नाकूला आणि डोकला जवळील भागात 50 किलोमीटर दूर अंतरावरुन जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं तैनात करण्याची तयारी चीनने केली आहे. भारत त्यावर शांत नाही; परंतु आपल्याला अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. भारताच्या सर्व सीमांवर चीनची जय्यत तयारी सुरु आहे. भारतानेही चीनही तिरकी चाल ओळखून अद्ययावत लष्करी सामुग्रीची जमवाजमव सुरू केली आहे. चीनने सीमांवर तैनात केलेल्या बाँबर विमानांना उत्तर म्हणून भारतही इस्त्राईलकडून घेतलेली अवॅक्स ही यंत्रणा आयात करत आहे. भारताने राफेल ही लढाऊ विमानं लष्करात दाखल केली आहेत.
दुसरीकडे भारतीय नौदलाने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. गलवान खोर्यातल्या चकमकीनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका (फ्रंटलाइन वॉरशिप) दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहे. याच भागात चीन भारतीय नौदलाच्या जहाजांना विरोध करत आला आहे. याविरोधात चीनने वेळोवेळी तक्रारीही केल्या आहेत. भारतीय नौदलाच्या या जहाजाच्या तैनातीमुळे चीनमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चीनने भारतासमोर हा मुद्दा उपस्थित केला असून त्यावर निषेधही व्यक्त केला आहे.
चीन सरकारसाठी दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या भागात इतर कोणत्याही देशाची उपस्थिती चीनला पसंत नाही. चिनी नौदल ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा विरोध डावलून भारताची युद्धनौका आपल्या अमेरिकेच्या समकक्षाच्या सतत संपर्कात आहे. अमेरिकेची जहाजंदेखील या भागात आहेत. भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका हिंदी महासागरात, विशेषतः मलाक्काच्या सामुद्रधुनीत तैनात केल्या आहेत.
या प्रदेशातून चिनी जहाजं हिंद महासागरात प्रवेश करतात आणि इतर देशांमध्ये जातात. चिनी सैन्याची उपस्थिती पाहता भारतानेही आपले जवान तैनात केले आहेत. लडाखच्या संपूर्ण सीमावर्ती भागात भारताने आपली दक्षता वाढवली आहे. भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार असून योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे, असं संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांनी स्पष्ट केलं आहे. गलवान खोर्यातून पाच मे पूर्वीची परिस्थिती ठेवण्यास चीन तयार नसेल तर लष्करी मार्ग हा उपाय असल्याचं सरसेनाध्यक्षांनी सांगितलं आहे. एकंदरीत चीनी आक्रमणवादाची डोकेदुखी संपण्याची चिन्हं नसून भारताला येत्या काळात अनेक आघाड्यांवर सजग रहावं लागणार आहे.
- प्रा.नंदकुमार गोरे