Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedदेवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र

देवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र

माननीय श्री देवेंद्रजी

सप्रेम नमस्कार,

- Advertisement -

अत्यंत व्यथित मनाने माझ्या भावना आपणापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. सुशांत सिंग प्रकरणाचा अंतर्मुख होऊन विचार करावा; एवढा मोठा सल्ला देण्याचा मला अधिकार नाही. आपल्या …

सल्लागारांव्यतिरिक्त अन्य कुणाचे ऐकायचेच नाही. असे व्रत आपण अंगीकारल्याची जाणीव असल्याने फक्त मला काय वाटतं एवढेच!

सुशांत सिंग प्रकरणाच्या तपासाची वाटचाल वेडी-वाकडी करण्यात आपली भूमिका निश्चितच विचारात घ्यावी लागेल. मुख्यमंत्री व गृहमंत्रिपद आपण सलग पाच वर्षे भोगलंय! पालघरमध्ये दोन साधूंचे मॉब लिंचिंग झाले. ज्या गृहविभागाला सलग पाच वर्षे सांभाळले, त्याच गृह खात्याबद्दल आपण किती खालच्या दर्जाचे आरोप केलेत? ज्या पोलीस अधिकार्‍यांच्या कालखंडात हे लिंचिंग घडले, त्या सर्व अधिकार्‍यांची नियुक्ती गृह व मुख्यमंत्री म्हणून आपणच केली होती ना? आपल्या पक्षातील काही उत्साही वीरांनी रंग देण्याचा प्रयत्न केला; वातावरण शांत करायच राहील बाजूला. मतांच्या गणिताच्या वजा-बाक्या सुरू. काय निष्पन्न झाले तपासात कळू द्या, महाराष्ट्राच्या जनतेला.

उत्तर प्रदेशात भाजपाच्या योगींच सरकार आहे. लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमध्ये तेथे तर साधू व पुजार्‍यांची हत्या झाली. याप्रकरणी सुतक मौन का? लक्षात ठेवा आणि तुमच्या दिल्लीतील आश्रयदात्यांनाही सांगा. तुम्ही सदा सर्वकाळ लोकांना मूर्ख बनवू शकणार नाही. उपाशीपोटी असलेल्या भूकेल्यांना सांगितलेले देशप्रेमाच्या धड्यांचे अजीर्ण होते, असे लोक सांगणार्‍यांचाच बळी घेतात. तुम्हा सर्वांच्या एकत्रित वर्तणुकीमुळे तो दिवस आता फार लांब नाही. देवेंद्र फडणवीस आपण कळू द्या, राज्यातील जनतेला की, पालघरप्रकरणी आरोपी आहेत तरी कोण? तेथे गेली 10 वर्षे ग्रामपंचायतीवर सत्ता भाजपाचीच.! मारणारे भाजपाचेच पदाधिकारी. आमदार हितेंद्र ठाकुरांच्या पक्षाचे तीन विधानसभा सदस्य ठाकरे सरकारबरोबर आहेत. मग करा त्यांना टार्गेट! घाला चहूबाजूंनी हाके! सोडा आपली तैनाती फौज त्यांच्यावर!

कोरोनाच्या संकटाला मोदीजींनी महामारी असे संबोधले. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष व नेत्यांनी संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचा विचार आपल्या मनाला शिवूसुद्धा दिला नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे व नवखे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लागले कामाला. आपण मंत्री आहोत. अत्यंत त्यागमूर्ती आहोत. पूर्ण देशवासी माझे कुटुंब आहे. असल्या भोंगळ कल्पनांना थारा दिला नाही. आपल्या जन्मदात्या मातोश्रींची अखेरच्या श्वासापर्यंत काळजी घेत घेत कोरोनाग्रस्त लक्षावधींच्या संख्येने असलेल्या माता-भगिनीं व सर्वांची काळजी घेतली. अरे दोन शब्द चांगले तर नाहीच.

रोज एक एकच घोषणा पेशंटची संख्या लपवली. चाचण्या वाढवा. बेड नाही. औषधे नाहीत. ऐवढी बोंब मारूनही कुणी भीक घलेना. त्यात सरकारविरोधात आंदोलन. महाराष्ट्राच्या सुजाण जनतेनेच फोटोइतपतही आंदोलनाची दखल घेतली नाही.

नव्या प्रकरणाच्या शोधात ढूंढो ढूंढो सुरू असतानाच सुशांत सिंग प्रकरण लागले हाती. राजकारणात काही नग असे आहेत की, ते जसे स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अथवा मनोवृत्तीचे आहेत तसेच इतरांना आपल्या फूटपट्टीने मोजतात. राजकारणातील काही कुटुंबांचा राजकारण हाच मुळी Family business झाला आहे. सुशांत सिंग प्रकरणाचे तर अशा सर्वांनाच कोलीत मिळाले.

दुधाचा रतीब घातल्याप्रमाणे यांच्या पत्रकार परिषदांना अक्षरशः ऊत आला. चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविली, जिंकली. वडिलांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. काहींचा जळफळाट होणे अपरिहार्यच होते.

भाजपाच्या नेत्यांनी सुशांत सिंगची आत्महत्या नसून योजनाबद्ध खून असल्याची हाकाटी पिटायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच महाराष्ट्राच्या पोलीस तपासावर प्रश्न चिन्ह लावले.

ज्या पोलीस यंत्रणेबद्दल तुम्ही कधी अभिमान बाळगला होता. राज्यातील महत्त्वाच्या पदावर यच्चयावत सर्व अधिकारी तुम्हीच नियुक्ती दिलेले. असे असंख्य अधिकारी मला माहिती आहेत की, आजही आपल्या पदापेक्षा आपणाशी निष्ठा ठेवून काम करीत आहेत. तुम्हाला क्षणोक्षणाची माहिती देतात. ही अगदी सामान्य बाब आहे.

मुंडे साहेबांनी गृहमंत्रिपद सोडल्यानंतर नंतरची किमान 10 वर्षे तरी त्यांना खडानखडा माहिती कागदोपत्री पुराव्यानिशी मिळत असे. तुम्ही तर निश्चितच जास्त पाताळयंत्री आहात. (अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव) तुमच्याकडे माहितीचा खजिनाच होता.

नुकतीच राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील तब्बल 54 पोलीस अधिकार्‍यांना उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पारितोषिके दिली. या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांना भोपळा फोडता आला नाही.

मुंबई पोलिसांच्या तपासावर आपण संशय व्यक्त केला. मुंबई पोलीस कुणाला तरी पाठीशी घालत आहेत. काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वगैरे येथेच्च बदनामी करणारे आरोप केलेत. पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी 80 दिवस अक्षरशः रतिब घातला.

सुशांत सिंगची हत्याच झाली. आमच्याकडे असे पुरावे आहेत. आज सायंकाळी रियाला अटक होणार. कल तो रिया चक्रवर्तीको भगवान भी नही बचा सकता. एका मागून एक सपाटून बोंबलून बोंबलून धादांत खोटे प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू होता.

मुंबई पोलिसांकडून तपास काढून सी.बी.आय.कडे गेला. झाले आम्ही जिंकलो. आपलेच ढोल बडवून घेण्याचा कोल्हापूर ते चंद्रपूर नॉन-स्टॉप कार्यक्रम पार पाडला. आत्महत्या खून अखेरीस अमली पदार्थाची तस्करी करणार्‍यांपर्यंत वेडीवाकडी वळणे घेत कुठल्याही लॉजिकल एन्डला तपास पोहोचता कामा नये. हा आपला डाव आपण निश्चितच पदरी पाडून घेतला.

देवेंद्रजी महाराष्ट्राच्या जनतेला आपणाकडून खालील प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.

1) आपल्या क्लबचे संस्थापक सदस्य आमदार राम कदम यांच्याकडे अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या खत्रीची व्हिडिओ टेप कशी आली?

2) विवेक मेहत्रा यांच्या मृत्यूच्या सखोल चौकशी संदर्भात मी स्वतः मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे फिर्याद दाखल केली तर आपण नेमकी काय भूमिका घ्याल? सुशांत सिंग हा बिहारचा राहणारा होता म्हणून बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार आहे. ही आपली भूमिका विवेक मेहत्रा हे मुंबईचे रहिवासी होते. म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी तपास करण्यासाठी आपण पाठिंबा देणार का?

3) आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माते संदीप सिंग यांची आपणासमवेत प्रसिद्ध झालेल्या फोटोतील व्यक्ती आणि अमली पदार्थाची तस्करी करणारा संदीप सिंग या दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत की, एकच आहेत.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जीवन दर्शन घडविणार्‍या चित्रपटाचा निर्माता ड्रग पेडलर असल्याची माहिती आपल्या अधिपत्याखालील पोलीस यंत्रणेने आपणास दिली होती की नाही.

5) संदीप सिंग हा अमली पदार्थाच्या धंद्यातील जानी मानी हस्ती असल्याचे आपणास केव्हा कळाले.

6) राज्याचे माजी गृहमंत्री व मुख्यमंत्री या जबाबदारीचे भान ठेवून संदीप सिंग व खत्री यांना अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यासंबंधीची आपली प्रामाणिक भूमिका काय ?

7 कायद्यातील तरतुदीनुसार अ‍ॅबेटमेंट (लाभार्थी)मध्ये कोण कोण आरोपी होऊ शकतात? त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी आपली नेमकी भूमिका स्पष्ट कराल का?

8) आपण व आपल्या सदस्यांनी सातत्याने महाराष्ट्र पर्यायाने मुंबई पोलिसांच्या मनोबल खच्ची कारणासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास आपण तयार आहात का ?

9) झाशीच्या राणीने ब्रिटिशांविरुद्ध रणांगणात प्रत्यक्ष लढाई केली. अशा सर्वोच्च रणरागिणीची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, हेही तेवढेच खरे. याबद्दल आपणास नेमके काय वाटते?

10) सुशांत सिंगप्रकरणी आता आपली आपल्याला संस्कारक्षम व विश्वातील सर्वात मोठ्या पक्षाची नेमकी भूमिका काय, याचे स्पष्टीकरण व्हावे. महाराष्ट्रव्देशी भाजपा व नेत्यांची राजकीय उठाठेव, हा माझ्या चिंतनाचा विषय आहे.

आण्णासाहेब अनिल गोटे मो. 8421883366 (लेखक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या