Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedविजय हुकलाच....

विजय हुकलाच….

– डॉ. अरुण स्वादी Dr. Arun Swadi

कोणी काहीही म्हणा, पावसामुळे अनिर्णीत ठरलेल्या नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित होता.उगाच ते भरून आलेलं आकाश आणि भुरभुरणाऱ्या पावसाकडे आणि अँडरसन कडे बोट दाखवत भारताचे श्रेय हिरावण्याचा प्रयत्न कोणी करू नये.असल्या टिपिकल इंग्लिश हवेत अँडरसन जीभ चटावलेल्या हिंस्त्र श्वापदा सारखा वाटतो हे खरं, पण विकेट बऱ्यापैकी सुस्त झाली होती आणि आमच्या फलंदाजांनी चौथ्या दिवसाचे सत्र मस्त आरामात खेळून काढले होते.एक मात्र खरं गेल्या काही कसोटीत चौथया डावात दोनशे धावांचा पल्ला गाठताना आमची अवस्था अस्थमाच्या पेशंटसारखी झाली होती.आमचं दुर्दैव हेच की नेहमी पहिली कसोटी हरणाऱ्या आमच्या संघाला नको असलेला विक्रम बदलायची संधी वरुणराजाने नाकारली. आता पुढच्या कसोटीत पुन्हा नवी विटी, नवं राज्य…!

- Advertisement -

पहिल्या कसोटीचा जमाखर्च मांडताना एका गोष्टीची नोंद घ्यायलाच लागेल. आमच्या शेपटाने कधी नव्हे तो जोरदार तडाखा दिला. जसप्रीत बुमराहने फलंदाजी फारच मनावर घेतली आहे असे दिसतेय. त्याने मारलेले काही फटके पुजारा व रहाणेला लाजवणारे होते. बुमराह प्रमाणे शामी किंवा सिराज सरळ रेषेत खेळले नाहीत, पण धावा जमवण्याची त्यांची आस मात्र दिसली. चला, उशिरा का होईना तळाच्या फलंदाजांना पाच पंचवीस धावा जमवायचं महत्व पटलं. तसेही या खेळाडूंना ऑफिसमध्ये बसून फायली थोड्याच क्लिअर करायच्या असतात? नेटमध्ये नेटाने प्रॅक्टिस केली तर किमान खेळपट्टीवर उभे रहाणे जमायला नको ?

जसप्रीत बुमराहने अफलातून गोलंदाजी केली. मुख्य म्हणजे चेंडू स्विंग व सीम करत आपण जगातला टॉप गोलंदाज का आहोत हे सिद्ध केले, पण अजिंक्यपदाच्या कसोटीत तो पार फेल झाला याचे दुःख त्यामुळे भरून येणार नाही. मी म्हणेन ‘जो हौदसे गयी वो ये छोटे छोटे बूंदसे भरके नहीं आयेगी’. ताज्या दमाचा सिराज थकलेल्या ईशांत शर्मापेक्षा खूप उजवा वाटतो हे आपण कधी मान्य करणार? ईशांत टप्प्यावर गोलंदाजी करतोय, पण त्याची निप गेली आहे त्यामुळे विकेट घ्यायची क्षमता आता कमी झाली आहे.मोहमद शमीने दुसऱ्या डावात घोर निराशा केली.एरवी सामना चौथ्या दिवशी संपला असता.मात्र शार्दुल ठाकूर ने कर्णधार विश्वास दाखवत नसूनही सुरेख स्विंग गोलंदाजी केली.अर्थात प्रत्येक वेळी एक स्वैर चेंडू टाकून त्याने खिरापत वाटली.

भारताची खरी डोकेदुखी आहे अश्विनला संघात बसवायचं कसं…? तो.आपला विकेट घेणारा गोलंदाज आहे.कोणत्याही खेळपट्टीवर

तो बळी घेऊ शकतो. किमान पहिल्या दोन सामन्यात तरी तो आपल्याकडच्या विविधतेमुळे फलंदाजांना चकवतो. जडेजा सीम विकेट असली तर हे करत नाही. खराब विकेटवर मात्र तो खतरनाक ठरतो. इंग्लंडमध्ये असं खराब फिरकी खेळपट्टीचं जिलबीचे जेवण मिळणे फार अवघड, पण तो फलंदाजी टिच्चून करतोय आणि सद्याची त्याची आकडेवारी बघता आता तो निव्वळ फलंदाज म्हणून संघात बसू शकतो. भले संजय मांजरेकर काहीही म्हणोत, नव्हे ते म्हणतातच, पण निव्वळ फलंदाज असलेले रहाणे आणि पुजारा कुठे स्कोअर करताहेत ? निव्वळ फॉर्म हा निष्कर्ष लावला तर हे दोघे कोणत्या संघात बसतील? पुजाराच्या मर्यादा आता पार उघड्या पडत आहेत. तरीही त्यांना एक संधी मिळावी.

गेल्यावेळी इंग्लंड मध्ये पार फटफाजिती झालेल्या राहुलने यावेळी सुरेख सुरुवात केली आहे.पण सुरेख सुरुवात करूनही आपली विकेट नजराणा म्हणून पेश करायची खोड रोहित शर्माला लागली आहे ती कशी जाणार? दृष्ट लागावी असं तो खेळतो आणि दृष्ट लागून तो बाद होतो. आता मुक्काम पोस्ट लंडन आहे. खरं सांगायचं तर या इंग्लंड संघाची गोलंदाजी उत्तम आहे . अँडरसन आजही प्रभावी वाटतो.ब्रॉडला तर कोणीच कमी लेखू नये. नवा रॉबिन्सन मात्र विलक्षण भेदक वाटतोय, पण इंग्लिश फलंदाजी मात्र पार लुळीपांगळी वाटते.एकट्या रूट वर त्यांची भिस्त आहे. सिब्ली, क्रॉली, लॉरेन्स कोणत्या आंतरराष्ट्रीय संघात बसतील सांगा ? मी तर म्हणतो करनला त्यांनी तीन नंबरवर खेळवावे. अशा या फलंदाजीला आम्ही दोनदा बाद करू शकलो नाही तर आम्ही टॉप टीम असल्याच्या वल्गना तरी आपण करू नये.पहिली कसोटी आपल्या नशिबात नव्हती, पण ते आता विसरून आपण लॉर्ड्स वर हल्ला बोल केला पाहिजे. इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्यात काही वेगळी मजा असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या