Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedMAHA-TET चे बाजारीकरण थांबले पाहिजे

MAHA-TET चे बाजारीकरण थांबले पाहिजे

राज्यात सन 2013 पासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसोबतच शिक्षक पात्रता परिक्षा अर्थात टीईटी अनिवार्य केली आहे. सदर परीक्षा ही महाराष्ट्र शिक्षक शिक्षण परीषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित शिक्षक पात्रता परिक्षा अर्थात टीचर्स टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

यासाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात येते. परंतू सदर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अत्यंत कठीण असतात. त्यामुळे संपुर्ण राज्यात ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण फक्त 2 ते 3 टक्के एवढेच आहे. एकदा ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती सात वर्षांपर्यंत संबंधीत शिक्षक हा शिक्षक बनण्यासाठी पात्र असल्याचे मानले जाते. मात्र, ही परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली असा अर्थ होत नाही. त्यानंतरही त्याला संबंधीत शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर नोकरीसाठी प्रयत्न करावा लागतो. परंतू टीईटी परीक्षाच उत्तीर्ण नसेल तर तो शिक्षक बनण्यासाठी पात्रच धरला जात नाही आणि ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड परिश्रम, सामान्य ज्ञान, विषयांचे सखोल ज्ञान असावे लागते.

- Advertisement -

2013 पासून आतापर्यंत सहा वेळा घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत केवळ 86 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दि.19 जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत 3 लाख 43 हजार 242 उमेदवार प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी केवळ 16 हजार 582 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत. केवळ 4.83 टक्के निकाल लागला आहे. नंदुरबार जिल्हयात सुमारे 40 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. त्यापैकी केवळ 70 ते 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे जिल्हयाची टक्केवारी 0.1 टक्क्यांएवढीच आहे. ही परिक्षा अनुत्तीर्ण होण्यामागेदेखील अनेक कारणे आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहिती नसणे, माहिती असला तरी त्याचा अभ्यास नसणे, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रश्न, सामान्य ज्ञानाचा अभाव अशी अनेक कारणे आहेत. परंतू जो विद्यार्थी स्कॉलर असतो, तो हमखास यशस्वी होतो.

परंतू हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे भावी शिक्षक आता वेगळाच मार्ग अवलंबू लागले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेतर्फे ही परीक्षा घेण्यात येते. या ठिकाणी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजणारे, उच्चभ्रु, प्रतिष्ठीत, ‘व्हाईट कॉलर’ समजणारे जिल्हयातील काही शिक्षक, शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण विभागातील आजी माजी कर्मचारी, अधिकारी अशा दलालांची शिक्षक परिषदेकडे ‘लाईन’ असल्याची चर्चा आहे. ‘लाईन’ म्हणजे टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्याची. दरवर्षी या परीक्षेचे वेळापत्रक आल्यानंतर उमेदवारांनी अर्जप्रक्रिया केल्यानंतर हे ‘दलाल’ सक्रीय होतात. ते भावी शिक्षकांकडून लाखो रुपयांची ‘माया’ गोळा करतात. यंदा टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्याचा ‘रेट’ 1 लाख 70 रुपयांपासून 3 लाखांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी कमी अधिक प्रमाणात असाच ‘रेट’ असतो. कोणी जवळचा नातेवाईक, मित्र परिवार असल्यास त्याला ‘बार्गेनिंग’ करुन हा आकडा कमी जास्त केला जातो. यातून संबंधीत दलाल त्यांची दलाली कापून उर्वरित पैसे ‘वर’ पाठवतो. गेल्या दोन तीन वर्षांपासून टीईटीचा अशाप्रकारे बाजार भरविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. एकेका दलालाकडे 25 विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा ‘कोटा’ असल्याचीही चर्चा आहे.

एकदाची ‘अमाऊंट’ फायनल झाली की संबंधीत उमेदवाराला परीक्षेची उत्तरपत्रिका कोरी ठेवण्यास सांगीतले जाते. त्यानुसार तो उमेदवार उत्तरपत्रिका कोरी ठेवतो. त्याचा क्रमांक, आयडी, पासवर्ड हे सर्वकाही संबंधीत दलालाकडे असतात. त्यानुसार परीक्षा झाल्यानंतर या दलालाकडून वरिष्ठ कार्यालयात सर्व माहिती पुरविली जाते. परिक्षेनंतर या कोर्‍या उत्तर पत्रिकांवर ‘डॉट’ भरले जातात. ठरलेल्या रेटप्रमाणे गुणही दिले जातात. एखाद्या उमेदवाराने पैसे देवूनही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला गुणांचे पुनर्मुल्यांकन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार पुनर्मुल्यांकनात तो उत्तीर्ण होत असल्याचेही चर्चिले जात आहे. यंदाही या परीक्षेचा निकाल अत्यल्प लागला आहे. त्यातल्या त्यात नंदुरबार जिल्हयात 70 ते 75 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यातील सर्वच उमेदवारांनी अशाप्रकारे परीक्षा उत्तीर्ण केली आहे, असे नाही. काही स्कॉलर उमेदवारदेखील आहेत, जे स्वतःच्या बुद्धीमत्तेवर उत्तीर्ण झाले असतील. परंतू बहुतांश उमेदवार हे ‘सेटींग’मध्येच उत्तीर्ण झाल्याची चर्चा आहे. काही जण आता पुनर्मुल्यांकनामध्ये उत्तीर्ण झाल्यास आश्चर्य वाटू नये.

भावी शिक्षकच अशाप्रकारे शिक्षणाचे बाजारीकरण करत असेल आणि तो शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परिक्षाच उत्तीर्ण होण्याच्या पात्रतेचा नसेल तर तो भावी पिढी कशी घडवेल, याचा विचार न केलेलाच बरा. त्यातल्या त्यात दुर्दैव म्हणजे या भावी शिक्षकांना चुकीचा मार्ग दाखविणारेदेखील विद्यमान शिक्षकदेखील अशाप्रकारे दलाली करुन अशा अपात्र शिक्षकांना पात्र करत असतील तर ते खरच शिक्षक म्हणण्याच्या पात्रतेचे आहेत काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. याशिवाय शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारीदेखील यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.

राकेश कलाल, नंदुरबार 95525 76284

- Advertisment -

ताज्या बातम्या