Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedवाद कोविड बळींचा

वाद कोविड बळींचा

– डॉ. नानासाहेब थोरात, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन

कोव्हिड विषाणूचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्‍याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच आता या संसर्गामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरुन वादंग माजले आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेकडून एका प्रकल्पांंतर्गत सर्व स्तरावरून मिळणारी कोव्हीड रुग्णांच्या मृत्यूची माहिती एकत्रित केली जात असून लवकरच ती प्रसिद्ध केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार या देशातील कोव्हीड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे. पण ही माहिती संख्याशास्रीय मॉडेलवर आधारित असल्यामुळे या माहितीला अनेक देशांनी आक्षेप घेतला आहे. काय आहे हा नेमका वाद?

र्च 2020 पासून सुरु झालेली कोव्हिडची लाट संपत आलेली असताना जगभरात पुन्हा एकदा याच कोव्हिडमधील अनेक देशांमधील मृत्यूच्या संख्येवरून वादविवाद सुरु झाले आहेत. यामुळेच जभरातील मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांमध्ये यावर चर्चा सुरु आहेत. हा वाद पुन्हा सुरु होण्यामागे जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या एका प्रकल्पाचे निमित्त आहे. जगातील सर्वच देशांमध्ये मार्च 2020 पासून कोव्हीडमुळे किती मृत्यू झाले याचे पुनरावलोकन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक प्रकल्प हाती घेतला असून, वेगवेगळ्या देशातील सरकारी तसेच माध्यमांमधून आलेली कोव्हीड रुग्णांची माहिती एकत्रित केली जात आहे.

यासाठी त्या-त्या देशातील आरोग्य संघटना आणि अनेक पत्रकार यांच्या समित्या तयार केल्या आहेत. सर्व स्तरावरून मिळणारी कोव्हीड रुग्णांच्या मृत्यूची माहिती एकत्रित केली जात असून लवकरच ती प्रसिद्ध केली जाणार आहे. या माहितीला अनेक देशातील सरकारी यंत्रणांनी आक्षेप घेतला असून ती प्रसिद्ध होऊ नये म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडे मागणी केली आहे. याबाबतचे सर्वात पहिले वृत्त अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने दिली आहे. या माहितीला आक्षेप घेणार्‍या देशांमध्ये भारताचाही समावेश असून, भारताबरोबरच चीन, इजिप्त, इथोपिया, इराण, बांगलादेश आणि सीरिया या देशांचाही समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या माहितीला विरोध करणारे काही देश असले तरी काही देशांनी ही माहिती प्रसिद्ध होण्याआधीच, सुधारित मृत्यूची आकडेवारी जाहीर करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सर्वात पुढे अमेरिका असून अमेरिकेच्या सरकारी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी ) संस्थेने नुकतीच कोव्हीड मृत्यूची नवीन- सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे. आधीच्या यादीच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सात लाखांच्या आसपास कोव्हीड मृत्यूची नोंद केली गेली होती. मात्र सुधारित आकडेवारीनुसार हीच मृत्यूची संख्या आठ लाखापेक्षा अधिक आहे, यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे.

याच जोडीला ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणेनेही आपली सुधारित आकडेवारी जाहीर केली असून पूर्वीच्या मृत्यूपेक्षा सुधारित आकडेवारीत तीन हजारांची वाढ दिसून आली आहे. याबरोबर आणखी एक नवीन आणि आश्चर्यकारक कोव्हीड मृत्यूची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत काही देशांमध्ये शनिवार आणि रविवारी कोव्हीड मृत्यूची संख्या सोमवार ते शुक्रवार या दिवसांपेक्षा अधिक होती. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, ब्राझील यांचा समावेश आहे. याउलट जर्मनीमध्ये शनिवार आणि रविवारी कोव्हिडच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण इतर दिवसांपेक्षा कमी होते.

भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेमधील वाद

कोव्हिडच्या रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना आमने-सामने आले आहेत. याचे वृत्तही न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. हा वाद सुरु होण्यामागे वरील सांगितलेले कारण असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार भारतातील कोव्हीड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सध्याच्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार त्यांनी देशभरातून 600 पेक्षा अधिक स्थानिक पत्रकारांकडून माहिती घेतली असून, मिळालेली माहिती आणि जाहीर झालेली आकडेवारी यामध्ये खूप तफावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स आणि ब्रिटनमधील द गार्डियन या वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटना जानेवारी 2022 मध्येच सुधारित आकडेवारी जाहीर करणार होती, पण भारत तसेच इतर देशांच्या विरोधामुळे ही माहिती जाहीर केली गेली नाही. फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील सुधारित आकडेवारी जागतिक आरोग्य संघटना एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन आकडेवारीत कोव्हीड मृत्यूची संख्या सुमारे दीड कोटी एवढी असू शकते. सध्या हीच आकडेवारी साठ लाखांच्या आसपास आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि द गार्डियनमधील वृत्तानुसार भारतातील सुधारित कोव्हीड रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी ही आताच्या आकडेवारीपेक्षा सात ते दहापट अधिक असू शकते. भारतातील काही राज्यांचा विचार केला तर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील कोव्हीड रुग्णांचे मृत्यू हे दाखवलेल्या संख्येपेख्या कितीतरी पट अधिक आहेत. भारताबरोबर चीनमधील आकडेवारीवरही जागतिक आरोग्य संघटना आणि चीन सरकार यांच्यामध्ये वाद सुरु झाले आहेत.

चीनमधील अगदी अलीकडचे उदाहरणच पाहायचे झाले तर शांघाय या त्यांच्या आर्थिक राजधानीत मार्च 2022 पासून चार लाख कोव्हीड रुग्णांची नोंद झाली आहे; पण मृत्यू मात्र फक्त दहाच नोंदले गेले आहेत. तसेच कोव्हिडची सुरवात झाल्यापासून आत्तापर्यन्त चीनमध्ये फक्त पाच हजारच मृत्यूंची नोंद केली गेली आहे. भारत सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सुधारित आकडेवारीवर आक्षेप घेण्यास काही कारणे सांगितली आहेत. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेने मृत्यूची नोंद करणारे जे संख्याशास्त्रीय मॉडेल वापरले आहे ते अचूक नाही. भारतासारख्या लोकसंख्येने महाकाय देशासाठी हे मॉडेल लागू पडत नाही. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हीड मृत्यूची आकडेवारी ठरवण्यासाठी जगातील देशांची दोन प्रकारात विभागणी केली आहे ( टीअर-1 आणि टीअर 2). भारत सरकारच्या म्हणण्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेने टीअर-1 देशांमधील संख्याशात्रीय मॉडेल वापरून त्याआधारे टीअर2 देशांतील सरासरी मृत्यू ठरवले आहेत. टीअर 1 मध्ये विकसित देशांचा समावेश केला असून टीअर 2 मध्ये विकसनशील आणि आफ्रिकन देशांचा समावेश केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार त्यांनी खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील कोव्हीड दरम्यानचे मृत्यू, सरकारी आकडेवारी, स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, काही स्वयंसेवकांच्या मदतीने घरोघरी जाऊन केलेली सर्वेक्षणे आणि सांख्यशास्त्रीय मॉडेल्स यांच्यावरून कोव्हिडच्या मृत्यूचे अनुमान काढले आहे. ङ्गद हिंदूफ या भारतीय वृत्तपत्राच्या माहितीनुसार देशातील 18 राज्यांमध्ये कोव्हिडच्या मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत आहे. याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या गणनेत थेट कोविड-19 मुळे झालेले मृत्यू, कोविड-19 झाल्यामुळे रुग्णामध्ये जी गुंतागुंतीची परिस्थिती झाली आणि त्यामुळे त्यांचे मृत्यू झाले, त्याचबरोबर कोविड-19 झाला नाही, पण या साथीच्या आजारामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत अशा लोकांचे मृत्यूही यात समाविष्ट केले आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात असेही म्हटले आहे की काही देशांनी कोव्हीडमुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा वेळोवेळी मागोवा घेतला आहे आणि तो जागतिक आरोग्य संघटनेला सादर केला आहे; परंतु भारताने गेल्या दोन वर्षांपासून ते केले नाही. त्यात असेही म्हटले आहे की, भारत आणि इतर काही देशांमध्ये मृत्यूची आकडेवारी अनिश्चित आहे. या सर्व कारणामुळे सध्या भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. लवकरच जागतिक आरोग्य संघटनेचे एक शिष्टमंडळ भारताला भेट देणार आहे, यावेळी ते गुजरातमध्ये भारत सरकारच्या सहकार्याने उभारलेल्या पारंपारिक औषध उपचारपद्धती या संशोधन केंद्राचे उदघाटन करणार आहे. यावेळी सरकारी स्तरावर बोलणी होऊन या गुंतागुंतीच्या समशेवर मार्ग निघून जागतिक आरोग्य संघटना आपला कोव्हीड मृत्यूचा अहवाल प्रसिद्ध करेल अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या