Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedभाजपच्या बाटलीत राष्ट्रवादीचे रॉकेट

भाजपच्या बाटलीत राष्ट्रवादीचे रॉकेट

अनिल चव्हाण, धुळे 98222 95194

यंदाच्या दिवाळीला कोरोनाची पाश्वभूमी असल्याने साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सूचना शासन, प्रशासनाने दिल्या आहेत.

- Advertisement -

मात्र भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक महत्व असणार्‍या या सणावर कोणतेच बंधने येवू शकत नाही, हेच बाजारपेठेतील गर्दीवरुन जाणवते आहे.

एकीकडे कोरोनाची भिती झुगारुन दिवाळी साजरी होत असतांना दुसरीकडे मात्र राजकीय फटाक्यांची आतिषबाजी सूरू झाली आहे.

राज्याच्या राजकारणाचा परिणाम थेट गावपातळीवर गल्लीपर्यंत जाणवू लागला आहे. पूर्वी दिवाळीत हातात सुसुंदरी घेवून आम्ही ‘दिन दिन दिवाळी..’ असे म्हणायचो आता माफी मागून असे म्हणावे लागते,

दिन दिन दिवाळी.. आरती ओवाळी

आरती कोणाची.. नेत्यांची

नेते कुणाचे.. पक्षाचे

पक्ष कुणाचा… कार्यकर्त्यांचा

कार्यकर्ते कुणाचे.. देईल त्याचे!

राजकारणात ही अशी वेळ का आली हा चिंतनाचा मोठा विषय आहे. पुर्वी शब्दावर जगणारे, दिलेला शब्द पाळण्यासाठी वाट्टेल ते करणारे कार्यकर्ते गेल्या काही वर्षात का बदलले? त्यांना कोणी बदलवण्यास भाग पाडले? अर्थात आजही अनेक निष्ठावंत कार्यकीर्ते आहेत.

पण या प्रश्नांची उत्तरे शोधाविच लागतील. कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांच्या जीववार मोठे झाल्यानंतर त्यांना सोयीने सोडून देणार्‍या नेत्यांची कमतरता नाही.

म्हणूनच सोशल मिडियावर फिरणारा मेसेज उपहासात्मक वाटत असला तरी तो वास्तव आहे. तो म्हणजे निवडून येताच नेते काही महिन्यात मर्सिडीजमध्ये फिरतात अन् कार्यकर्ते अजूनही ‘गाडीत पेट्रोल भरणार असेल तर तुझ्या सोबत येतो.’ अशा अटी शर्तींवर जगतांना दिसतात. असो,

आपला मुद्दा यंदाच्या दिवाळीनिमित्त फुटणार्‍या राजकीय फटाक्यांसंदर्भात आहे. सत्ता गेल्यापासून अस्वस्थ असणार्‍या भाजपाने सरकारवर टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. तीन चाकांवर चालणारे महाआघाडीचे सरकार टिकणार नाही असे सांगत यापैकी एक चाक पंक्चर करुन सरकार पाडण्याच्या हालचाली जोरात सूरु असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे काळजी करु नका, सरकार पाच वर्षे टिकेल असा दिसाला महाविकास आघाडीचे नेते देत आहेत. काही असो पण निवडणुकीच्या पुर्वी इतर पक्षांमधून आपल्याकडे अनेकांना प्रवेश देत भाजपने फोडा फोडीचे राजकारण केले. येईल त्यांना प्रवेश दिला. धुळे शहरात माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांच्यासह 80 टक्के राष्ट्रवादी भाजपात डेरेदाखल झालेत.

शिरपूरात माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी काँग्रेसकडे प्रचारापुरतेही कार्यकर्ते शिल्लक ठेवले नाहीत. तर शिंदखेड्यात माजी मंत्री जयकुमार रावल यांनी ज्येष्ठ नेते डॉ.हेमंत देशमुखांसह त्यांच्या तमाम समर्थकांचे खुलेआम समर्थन मिळविण्याची जादूची कांडी फिरवली. परिणामी शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे महापालिकेत भाजपला अपेक्षित यश मिळाले.

धुळे महापालिका एकाहाती भाजपच्या ताब्यात गेली. पाठोपाठ जिल्हा परिषदेचीही सत्ता काबीज झाली. एकूणच काय तर जिल्ह्यात भाजपसाठी पाचही बोटे तुपात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपची पतंग उंच आकाशात डोलाने उडू लागली.

गिरीश महाजन यांच्या मांजाने कोणाशीही पेच लावून त्यांची पतंग कापण्याची भाषा भाजपाही बोलू लागलेत. आता मात्र राजकीय चित्र बदलते आहे. दमदार आवाजाचे फटाके म्हणून आपल्याकडे घेतलेल्यांपैकी काही फुसके बार ठरले आहेत. तर काहींच्या वाती बाहेर निघाल्याच नाहीत.

आमचेच फटके, आमचाच आवाज

दिवाळीत आपले रॉकेट उंच आकाशात जावे, उगाच इकडे-तिकडे घुसून काही अनर्थ घडू नये, यासाठी काचेच्या बाटलीत रॉकेट उभे करुन पेटविण्याची पध्दत आहे.

इथे याच अर्थाने बाटलीचा उल्लेख असून विनाकारण कोणी बाटली म्हणताच आपल्या सोयीने अर्थ काढून तगारीतल्या तगारीत तात्पुरत्या फिरणार्‍या भुईचक्करसारखा आनंद घेवू नये, हे आधीच स्पष्ट केलेले बरे.

भाजपाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आता राष्ट्रवादीच्या दमदार आवाज करणार्‍या नेत्यांपैकी एक बनले आहेत. तत्पुर्वीच धुळ्याचे माजी आ.अनिल गोटे हे राष्ट्रवादीचे रॉकेट हातात घेवून आपल्या विरोधकाच्या दिशेने उडविण्यासाठी केव्हाच सज्ज झाले आहेत.

आता ही जोडगोळी पुर्वी राष्ट्रवादीचे असलेल्या परंतु मध्यंतरी भाजपात जावून बसलेल्या आपल्याच व्यक्तींच्या गोळाबेरीज करण्यावर लक्ष केद्रींत करीत आहेत. एका अर्थाने ते आपल्याच वाजणारे फटाके जमविण्यावर भर देत आहेत. त्याच्या दुष्टीने वात असलेले अन् भरगच्च दारुगोळा भरलेले फटाके एकत्र आले तर मोठा धमाका घडवून आणता येवू शकतो. कदाचीत यासाठीच त्यांचे हे प्रयत्न सुरु असावेत.

आपल्याच फटाक्यांच्या लडीतून निखळून पडलेले फटाके गोळा करण्यावर त्यांचा भर आहे. अर्थात त्यात काही धमाकेबाज फटाके आहेत, तर काही छोटे असले तरी मोठा आवाज करणार्‍या लवंगी फटाक्यांचाही समावेश असू शकतो.

परंतु यापूर्वी भाजपने केलेली खेळी त्यांच्यावरच उलटविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेतेगण परिश्रम घेत आहेत. बाटली भाजपाची असली तरी त्यात राष्ट्रवादीचे रॉकेट लावून ते उंच उडविण्याचाच या नेत्यांचा सध्यातरी प्रयत्न आहे. येत्या शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचा धुळे-नंदुरबार दौरा असल्याने ते अजून कोणता दारुगोळा भरुन जातात, केव्हा धमाका करायचा याचा कानमंत्र देवून जातात, यावर बरेचकाही अवलंबून आहे. तोपर्यंत भाजपच्या बाटलीत आपले रॉकेट ठेवून आपलेच फटाके आपलाच आवाज या आनंदात राष्ट्रवादी नाचत आहे.

सेना-काँग्रेस आपल्याच खुशीत

राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांच्या गटबंधनाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे म्हणूनच नेते, कार्यकर्ते फोडतांना या तिघांपैकी कुणाला हात लावायचा नाही, असे जणू त्याच्यात ठरले आहे.

यामुळेच राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करतांना शिवसेना व काँग्रेस सोडून असा जाणीवपूर्वक प्रचार केला जातो आहे. या दोन्ही पक्षांपैकी कोणाला राष्ट्रवादीत यायचे असेल तर त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्यासह अन्य पदाधिकारी सांगत आहेत. आपल्या गटबंधनमुळे कुणी आपले फोडणार नाही या खुशीत शिवसेना आणि काँग्रेस आहे.

त्यामुळे त्यांना पक्ष सोडून जाणार्‍यांना थोपविण्यासाठी भाजपसारखे विशेष प्रयत्न करण्याची सध्यातरी त्यांना गरज नाही. आवाज कुणाचा.. शिवसेनेचा म्हणत, आपला आवाज म्हणजे सुतळी बार सारखा दमदार असल्याचा त्यांचा दावा कायम आहे. तर सत्तेत असूनही राज्यात चमत्कार दाखविण्या ऐवजी देश व राज्य पातळीवरचे विषय घेवून जिल्ह्यातच आंदोलन करण्यावर काँग्रेसचा भर आहे.

काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनाच पक्षाची धुरा सांभाळावी लागते आहे. आपल्या परीने होईल तेव्हढा आवाज काढून इतरांच्या कानठिळ्या बसविण्याचा त्यांचा प्रयत्नही दखल घेण्याजोगाच आहे.

दिवाळीच्या फटाक्यात सुसुंदरीचे आपले वेगळेच महत्व आहे. कुणालाही इजा न करता काही क्षण का होईना लख्ख उजेड पाडून सार्‍यांचे लक्ष वेधून घेण्याचे काम तिला चांगलेच जमते. राज्याच्या राजकारणात मनसे निवडणुकीत सार्‍यांचे लक्ष वेधून घेते, हजारो, लाखोने संख्या गोळा करते. यावेळी चमत्कार घडणारच असा आभासही निर्माण होतो.

पण त्यांचा हा लख्ख उजेड निवडणुकीपूरताच ठरतो. अर्थात आपल्याला मनसेवर टिका करायची नाही, पण केंद्रानेही दखल घ्यावी असे एकखांबी नेतृत्व मनसेकडे असतांना त्यांच्या आवाजाचा परिणाम मतपेटीवर का दिसत नाही? हा देखील संशोधनाचा विषय आहे.

पूर्वी सेना-भाजपची अन् काँग्रेस-राष्ट्रवादीची घट्ट जोडी होती. आता त्यांच्यात त्रांगडे झाले. 25 वर्षांची यारी दोस्ती फुटून सेना-भाजप वेगवेगळे झालेत. विचाराशी तडजोड करीत कट्टर आणि लवचीक एकत्र येत तिघांची महाविकास आघाडी गठीत झाली. आता भाजप विरुध्द तिघे असे चित्र राज्यात आहे. हिच परिस्थिती अगदी गावपातळीपर्यंत असल्याने एकट्या भाजपाला चारही बाजूने घेरण्याचा बाकी प्रयत्न करीत आहेत.

परंतु कोणी कितीही सुतळीबार फोडलेत, जवळ येवून आपटीबार वाजविलेत किंवा आकाशात रॉकेट सोडून जमीनीवरील पाय उचलून हवेत तरंगण्याचा आनंद घेतला तरीही एकाच जागेवर घट्ट पाय रोवून इतरांनाही आपल्या प्रकाशात सामावून घेणार्‍या फुलझाडीसारखी भूमिका भाजप वटवित आहे. कोण काय करते याची त्यांना पर्वा नाही.

कुणाचा किती मोठा आवाज आहे याकडे ते लक्ष देत नाही. कारण आम्ही आणि आमचे ठरले आहे, दिवाळी मनवायची पण केवळ इतरांच्या फराळात वाटेपाडून नाही, अशी भाजपची भुमिका दिसते. त्यामुळे कोरोनाची पार्श्वभूमी असलेल्या यंदाच्या दिवाळीत भलेही फटाक्यांचा आवाज कमी जाणवेल पण राजकीय फटाके मात्र जोरात फुटत असल्याचे दिसते आहे. बघुया कुणाच्या आवाजात कोण नाचण्याचा आनंद घेतो ते.

- Advertisment -

ताज्या बातम्या