प्रतिभावान गीतकार 'आनंद बक्षी'

प्रतिभावान गीतकार 'आनंद बक्षी'

आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई सुमित्रा आनंद बक्षी ते पाच वर्षांचे असताना वारली. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणी दरम्यान 2 ऑक्टोबर, 1947 रोजी भारतात आले. आणि दिल्लीत स्थायिक झाले.

रावळपिंडी येथे जन्मलेल्या आनंद बक्षीनां तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कविता लिहिण्याचा छंद लागला होता. भारतीय सेनेच्या सिग्नल विभागात स्विच बोर्ड ऑपरेटर च्या स्वरुपात काम करणारे आनंद बक्षी, चित्रपट गीतकार बनण्याचे स्वप्न बघत होते. आणि त्यासाठी सैन्यातील नोकरी सोडून ते मुंबईत आले. पण तेथे गीतकार म्हणून नावारूपास येण्याकरता त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.

मुंबईतून निराश होऊन ते परत गेले आणि 1957 मध्ये पुन्हा मुंबईला आले. त्यावेळी भगवान दादांनी त्यांना मभला आदमीफ या चित्रपटासाठी गीतकार म्हणून काम दिले. या कामाचे त्यांना दीडशे रुपये मानधन मिळाले होते. त्या काळात ती रक्कम तशी मोठी होती. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी त्यांना आणखीन चार चित्रपटांची कामे मिळाली. 1961 पर्यंत त्यांनी जवळजवळ बारा चित्रपटांसाठी गीते लिहिली. पण आनंद बक्षी हे नाव खूप लोकप्रिय झाले नाही.

त्यांनी लिहलेले 1961 च्या मरजिया सुलतानफ या चित्रपटातील, ढलती जाये रात, कहले दिल की बात या गाण्याने लोकप्रियता मिळवली. मिस्टर एक्स इन बॉम्बे चित्रपटातील, मेरे मेहबूब कयामत होगी अशा काही चित्रपट गीतांनी त्यांचे नाव चित्रपट सृष्टीत चर्चेत राहू लागले. आणि नंतर 1970 पासून पुढील तीन-चार दशके तर सतत चर्चेत असणार्‍या आनंद बक्षीनी अक्षरशः ढीगभर गाणी लिहिली. अनेक वेळा संगीतकाराच्या चालीत बसणारे अचूक शब्द निवडण्यात आनंद बक्षींचे कौशल्य दाद देण्याजोगे होते.

चांद सी मेहबूबा हो (हिमालय की गोद मे), एक था गुल (जब जब फुल खिले), बहारो ने मेरा चमन लूट कर आणि आया है मुझे फिर याद वो जालिम ( देवर) हम तुम युग युग से आणि मुबारक हो सबको (1967 चा मिलन ) ही अशी काही गीते आहेत की जी, आशयसंपन्न व अर्थपूर्ण अशी आहेत. अमर प्रेम, हरे राम हरे कृष्ण, तकदीर , आये दिन बहार के, आपकी कसम, शालीमार, आशा, सरगम, कटी पतंग यासारख्या अनेक चित्रपटातील गीते मनाला भावणारी अशी आपणाला दिसून येतात.

चित्रपटाचे कथानक, प्रसंग , यास अनुषंगून गीत लिहिण्याची प्रतिभा त्याच्याकडे होती म्हणूनच सुभाष घई, यश चोप्रा, प्रसाद प्रॉडक्शन, राजश्री प्रॉडक्शन, राज खोसला, शक्ती सामंता अशा दिग्गजांनी त्यांना प्राधान्य दिले. हिंदी, ऊर्दू, आणि पंजाबी भाषेचे प्रचंड भांडार आनंद बक्षी जवळ होते व त्याीआधारे ते साजेसे गीत लिहीत असत. लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, एस.डी. बर्मन, आर डी बर्मन या संगीतकारांच्या धूनवर गीते लिहिणार्‍या आनंद बक्षीनी नंतरच्या पिढीतील शिवहरी, जतीन ललित तसेच ए .आर . रहमान या संगीतकारांच्या धूनवरही गाणी लिहिली.

आनंद बक्षी यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य सांगताना हे आवर्जून सांगावेसे वाटते की, एखादी गोष्ट काव्यातून सांगावी तर ती आनंद बक्षींनी! उदाहरणार्थ, जब जब फुल खिले चित्रपटातील एक था गुल हे गीत. 1982 च्या जीवनधारा चित्रपटातील गंगाराम कवारा रह गया हे गीत! याखेरीज प्रश्नोत्तरे पद्धतीने लिहिलेली गीते उदाहरणार्थ, अच्छा तो हम चलते है (आन मिलो सजना) वो कौन है वो कौन है (अंजना) वो क्या है (अनुराग) या गीतांव्यतिरीक्त, एक दुजे के लिये चित्रपटात तर त्यांनी वेगळाच प्रकार केला. चक्क 64 हिंदी सिनेमांची नावे एकापुढे एक ठेवली. मेरे जीवन साथी, प्यार किये जा अशी नावे एकत्र करून अर्थ असणारे एक गीत बनवले.

आनंद बक्षी यांचा मोठेपणा म्हणजे त्यांनी स्वतः कबुली दिली होती की, काव्याचे व्याकरण मला कळत नाही, मोठ्या उपमा अलंकार वापरून गीत तयार करणे मला जमत नाही. परंतु अशी कबुली देणारे बक्षी शब्दांचे वजन आणि संगीतकाराच्या चालीचा ठेका जेाणून घेऊन अशी काही रचना करून जात असत कि ते गीत सहजासहजी आपल्या ओठात बसायचे. अशा एक दोन ओळीतच गहन अर्थ असायचा.

मानवी जीवन, मानवी जीवन जगण्याच्या पद्धती, या दृष्टिकोनातून भाष्य करणारी आनंद बक्षी यांची गीते हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. ये जीवन है इस जीवन का, कैसे जीते है भला, बुरा मत सूनो बुरा मत देखो, देखो ओ दिवानो तुं ये काम ना करो, गाडी बुला रही है. ही गीते लक्षपूर्वक ऐकून समजून घेतली तर पथदर्शक ठरतील यात संशय नाही. असेच एक सत्य त्यांनी आपल्या गीतातून उतरवले आणि त्यातील आशया प्रमाणे आपल्या गीताद्वारे स्वतःची आठवण मागे ठेवून 30 मार्च 2002 रोजी ते या दुनियेतून निघून गेले. त्यांनी लिहिलेले ते सत्य होते,

आदमी मुसाफिर है,

आता है जाता है

आते जाते रस्ते मे

यादे छोड जाता है!

आपल्या सिद्धहस्त लेखणीने रसिकांच्या जीवनात मधुर आनंद पसरवणार्‍या आनंद बक्षी यांना मनापासून सलाम !

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com