Friday, April 26, 2024
HomeUncategorizedखदखदणार्‍या ताणाचा स्फोट

खदखदणार्‍या ताणाचा स्फोट

– कमलेश गिरी

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमाच्या मराईगुडा भागातील सीआरपीएफच्या छावणीत एका जवानाने झोपेत असलेल्या साथीदारांवर बेछुट गोळीबार करून चौघांना ठार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सशस्त्र दलातील जवानांत खदखदणार्‍या ताणाचा स्फोट म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

- Advertisement -

सीआरपीएफच्या छावणीतील गोळीबारात चौघांच्या मृत्युशिवाय आणखी दोघे गंभीर जखमी झाले. साथीदाराच्या टीका-टिपणीने मनोधैर्य गमावलेल्या जवानाने झोपेतच बेसावध असलेल्या साथीदारांवर एके-47 ची संपूर्ण मॅगझिनच चालवली. या घटनेमागचा उलगडा चौकशीअंतीच होईल. पण अशा प्रकारच्या घटना केवळ छत्तीसगडपुरतीच मर्यादित नाही तर झारखंड, आसाम, काश्मीरमध्येही कोठे ना कोठे छावणीत होताना दिसतात. परंतु संख्येच्या पातळीवर विचार केल्यास छत्तीसगडमध्ये अशा प्रकारच्या घटना अधिक होत असल्याचे दिसून येते गेल्या तीन वर्षात अशा घटनांत सुमारे 15 जवानांचा मृत्यू झाला आहे. सुकमाच्या घटनेने मध्य प्रदेशातील मंदसौरच्या लोकांना 38 वर्षापूर्वीच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. कारण 23 जून 1983 रोजी जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर परिसरात मानसिक संतुलन ढासळलेल्या एका जवानाने अचानक गोळीबार सुरू केला. या घटनेत मंदिराचे पुजारी, व्यापारीसह तब्बल 13 जणांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झाले. पोलीस कर्मचारी रमेश शर्मा याने सायंकाळी अचानक गोळीबार सुरू केला. तब्बल 40 मिनिटांपर्यत तो गोळीबार करत होता. त्यानंतर अन्य पोलीस जवानांनी रमेशला गोळी घालून ठार केले.

मंदसौरची चार दशकांपूर्वीची घटना असो किंवा सुकमातील प्रकार असो या घटना ड्यूटीवर असलेल्या जवानांतील मानसिक अस्वस्थतेचे दर्शन घडवत आहेत. विशेषत: छत्तीसगडमध्ये अशा घटनांत वाढ होणे ही राज्य आणि केंद्र सरकारबरोबरच सीआरपीएफच्या अधिकार्‍यांसाठी चिंतेची बाब आहे. लष्कर आणि निमलष्करी दलात आत्महत्या किंवा अन्य लहानसहान वादावरून साथीदारांचा जीव घेण्याचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर हुतात्मा होणार्‍या जवानांच्या तुलनेत गेल्या पाच वर्षात आत्महत्येने मृत्युुमुखी पडणार्‍या जवान आणि अधिकार्‍यांची संख्या अनेक पटीने अधिक आहे. सीआरपीएफ आणि आयटीबीपीसारख्या निमलष्करी दलाचा विचार केल्यास हे आव्हान अधिकच गंभीर मानले जात आहे. लष्करातील स्थितीचे अनेक वर्षाचे आकलन केल्यानंतर जवान आणि अधिकार्‍यांतील तणाव समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सिस्टिम विकसित केली आहे. परंतु त्याची गरज केंद्रीय सुरक्षा दलाला भासत आहे.

बस्तर, ओडिशा, नागालँड, झारखंड किंवा काश्मीरच्या संवेदनशील भागात जवानांची नियुक्ती ही सीमेवर गस्त घालणार्‍या जवानांपेक्षा अधिक बिकट मानली जाते. नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा दलांना अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. कारण स्थानिक लोकांतील शत्रू कोण आहे, हे समजणे कठिण जाते. अशावेळी एखाद्या मोहिमेवर निघाल्यानंतर आणि छावणीबाहेर आल्यानंतर जवानांना अनेक चिंतेने ग्रासलेले असते, तणावाखाली वावरावे लागते. गोळी कोठून येईल, हे सांगता येत नाही. एवढेच नाही तर एखादा जवळून जाणारा व्यक्ती चाकू हल्ला करेल किंवा पिस्तुल काढून गोळीबार करेल, अशी स्थितीची टांगती तलवार जवानांवर असते. त्यातही कौटुंबीक तणाव असेल तर तो ताण आणखीच वाढतो. केंद्रीय दलात कार्यरत असलेल्या जवानांना तणावातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत.

परंतु सुकमाच्या घटनेने या व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या. अर्थात जवानांत असणार्‍या तणावामागे केवळ सुटी न मिळणे हे एकमेव कारण नाही. छावणीतील वातावरण आणि जवान-अधिकारी यांच्यातील ताळमेळ याचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या घटनेचे विश्लेषण केल्यास 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणात संवादाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. चांगल्या संवादासाठी नक्षलग्रस्त भागात जवान आणि अधिकारी यांचे संबंध अधिक दृढ आणि सामंजस्यपूर्ण असणे गरजेचे आहे. या आधारावर मर्यादा राखूनच अधिकारी आणि जवान यांच्यातील अनौपचारिक संबंधात वाढ करता येणे शक्य आहे.

या कृतीने आत्महत्या किंवा हत्येसारखे प्रकार रोखण्यास मदत मिळू शकते. वास्तविक नैराश्य किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाच्या मानसशास्त्रीय समस्येत अडकलेला जवान हा आपल्या दैनंदिन वर्तनातून संकेत देत असतो. अधिकारी आणि साथीदारांना या संकेताचे आकलन करणे आणि ती भाषा वेळीच समजून घेणे गरजेचे आहे. सीआरपीएफच्या जवानांतील तणाव दूर करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आयआयएम लखनौत संशोधन करण्यात आले. निमलष्करी दलाच्या बाहेरील संस्थेच्या तज्ञांच्या मदतीने अशा प्रकारचे संशोधन हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

या संशोधनाला वेग आणण्याची काळाची गरज आहे.या जोडीला देशभरात ठिकठिकाणी तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांचे मानसशास्त्रीय सर्वेक्षण करण्याची गरज आहे. मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रीय तज्ञांच्या मदतीने अडचणीत असलेल्या जवानांची एाळख पटवता येईल. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करणे शक्य आहे. कारण अशा प्रकारचे जवान हे केवळ स्वत:साठीच नाही तर साथीदार आणि नागरिकांसाठी देखील धोकादायक ठरू शकतात. त्याची प्रचिती मंदसौरच्या घटनेतून किंवा सुकमाच्या घटनेतून आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या