Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedपरिस्थिती स्वीकारा आणि आनंदी बना

परिस्थिती स्वीकारा आणि आनंदी बना

– डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

महामारीच्या काळात इतर आरोग्याएवढीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. सध्याच्या परिस्थितीत नैराश्य येणे साहजिक आहे. ही परिस्थिती स्वीकारून, ती सर्वांसाठी सारखीच आहे, त्यातून मार्ग काढायला हवा. आनंदी जगण्यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

- Advertisement -

सर्वप्रथम नेहमी फक्त आजच्या दिवसाचाच विचार करावा. उद्याचा दिवस कसा जाईल याची काळजी टाळावी. तणाव कसा हाताळायचा हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते. काही लोक ताणावर मात करून तो आनंदी बनवतात. काही लोक सारखा त्याचाच विचार करून मनाला वारंवार क्लेश देत राहतात. आता आपण ठरवायचं काय करायचं ते!

गेल्या काही वर्षांत वाढती स्पर्धा आणि वाढत्या अपेक्षा यामुळे आयुष्य प्रचंड ताणतणावाचे बनले आहे. यामुळे जगण्यातला आनंद हरपत चालला आहे, असा सूर अनेक ठिकाणी ऐकायला मिळतो. नैराश्यासारखा शब्दप्रयोग तर हल्ली सर्रास ऐकू येतो. खरे म्हणजे आनंद हा आपल्या विचारातून मिळवता येतो. तो मिळवण्यासाठी दररोज मोकळ्या हवेत फिरणे, शक्य असेल तर विविध प्रकारचे खेळ खेळणे हे करता येईल. दहा मिनिटे स्तब्ध बसून आपला दिवस कसा गेला याच विचार करावा. या मूल्यमापनाचा आनंदी जगण्यासाठी उपयोग होतो. हे मूल्यमापन करतानाच उद्याचा दिवस आपण कसा घालवणार आहोत याचाही विचार करायला हवा. आनंदी आणि सक्षम राहण्यासाठी दररोज किमान सात ते आठ तास झोपणे गरजेचे आहे. आजच्या काळात माणूस 13 ते 14 तास बौद्धिक, शारीरिक काम करत असतो. त्यामुळे त्याला पुरेशा झोपेची विश्रांती मिळायला हवी. यामुळे मेंदूचा रिदम चांगला मेंटेन होतो. यामुळे मानसिक आजार होण्याचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे शारीरिक आजारही होण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी आपला आहार सकस आणि योग्य असायला हवा. झोपेतून उठल्यानंतर स्फूर्ती आणि मन लावून काम केले तर आनंद आणि समाधान लाभते. कामातून मोकळा वेळ मिळेल तेव्हा चांगली पुस्तके वाचावीत. त्याचप्रमाणे शब्दकोडी सोडवायलाही हरकत नाही. शब्दकोडी सोडवल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. तसेच विसराळूपणा यामुळे कमी होतो.

मेंदूचे काम चांगले चालले तर मन आणि शरीर साथ देते. हे सर्व करतानाच रात्री झोपताना आजचा दिवस चांगला गेला की वाईट गेला याचा विचार करावा. नेहमी फक्त आजच्या दिवसाचाच विचार करावा. उद्याचा दिवस कसा जाईल याची काळजी टाळावी. तसे केले तर आनंद मिळण्याऐवजी तणाव आणि दुःखच पदरी येते. काम करताना अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. आपण कधीही परिस्थिती बदलू शकत नाही. ज्या गोष्टी आणि परिस्थिती नियंत्रणात नाही त्याचा खोल विचार कधी करू नये. मनाचे आणि वेळेचे योग्य नियोजन असेल तर अनेक गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात.

आनंदी राहण्यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे दुसर्‍यांच्या आयुष्यात कधी हस्तक्षेप करू नये. तो कसा वागतो, त्याचे कसे चांगले चालले आहे आणि आपल्या आयुष्यात मात्र कसे वाईट घडते आहे याची तुलना कधी करू नये. त्याचप्रमाणे कधीही दुसर्‍यांचा मत्सर करू नये. मत्सर किंवा द्वेष असेल तर इतरांशी असणारे आपले संबंध बिघडतात आणि दुःखाला निमंत्रण मिळते. एखाद्याने आपल्या मनाविरुद्ध किंवा चुकीची गोष्ट केली तर त्याला माफ करायला शिकायला हवे. क्षमाशील राहिल्यामुळे चांगला आनंद मिळतो. पती-पत्नीच्या नात्यात आजकाल दोघेही नोकरी करणारी असतात. प्रत्येकाला आपापले काम महत्त्वाचे वाटते. तसे ते वाटत असले तरी कुटुंबाला प्राधान्य द्यायला हवे. यामुळे कुटुंबामध्ये परस्परांशी असणारे संबंध चांगले राहून आनंद निर्माण होतो.

आपल्या आयुष्यात अनेकदा भूतकाळात वाईट गोष्टी घडलेल्या असतात. काही लोकांना घडून गेलेल्या त्याच त्याच गोष्टींची वारंवार चर्चा करण्याची सवय असते. यामुळे ज्याच्याशी आपण ही चर्चा करतो आहोत त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि आपलाही आनंद खराब होतो. मित्र किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना कधीही दुखावू नये.

याचबरोबर अवास्तव अपेक्षा हेदेखील निराशा किंवा औदासिन्य वाढण्याचे कारण असते. अनेकदा आपण अवास्तव अपेक्षा बाळगतो. ज्या गोष्टी साध्य होऊ शकणार नाहीत त्याही आपल्याला मिळायला हव्यात असे वाटते. असा विचार केल्यामुळे ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मनावर नैराश्याचे सावट येते. आपण काय साध्य करू शकतो, आपला कल कोणत्या गोष्टींकडे आहे याचा विचार करून त्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मनाचा विचार असा व्यापक असेल तर आनंद निर्माण होतो.

मनाला नेहमी सांगावे की आपला सर्वोत्तम काळ येणार आहे. असा विचार केल्यामुळे ध्येय पूर्ण होऊ शकतात. वाईट परिस्थितीत कधीही मनाचा धीर सोडू नये. वाईट गोष्टी किंवा वाईट काळ टाळण्याऐवजी त्याचा सामना करायला शिकायला हवे. असे केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि समाधान मिळते. मध्यंतरी, एक संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार, जो आनंदी राहतो, चिंता कमी करतो त्याचे आयुष्य लांबते म्हणजे तो दीर्घायुषी होतो. ताणतणाव अनेक प्रकारचे असतात. काही लोकांसाठी ताण हे प्रॉडक्टिव्ह असतात, तर काही लोकांसाठी ते त्रासदायक ठरतात. तणाव कसा हाताळायचा हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते. काही लोक ताणावर मात करून तो आनंदी बनवतात. काही लोक सारखा त्याचाच विचार करून मनाला वारंवार क्लेश देत राहतात. आजच्या परिस्थितीत ड्रायव्हिंग करणे हादेखील एक ताण आहे. पण काही लोक त्या ताणातच वावरतात. तर काही जण यावेळी निर्धास्त असतात. परिस्थिती कोणतीही असली तरी तिचा स्वीकार केला की ताण रहात नाहीत आणि सुखसमाधान मिळते. मनावर नैराश्याचे गंभीर मळभ असेल म्हणजे आत्महत्या करावी, यांसारखे विचार येत असतील तर अशा वेळी तज्ज्ञांचा किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारचे विचार मेंदूमधील बदलांमुळे येऊ शकतात. अनेकजण याचा स्वीकार करायला तयार नसतात. पण त्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे एखादा ताप आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांना भेटतो तशाच प्रकारे दीर्घकाळ उदास वाटत असेल तर डॉक्टरांना जरुर भेटा. याखेरीज वेगवेगळ्या प्रकारचे छंद हाताळूनही आनंद निर्माण करता येऊ शकतो. संगीत ऐकणे हा एक चांगला आनंद आहे. त्याचप्रमाणे खेळणे, वाचन करणे अशा छंदांमधूनही आनंद मिळू शकतो. प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे कोणत्या प्रकारचा छंद अंगिकारायचा हे आपण स्वतःच ठरवायला हवे. अशा काही क्लृप्त्या बाळगल्या तर आनंद दूर राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या