Friday, April 26, 2024
HomeUncategorizedचंदनशेतीचा फायदेशीर पर्याय

चंदनशेतीचा फायदेशीर पर्याय

अंबासन । प्रशांत भामरे | Ambasan

बागलाण तालुक्यात (baglan taluka) एकेकाळी द्राक्ष उत्पादनात (Grape production) अग्रेसर असलेले व सातासमुद्रापार द्राक्ष निर्यात (Grape exports) करणारे नामपूरचे (nampur) आदर्श शेतकरी (farmer) प्रवीण मुथा यांनी मजुरांची टंचाई (Labor shortage), विजेचा लपंडाव व बाजारभावाचा कुठेच मेळ बसत नसल्याने आपल्या सहा एकर क्षेत्रात द्राक्षशेतीकडे पाठ फिरवून चंदनशेतीचा (Sandalwood farming) पर्याय निवडला आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी सफेद चंदनरोपांची (White sandalwood) लागवड केली आणि ती चांगलीच बहरली आहेत.

- Advertisement -

प्रत्यक्षात चंदनाच्या झाडाची वाढ होण्यासाठी किमान चौदा ते पंधरा वर्षे लागतात. शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याबाबत नेहमीच अग्रेसर राहणारे मुथा चार वर्षांपूर्वी लातूर परिसरात शेती पाहणी करीत असताना एका नर्सरीत (Nursery) त्यांना चंदनाची रोपे (Sandalwood seedlings) दिसली. विचारणा केली असता दहा वर्षाचेच हे पीक असल्याचे संबंधित शेतकर्‍याने सांगितले. त्याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर मुथा यांनी चंदनशेती करण्याचा निर्णय घेतला. बंगळूरू (Bangalore) येथून प्रति रोप 52 रुपये दराने दोन हजार पन्नास रोपे मागवली व आपल्या सहा एकर क्षेत्रात 14 बाय 10 अंतरावर चंदन रोपांची लागवड केली.

त्यात डाळिंबाचे (Pomegranate) आंतरपीकही घेतले. परंतु डाळिंबाचे झाड लवचिक असल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नाही. चंदनाच्या बागेत मिलीया डुबिया झाडांची लागवड योग्य असते. परोपजीवी मुळी म्हणजे एका झाडाआड दुसरे झाड लावावे लागते. चंदनशेती खूप खर्चिक असली तरी शेतकर्‍यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे. तिचे संरक्षण व विमा ही काळाची गरज आहे. चार ते सहा महिन्यात झाडांची छाटणी करावी लागते. चंदनाच्या झाडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Outbreaks of fungal diseases) होतो. तथापि काळजी घेतल्यास मजुरांची गरज भासत नाही, जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.

चंदनशेतीबाबत अधिक माहिती देतांना मुथा म्हणाले, चार वर्षापूर्वी लागवड केली त्यावेळी चंदनाचा गाभा सहा ते आठ हजार रुपये किलो विक्री होत होता. आज त्याचा भाव आठ ते दहा हजार रुपये प्रति किलो आहे. चंदन विक्री (Sandalwood sale) हा खूप संशोधनाचा विषय नसून भारतात चंदन महाविकास संघाची स्थापना झाली आहे. त्यामार्फत मार्केटमध्ये चंदन विक्री करता येते. आज शेतकरी (farmers) आपल्या शेतात पीक लावण्याआधी बाजारभावाचा विचार करतो. बाजारात माल विकला जाईल की नाही याची काळजी करतो. याला बाजारातील अस्थिरता हे मुख्य कारण आहे. शेतीसाठी कुठलेही ठोस निर्णय होत नाही म्हणून शेतकरी आपल्या शेतीत नवीन प्रयोग करायला धजावत नाही.

तथापि चंदनशेती अतिशय फायद्याची आहे. मात्र, नर्सरीवाल्यांच्या भरवशावर किंवा मार्गदर्शनावर चंदन लागवड करू नये. कारण ते आपली रोपे विक्रीसाठी फसवणूक करण्याची अधिक शक्यता असते. त्यासाठी चंदन महाविकास संघाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेणे उचित ठरते. चंदनशेती लांब पल्ल्याची असली तरी शेतकर्‍याला परवडेल, अशीच आहे. प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या बांधांवर चंदनाच्या झाडांची लागवड केली तरी सहज परवडेल. त्यात दोन फायदे आहेत.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाड लावले जाते आणि आपल्याला दोन पैसे देखील मिळतात. त्यासाठी शासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण उत्पन्न लांबपल्ल्याचे असल्याने किमान 15 वर्षे चंदनाचे झाड जपावे लागते. पारंपरिक शेती सोडून व्यावसायिक शेती करताना शासनाचा आधार खूप गरजेचा आहे. महाराष्ट्र शासनाने चंदनाच्या झाडाला विमा संरक्षण दिल्यास चंदनशेतीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकेल, असे मुथा यांनी सांगितले.

महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि कर्नाटक राज्यात उत्तम प्रकारे चंदनाची शेती केली जाते. या राज्यांमध्ये चंदनाच्या शेतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात चंदनशेतीचा प्रचार आणि प्रसार होत नाही. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतल्यास प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या चहूबाजूला चंदनाच्या झाडांची लागवड करू शकतात. किमान दोन एकरात किमान 100 चंदनाची झाडे एक शेतकरी लावू शकतो. चंदनाचा उत्पादन कालावधी मोठा असला तरी एका झाडामधून किमान 13 ते 15 किलो गाभा म्हणजे किस निघतो. आजचा बाजारभाव पहाता एक किलो गाभ्यासाठी दहा हजार रुपये मोजावे लागतात.

म्हणूनच शासनाने सहकार्य केले आणि प्रत्येक शेतकर्‍याने चंदनाची 100 झाडे लावली तर पंधरा वर्षात एका शेतकर्‍याला दीड कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते. बाजारभावातील अस्थिरतेमुळे शेती परवडत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होताना दिसतात. द्राक्षशेती करताना परदेशात द्राक्षे पाठवून सुद्धा खूप काही शिल्लक राहात नव्हते. मजुरांची वाढती टंचाई, विजेचा लपंडाव, शासनाचे आडमुठे धोरण हे शेतकर्‍याला मारक ठरते. निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज झाली आहे. शासन प्रत्येकाला ‘झाडे लावा, देश जगवा’ असा संदेश देत राहते. देश जगवायचा असेल आणि मानवजात आजारमुक्त ठेवायची असेल तर झाडे लावणे ही काळाची गरज आहे.

त्यामुळे इतर झाडे लावण्यापेक्षा चंदनाचे झाड लावून निसर्गाचा समतोल राखला जातो आणि शेतकर्‍याच्या खिशात भरपूर पैसे देखील येतात. त्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने चंदनाची लागवड करावी. चंदनाची वाढती मागणी लक्षात घेता चंदनक्रांती गरजेची आहे. सद्यस्थितीत अनेक कॉस्मेटिक, अत्तर, अगरबत्ती, सुवासिक तेलांसाठी चंदनाची गरज भासते. त्यामुळे शेतकर्‍यांनी भरपूर उत्पन्न देणार्‍या चंदनशेतीचा प्रयोग करावा आणि शासनाने देखील या प्रयोगास भरभरून प्रोत्साहन द्यावे, असे मुथा यांनी सुचविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या