रुग्णवाहिकेच्या सायरनवर रुग्णाच्या आयुष्याची दोरी

रुग्णवाहिकेच्या सायरनवर रुग्णाच्या आयुष्याची दोरी

नाशिक | राजेंद्र पवार | Nashik

रस्त्यावर रुग्णवाहिकेचा सायरनचा (Ambulance siren) आवाज ऐकल्याबरोबर लोक आपले वाहन बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला (Ambulance) जागा करून देतात. त्याला कारणही तसेच असते, एखादा पेशंट (patient) हा जीवन मरणाच्या दारात उभा असतो. तो क्षण हे त्याच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण असतात.

म्हणून त्याला गोल्डन अवर्स (Golden Hours) (सोनेरी घटका )असे म्हटले जाते. त्या रुग्णाला आपत्कालीन सेवा लवकरात लवकर मिळावी, या उद्देशानेच रुग्णवाहिकेची निर्मिती झाली आहे. प्रत्येकाचा जीवनप्रवास हा जन्मापासून मरणाकडे सुरू असतो. मात्र, त्या रुग्णाचा प्रवास त्या काळात उलट असतो. त्याचा प्रवास हा मरणाकडून जगण्याकडे असतो. म्हणून रुग्णवाहिकेवर 'अ‍ॅम्ब्यूलन्स' हे नाव उलटे लिहिलेले दिसून येते.

बर्‍याच वेळा रुग्णाला आकस्मित मोठ्या शस्त्रक्रिया (Surgery) कराव्या लागतात व त्याची सुविधा त्या दवाखान्यात नसल्यामुळे अशावेळी देखील त्याला इतरत्र दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी हलवावे लागते. अशावेळी ती रुग्णवाहिका (Ambulance) व तो चालक आपल्याला देवदूतासारखे वाटतात. रस्त्यातून बाजूला वाहन घेणारे माणुसकीचे दर्शन घडवणारे दिसतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र बर्‍याच वेळा रुग्णवाहिकेतून रुग्ण हा सामान्य असतो. फक्त काही चाचण्या त्या रुग्णालयात नसल्यामुळे, सुविधा नसल्यामुळे त्याला दुसरीकडे त्या रुग्णवाहिकेतून नेले जाते.

अशा वेळेस देखील रुग्णवाहिकेचा चालक हा सायरन (Siren) वाजवत जोराने गाडी चालवताना दिसतो. तर काही वेळा चक्क त्या रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना देखील गर्दीच्या ठिकाणी सायरन वाजवून आपल्या वाहनाला वाट मोकळी करतानाही दिसून येतात. सहज त्या रुग्णवाहिकेत डोकावल्यावर असे चित्र दिसून येते. त्यावेळी मात्र लोकांमध्ये रागाचे वातावरण निर्माण होते.

साहजिकच एखाद्या वेळी मागील अनुभवावरून रुग्णवाहिकेस (Ambulance) जागा देण्यास नकळत उशीर होऊ शकतो. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकांना नम्र आवाहन करावेसे वाटते की, आपणास लोक देवदूत मानतात, त्याचा अनादर करू नका व रुग्णवाहिकेचे व आपले महत्त्व जनसामान्यात कमी करू नका. अर्थात सर्वच चालक अशी कृत्य करतात असे नाही.

पण जे अनावधानाने करतात त्यांनी सामाजिक भान ठेवून आपले पवित्र काम करावे. ज्या रुग्णांना घेऊन आपण आपल्या जीवाची पर्वा न करता तो प्रवास करतात, ती सेवा देतात त्याला सलामच आहे. परंतु काही चालकांच्या चुकीमुळे रुग्णवाहिकेचे रहदारीच्या दृष्टीने महत्त्व कमी होऊ देऊ नका. हीच सर्वांचा अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com