Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedग्रामविकासाचा नवा अध्याय

ग्रामविकासाचा नवा अध्याय

अरुण देशपांडे – जलतज्ञ

करोनाच्या संकटकाळात असंख्य मजूर, नोकरदारांनी गावचा रस्ता धरला. लाखोंचे लोंढे गावाकडे परतले. लॉकडाऊननंतर काहीजण पुन्हा शहरात गेले तरी ‘गड्या आपला गाव बरा’ ही धारणा वाढीस लागली. या पार्श्वभूमीवर येत्या काळात पर्यावरणाशी, शेतीशी संबंधित ‘ग्रीन कॉलर जॉब्ज’ संकल्पना अस्तित्त्वात येतील. ‘हरित प्रौद्योगिकी’, ‘हरित उद्योजकता’ या संकल्पनांवर भर दिल्याने ग्रामविकासाचे स्वप्न पूर्णत्वास जाईल, असा विश्वास वाटतो.

- Advertisement -

देशात करोनाचा फैलाव वाढू लागला आणि त्यासाठी उपाययोजना करतानाच दुष्परिणामही समोर आले. उदाहरण द्यायचे तर करोनाची साखळी तोडण्यासाठी दीर्घकाळ लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु याचा विविध क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला. छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांना नोकर्‍यांना मुकावे लागले. श्रमिक, मजूर यांच्या तर उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण झाला.

या परिस्थितीत स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर आपल्या गावाकडे परतू लागले. यामुळे स्थलांतरितांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले. शहरात उपाशी मरण्यापेक्षा गावाकडे पडेल ते काम करून आपल्या माणसात सुखाने राहू, या विचारातून मजुरांनी आपल्या घराची वाट धरली. ‘गड्या आपला गावच बरा’ हाही विचार या निमित्ताने दृढ झाला. अर्थात, लॉकडाऊन संपल्यावर, उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यावर गावी गेलेले मजूर पुन्हा शहरात आले.

मात्र, त्यांची संख्या मर्यादित राहिली. दरम्यान, या सार्‍या घडामोडीत महानगरात सुरू असलेल्या कामांपासून अनेक कामे ग्रामीण भागातल्या आपल्या घरात बसून करणे शक्य आहे, याची जाणीव मोठ्या उद्योगांमधल्या सेवकांही झाली. याचे कारण मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपल्या लाखो सेवकांसाठी पुणे, मुुंबई, बंगरूळू, हैद्राबाद सोडून जायची तयारी करायला सांगितले.

अशा स्थितीत या कंपन्या, कार्यालये, शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे तसेच इतर असंख्य ज्ञानव्यवसाय, सेवा-उद्योग आपला राबता महानगरांमधून हलवून शेतांवरील आधुनिक वसाहतीमध्ये विखरून वसवण्याचा विचार होऊ शकतो. ही एका नव्या बदलाची नांदी म्हणावी लागेल.

या पार्श्वभूमीवर येत्या काळात भविष्यकालीन जगाला आवश्यक असणारी जागतिक पातळीवरील पर्यावरणाशी, शेतीशी संबंधित ‘ग्रीन कॉलर जॉब्ज’ ही संकल्पना अस्तित्त्वात येण्याची चिन्हे आहेत. त्याच प्रमाणे ‘हरित प्रौद्योगिकी’ आणि ‘हरित उद्योजकता’ या संकल्पना आत्मसात केल्या जातील. इथे आणखी एका बदलाची आवर्जून नोंद घ्यावी लागेल. ती म्हणजे आजवर ग्रामीण भागातल्या तरुणींना पुणे-मुंबईसारख्या शहरांचे मोठे आकर्षण वाटत राहिले आहे. त्यामुळे होणारा पती याच शहरांमधील असावा, असा त्यांचा आग्रह असे.

परंतु करोनाच्या संकटानेे हे चित्र बदलले आहे. सहचर आपल्या पंचक्रोशीतला, शेतीवाडीवाला हवा, अशी मते व्यक्त होत आहेत. इतके दिवस ग्रामीण भागातील तरुणांना, विशेषत: शेती करणार्‍या तरुणांचे विवाह होणे कठीण झाले होते. करोनामुळे हे चित्र बदलत असून त्यातून ग्रामीण भागातील विवाहेच्छूक तरुणांना दिलासा मिळाला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील मोठी लोकसंख्या पुन्हा आपल्या गावाकडे आल्यास त्यांच्या उद्योग-व्यवसायाचे काय, पायाभूत सुविधांचे काय आणि मुख्यत्वे पुरेशा प्रमाणात पाण्याच्या उपलब्धतेचे काय, असे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. खरे तर आपण जलसंपत्ती म्हणजे काय, तिची उपलब्धता किती, तिचा वापर कसा करावा, याकडे आजवर पुरेशा गांभीर्याने पाहिलेले नाही.

वास्तविक, प्रत्येक भागाचे एक पाणलोट क्षेत्र असते. हे क्षेत्र साधारणतः 20 हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेले असते. त्यानुसार या क्षेत्रात पाण्याची नेमकी उपलब्धता किती, याचा विचार व्हायला हवा. अलीकडच्या काळात आपल्या देशात शेतीच्या मोठ्या प्रमाणावर वाटण्या झाल्या. त्यामुळे शेती विखुरली गेली. ही बाबही पाणलोट विकासावर परिणाम करणारी ठरली. परंतु आजवर हा मुद्दा लक्षात घेण्यात आला नाही.

उदाहरण द्यायचे तर पूर्वी 40 हेक्टर शेती क्षेत्रामध्ये तीन विहिरी होत्या. नंतर या शेतीचे वाटणीमुळे तुकडे पडले. त्या त्या तुकड्यात स्वतंत्ररित्या विहिरी खोदण्यात आल्या. परिणामी, विहिरींची संख्या वाढत गेली. त्याचप्रमाणे अनेक बोअरवेल्सही घेण्यात आले. परिणामी, या विहिरी आणि बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होऊ लागला.

मात्र, या काळात पडणार्‍या पावसाचे प्रमाण तेवढेच राहिले. त्यामुळे भूगर्भात पाणी मुरणे कमी झाले, त्याच वेळी पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे भूगर्भातली पाणीपातळी खोल गेली. दुष्काळाची तीव्रताही वाढत राहिली. या परिस्थितीत ‘वॉटर मॅनेजमेंट’ हा सामाजिक, राजकीय तसेच कौटुंबिक प्रश्न बनला आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे पाणी खेड्यातून शहराकडे जात आहे. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे जा’ असे सांगितले होते. परंतु त्याउलट वाटचाल सुरू आहे. इथे एखाद्या गावात, पाणलोट क्षेत्रात पाणी कुठून येते, हे लक्षात घ्यायला हवे. पाणलोट क्षेत्रात हवेतले बाष्प, आकाशातून येणारे पाणी याला ‘ग्रीन वॉटर’ म्हणतात. अशा रितीने दरवर्षी दहा लाख टँकर्सना लागेल इतके पाणी आम्ही आमच्या जल उपक्रमात दोन हजार हेक्टरमध्ये जमा करतो.

विशेष म्हणजे एक हजार हेक्टरवर एक मिलिमीटर पाऊस पडला तर त्याचे पाणी एका टँकरमधील पाण्याइतके होते. आमचे क्षेत्र दोन हजार हेक्टर इतके आहे. त्यावर एक मिलिमीटर पाऊस पडला तर दोन हजार टँकर इतके पाणी होते. या पाण्याचा नीट वापर करता आला नाही, ते साठवता आले नाही तर त्यासारखे दुर्दैव नाही.

या शिवाय हवेतले दव, बाष्प यापासून तयार होणारे पाणी वेगळे असते. आमच्याकडे उजनी धरणाचे पाणी कालव्यामधून येते. ते दरवर्षी दीड कोटी घनमीटर इतक्या प्रमाणात येते. याला ‘ग्ल्यू वॉटर’ म्हणजे साठवणीचे पाणी म्हणतात. याशिवाय पाण्याचे ‘ग्रे वॉटर’ आणि ‘ब्लॅक वॉटर’ असेही प्रकार आहेत. शहरांमधल्या गटारांचे, मैला शुद्धीकरण केंद्रातून बाहेर येणारे पाणी धरणाच्या पाण्यात मिसळल्यास त्या भागातल्या पाण्याचा रंग हिरवा होतो. अशा पाण्याला ‘ग्रे वॉटर’ म्हणतात. हे पाणी मानवी आरोग्यासाठी हानीकारक असते.

शेती मुख्यत्वे पाण्यावर अवलंबून असते. शेतीतून एक रुपया मिळवण्यासाठी एक घनमीटर पाण्याचा वापर केला जातो. साहजिक शेतकर्‍याला एक लाख रुपये मिळवायचे तर एक लाख घनमीटर पाणी लागणार हे उघड आहे. हे प्रमाण लक्षात घेता आमच्या सर्व शेतकर्‍यांना चार कोटी घनमीटर इतके पाणी लागते.

त्या दृष्टीने उपलब्ध होणारे पावसाचे वा कॅनॉलने येणारे पाणी लक्षात घेतले तर दरवर्षी दीड कोटी घनमीटर इतकी तूट आहे. ती वॉटर ऑडिटमध्ये दिसून येते. आता ही तूट भरून काढण्यासाठी जमिनीला भोकं पाडली जातात; म्हणजे कूपनलिका घेतल्या जातात. पण त्याद्वारे जमिनीत खोलावरून पाणी काढून शेती करणे म्हणजे उंच इमारतीच्या गच्चीवर शेती करण्यासारखे आहे.

अशा रितीने मिळालेल्या पाण्यावर उत्पादित केलेला शेतमाल शहराकडे जातो. साहजिक या शेतमालासाठी लागलेले पाणीही शहराकडे जात आहे. त्या दृष्टीने प्रत्येक उत्पादनासाठी लागलेले पाणी, सेवेसाठी लागलेले पाणी असे मोजमाप व्हायला हवे. त्या दृष्टीने ‘व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर एक्सपोर्ट’ समजून घ्यायला हवे. उदाहरण द्यायचे तर बांधकामांसाठी विटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

शहरात तर सातत्याने मोठमोठी बांधकामे सुरू असतात. त्यासाठी किती विटांची आवश्यकता भासत असेल याची कल्पनाच केलेली बरी.यात ग्रामीण भागात तयार केलेली एक वीट शहरात जाते तेव्हा किती जलधारक शक्ती वाया जाते, हे ही लक्षात घ्यायला हवे.त्या एका विटेसाठी लागणार्‍या मातीची पावसाळ्यात 20 लिटर पाणी धारण करण्याची क्षमता असते.

शिवाय ही माती किती झाडांना पाणी, आधार देऊ शकते, हा ही विचारात घेण्याजोगा भाग आहे. शिवाय आजकाल कुठलेही बांधकाम वाळूशिवाय होत नाही. ही काही उदाहरणे आहेत. अशा अनेक गोष्टींमधील सारे पाणी वाचवता किंवा नियंत्रित करता आले तर ग्रामीण भाग ‘सुजलाम् सुफलाम्’ होऊ शकतो.

या परिस्थितीत आता करोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व जग बदलून गेले. लोकांची घरवापसी झाली. यातले काही पुन्हा परत जातील. पण आम्ही गांधीजींच्या वाटेने गेलो असतो तर ही वेळ आली नसती.

हे वेळीच ओळखून काही वर्षांपूर्वी आम्ही पाणलोट क्षेत्रात स्वावलंबी शेतीला सुरुवात केली. इथे पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब झेलला जातो आणि ते पाणी जमिनीत मुरवले जाते. आम्ही वनशेतीचीही संकल्पना राबवली. या ठिकाणी जमिनीच्या खाली मुळांचे जाळे तयार झाले. थोडक्यात, मुळांचा स्पंज तयार झाला. आमच्या अंकोलीत विहिरी कायम पाण्याने भरलेल्या असतात. भर उन्हाळ्यातही आम्ही विहिरींमध्ये मनसोक्त डुंबू शकतो. हे चित्र व्यापक प्रमाणावर निर्माण करणे सहज शक्य आहे.

हे लक्षात घेऊन शहरात गेलेल्या तरुणांनी गावातल्या शेताकडे परत यावे. किमान अर्ध्या एकराच्या बागा कराव्यात. पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला, सुपीक माती मिळाली, दोनशे टँकर पाणी वर्षभर वापरायला मिळाले तर उच्च जीवनमान जगता येते, हे आम्ही दाखवून दिले आहे. मुख्यत्वे शहरातून सर्व माणसे पुन्हा गावाकडे आली तरी त्यांना सामावून घेत येईल, असा विश्वास आहे.

या लोकांना किती पाणी लागेल याचेही गणित मांडले आहे. नद्यांमध्ये असणार्‍या गाळापैकी दोन टक्के गाळ जमिनीवर पसरायला मिळाला तरीदेखील त्याची प्रत सुधारता येईल. सद्यस्थितीत शहरे आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत, हे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामीणीकरण हा एकमेव मार्ग उरला आहे.

त्यासाठी शेतीवर या, ग्रीन कॉलर जॉब्ज करा, असे आवाहन केले जायला हवे. किंबहुना, तसा आग्रह धरला जायला हवा. तरुणांनी पदवीनंतर तीन वर्षे ग्रीन आर्मीमध्ये काढावी आणि खेडेगावाकडे जावे, असेही प्रयत्न करता येतील.

महत्त्वाचे म्हणजे ‘तुमचे विकासाचे मॉडेल चुकलेय’, असे निसर्ग सांगतोय. त्याकडे वेळीच लक्ष देऊन पर्यावरणीय संकटाबाबत विचार करायला हवा. लॉकडाऊन काळात हवा, पाणी स्वच्छ झाली, हा ही भाग महत्त्वाचा आहे. अशा रितीने विकास, जगण्याची लढाई या सार्यांचा पुनर्विचार मुळापासून बदलून बघावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या