शिरस्त्राण मोहिमेचा नवा अध्याय

शिरस्त्राण मोहिमेचा नवा अध्याय
बिरबल/birbal

नाशिक | Nashik | बिरबल | वैभव कातकाडे

नगरात जनतेने प्रधानाची शिरस्त्राण (helmet) मोहीम स्वीकारली. नगरातील कोणीही आपल्या वाहनाला खतपाणी पुरविण्यासाठी शिरस्त्राणाचा वापर करू लागली. शिरस्त्राण नसेल तर त्याचे समुपदेशन (counseling) करायचे हा देखील फतवा प्रधानाने काढला होता.

अर्थात या फतव्यामुळे अनेकांनी नकारात्मक सूर आळवला पण प्रधानाने आकडेवारीच अशी दिली कि सर्वांचीच बोलती बंद केली. समुपदेशनाच्या फतव्यामुळे नागरिकांना तब्बल दोन घटका अभ्यास वर्गासाठी बसावे लागत होते. त्यानंतर दोन घटका आम्ही शिरस्त्राण वापरण्याचे फायदे आणि तोटे समजून घेतले आहे. हे आमच्या फायद्यासाठीच आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्रक (certificate) खुद्द प्रधानाच्या मुद्रेनिशी दिले जात असे.

जर पुन्हा शिरस्त्राणपरिधान केल्याशिवाय वाहनाद्वारे (vehicle) प्रवास केला तर दंडात्मक कारवाईला (punitive action) सामोरे जावे लागेल असा सज्जड दम देखील या समुपदेशन प्रसंगी दिला जात असे. नागरिकांना रस्त्यांवर खतपाणी, समुपदेशन यावर समाधानी न राहता आणखी काय करावे याचा विचार सुरु असतानाच प्रधानाने यापूर्वी सल्लागार समिती (Advisory Committee) नेमली होती त्याचा आढावा घेण्याचे ठरवले. या आढाव्यात प्रधानाला वाहनतळ (Parking), एकेरी वाहतूक तसेच वतनदरांची कारवाई या विषयांबाबत सल्लेच एवढे मिळाले की, सल्ल्यामुळे व्यथित झालेल्या प्रधानाने ही समितीच्या बैठकीसाठी पुढील तारीख दिली.

प्रधानाला काहीतरी वेगळे आणि धाटणीचे करण्याचा मानस हा नेहमीच होता. यासाठी कायद्याचा आधार घेणे हे त्याच्या नेहमीच पथ्यावर पडत असायचे. एकदा निर्णय घेतला की माध्यमे, राजकारणी, समाजकारणी या सर्वांना प्रधान आपली बाजू पटवून देण्यात माहीर होता. याच विश्वासाच्या जोरावर नगरात होणार्‍या मोठ्या उत्सवाच्या (festival) पार्श्वभूमीवर एक मोठा फतवा प्रधानाने काढला.

नगरात जेवढी जेवढी छोटी मोठी कार्यालये आहे; तसेच नागरिकांना जेथे जेथे कामे पडतात अशा सर्व ठिकाणी शिरस्त्राण असेल तरच प्रवेश करता येणार. जर नसेल तर नागरिकांनी त्यांची वाहने स्व जबाबदारीवर लावणे. लावलेली वाहने नियमात नसतील तर नियमभंग म्हणून चलन फाडण्याची नामुष्की त्याच्यावर येईल. असा फतवा म्हणजे नागरिकांना शिरस्त्राण वापरण्यासाठी प्रवृत्त करणे. त्यात कायद्याचा बडगा थोडा जरी असला तरी इतर क्लृप्त्या वापरून प्रधानाने नागरिकांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारकच केले.

या आधी देखील, याच नगरात अनेक प्रधानांनी शिरस्त्राण वापरा बाबत उक्ती पासून सक्ती पर्यंत सगळे मार्ग अवलंबले होते. मात्र या नगरचे नागरिक चाणाक्ष होते. एकीकडे या उपाय योजनांचे कौतुक करायचे, दुसर्‍यांच्या प्रबोधनात अग्रेसर असायचे मात्र स्वतःवर शिरस्त्राण वापरण्याची वेळ आली की कारण काढायचे. हे असे काही दिवस चालत नाही तोच, त्या प्रधानाची बदली होयची. आता या प्रधानाने देखील मोहीम हाती घेतली, नागरिकांनी पुन्हा पाढे पंचावन्न न करो म्हणजे झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com