जोखीम वाढविणारा जनुक

जोखीम वाढविणारा जनुक

- प्रा.विजया पंडित

एखाद्या यशस्वी शास्त्रीय संशोधनामुळे जेवढा आनंद होतो, तेवढाच विज्ञानाबद्दलचा उत्साहसुद्धा वाढतो. शास्त्रज्ञांना अशा एका जनुकाचा शोध लागला आहे, जो श्वसनातील अडथळे आणि कोविडमुळे होणार्‍या मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढवितो. शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांना या आजाराचा धोका अधिक आहे. ज्या जनुकाचा शोध लागला आहे, तो फुफ्फुसांच्या संक्रमणानंतरची प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीतच बदल करतो. आतापर्यंत ज्या जनुकांचा शोध लागला आहे, त्यातील हा सर्वाधिक आनुवंशिक जोखीम निर्माण करणारा जनुक आहे.

श्वेत युरोपीय पार्श्वभूमी असलेल्या 15 टक्के लोकांच्या तुलनेत दक्षिण आशियाई मूळ वंशाच्या 60 टक्के लोकांना ही जोखीम अधिक असते. हे नवे संशोधन आंशिक रूपाने भारतीय उपखंडात कोविड-19 चा प्रभाव स्पष्ट करू शकते. दक्षिण आशियात कोविडमुळे अधिक मृत्यू झाले आहेत, असे सांगण्यात येते. परंतु त्यातील अनेक मृत्यूंची नोंद झाली नाही. युरोपीय देशांमध्ये प्रत्येक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे विविध समुदायांच्या आधारावरील कोणतेही अध्ययन तेथे अधिक अचूक निर्णयाप्रत पोहोचू शकते.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॅडक्लिफ डिपार्टमेन्ट ऑफ मेडिसिनमधील अनुवांशिक आणि संशोधनविषयक नियतकालिकाचे वरिष्ठ लेखक प्राध्यापक जेम्स डेविस सांगतात की, कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही लोक गंभीररीत्या आजारी का पडतात, याचे कारण आनुवंशिक घटकांमधून समजू शकते. दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असलेल्या लोकांना हा धोका अधिक आहे. अर्थात या निष्कर्षावर अधिक अध्ययन करण्याची गरज आहे, असे अन्य संशोधकांनी सांगितले आहे.

हे अध्ययन भारतातही केले गेले पाहिजे. सामान्य स्थितीतसुद्धा पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतातील लोक अधिक प्रमाणात आजारी पडतात का? भारतात मामुली आजारांमुळेही मोठे नुकसान होते का? कोविडच्या निमित्ताने या जनुकावर यापुढेही संशोधन होणे गरजेचे आहे, जेणेकरून समस्येचे निराकरण शोधता येईल.

दक्षिण आशियात अशा प्रकारचे संशोधन करणार्‍या संस्थांचा अभाव आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या ताज्या संशोधनातून असे दिसून येते की, दक्षिण आशियाई लोकांच्या शरीरात अशी आणखीही जनुके असू शकतात, जी आजारांचे स्वरूप वाढविण्याचे काम करीत असतील. दक्षिण आशियात आरोग्य सुधारणांसाठी याविषयी संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.

संशोधनात असे आढळून आले आहे की, इंग्लंडमधील दुसर्‍या लाटेदरम्यान बांगलादेशी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसाठी मृत्यूची जोखीम तीन ते चार पट अधिक होती. पाकिस्तानी मूळ वंशाच्या लोकांसाठी ती जोखीम 2.5 ते तीन पट अधिक होती तर भारतीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये हा धोका 1.5 ते दोन पटींपर्यंत अधिक होता. म्हणजेच, हा धोका दक्षिण आशियातील सर्व लोकांसाठी समान स्वरूपाचा नव्हता. दक्षिण आशियातसुद्धा प्रत्येक जाती आणि वंशांचे लोक राहतात.

जगातील सर्वाधिक जैविक विविधता असलेला हा विभाग आहे. एलझेडटीएफएल-1 नावाचा हा जनुक एका महत्त्वपूर्ण आत्मरक्षणात्मक प्रणालीचे कार्य चालू करणार्‍या स्विचप्रमाणे कार्य करताना आढळला आहे. डेविस यांनी सांगितले की, आपण आपली आनुवंशिकता बदलू शकत नाही. परंतु आमचे निष्कर्ष असे सांगतात की, उच्च जोखीम असलेली जनुके असलेल्या लोकांना विशेषत्वाने लसीकरणाचा लाभ होण्याची शक्यता असते. अशा उच्च जोखीम असलेल्या लोकांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने केले पाहिजे, हा या संशोधनाचा सारांश.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com