Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमनालाही उजाळा देणारा सण!

मनालाही उजाळा देणारा सण!

परेश चिटणीस

दीपावली Diwali Festival म्हंटले की सुरुवात होते साफसफाईने. टाकाऊ वस्तू मोडीत काढणे, धूळ झाडून, जाळी जळमटे काढून कोपरा न कोपरा स्वच्छ करणे. या सगळ्याने सुरुवात होऊन मग सर्व घर ऑफिस व्यवस्थित लावणे, सजावट करणे इकडे आपण वळतो.

- Advertisement -

दिवाळी म्हणजे चांगल्या गोष्टींचा वाईटावर मिळवलेला विजय साजरा करण्याचा सण. याच निमित्ताने आपण आपल्या स्वभावातील वाईट सोडून चांगले अंगीकारले पाहिजे. पाश्चात्य देशात जसे न्यू ईयर रिजोल्यूशन करतात तसे आपण ही प्रण करुयात या दिवाळीत वाईट सोडून चांगले स्वीकारण्याचा.

जुन्या सवयी सोडून नवीन उपयोगी सवयी लावून घेणे अशी पण दिवाळीची तयारी आपण करायला हवी. उटणे लावून शरीर स्वच्छ व तजेलदार करतानाच स्वतःला मानसिक उजाळा ही दिला पाहिजे. मग या सगळ्याची सुरुवात कुठून व कशी करणार?

तुम्हाला मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी जायचे आहे. तुम्ही सांगितलेला पत्ता घेऊन घर शोधत आहात, पण काही केल्या घर न सापडल्याने तुम्ही त्यांना फोन करतात. काय असतो त्यांचा पहिला प्रश्न? तू आत्ता कुठे आहेस? आपल्या स्वतःच्या प्रगतीबद्दल ही असच काही आहे. पर्सनल डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण कुठे आहोत हे आधी लक्षात घेतले पाहिजे. आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करणे योग्य आहे. इतरांशी तुलना न करता आपण आपल्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे.

आपण इतरांपेक्षा जास्त प्रगत असलो म्हणून भारावून जायला नको. आपल्या क्षमतेच्या तुलनेत आपण किती प्रगती केली आहे, हे पहाणे महत्त्वाचे आहे. तुमची क्षमता मोठ्या ग्लास एवढी असेल आणि दुसर्‍या व्यक्तिची क्षमता छोट्या ग्लासाएवढी असेल आणि या ग्लासांमधील पाणी म्हणजे तुम्ही व त्यांनी केलेली प्रगती असेल तर तुमची प्रगती दुसर्‍यांपेक्षा जास्त वाटते, पण तुमच्या स्वतः च्या क्षमतेच्या तुलनेत ती प्रगती कमी असू शकते. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यात काही अर्थ नाही. आपण आपली क्षमता किती आहे आणि त्या तुलनेत किती साध्य करतोय हेच सतत बघत प्रगती केली पाहिजे.

आपण दोन प्रकारच्या डेव्हलपमेंट बद्दल विचार करू शकतो. पहिली डेव्हलपमेंट म्हणजे अगदी खासगी. ज्याचा परिणाम आपल्या स्वतःला त्वरित जाणवतो आणि दूसरी डेव्हलपमेंट म्हणजे जिचा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर व इतरांवर होतो. प्रख्यात लेखक स्टीवन कवी याचे प्राइवेट विक्ट्री आणि पब्लिक विक्ट्री असे वर्गीकरण करतात.

वैयक्तिक पातळीवरील प्रगती ही नेहमी जास्त महत्त्वाची आहे. इतरांना दिलेला शब्द पाळणे या पेक्षाही स्वतःला दिलेला शब्द पाळणे महत्त्वाचे आहे. इतरांना प्रभावित आणि आनंदित ठेवण्याआधी आपण स्वतःला आनंदित करणे महत्त्वाचे आहे. नेतृत्वगुण हा एक महत्त्वाचा स्वभाव गुण आहे. इतरांचे नेतृत्व करण्यापूर्वी स्वतःचे नेतृत्व करणे महत्त्वाचे आहे.

स्वतःला दिलेला शब्द पाळल्याने आपोआपच आत्मविश्वास वाढतो. आपल्या आयुष्यात आपल्याला काय महत्त्वाचे आहे हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की सर्वात महत्त्वाची कामे महत्त्वाची ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे काम आहे.

आपण दिवसभरात करायचे ठरवलेल्या कामांपैकी कोणती कामे आपल्या दीर्घकालीन प्रगतीसाठी महत्त्वाची आहेत ते समजून त्यांना नेहमी प्राधान्य दिल्याने आयुष्यात प्रगती येते. वेळेचे नियोजन हा आयुष्य सुरळीत करण्याचा मार्ग आहे. प्राधान्य कश्याला द्यावे आणि कश्याला नाही हे ठरवून त्याप्रमाणे काम करत रहाणे पर्सनल डेव्हलपमेंट साठी उपायुक्त आहे.

संभाषण कौशल्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सहानुभूतीपूर्वक ऐकणे. समजून घेणे हे समजावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे कौशल्य आहे. याचे वर्ग कुठे घेतले जात नाहीत. आपण बरेचदा दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घेत असतो कारण आपल्याला त्यांचे बोलून झाले की आपले म्हणणे मांडायचे असते. आपण दुसर्‍याच्या म्हणण्याला दुजोरा देतो कारण आपण दुसर्‍यांकडून आपल्या मताला मान्यता मिळावी ही अपेक्षा करत असतो. आपल्याला बोलणारा काय सांगू पाहतोय हे समजणे एक आवश्यक व दुर्मीळ संभाषण कौशल्य आहे.

आत्मविश्वास म्हणजे सभाधीटपणा हा एक प्रचालित गैरसमज आहे. चार लोकांसमोर बोलता येणे हे सगळ्यांसाठी आवश्यक नाही. आपला आत्मविश्वास यावर किती अवलंबून असावा हे आपण ठरवायला हवे. भावनिक बुद्धिमत्ता हा सध्या गाजलेला विषय आहे. स्वतःच्या भावना समजणे व इतरांच्या भावना समजणे हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे. आपल्या भावना समजण्याचे व नियंत्रित करण्याचे कौशल्य शिकता येऊ शकते. तसेच सरावाने इतरांच्या भावना समजून त्यांचा योग्य उपयोग करता येणे ही पुढची पायरी झाली.

पर्सनल डेव्हलपमेंटचे फायदे लगेच दिसत नसल्याने निराशा येऊ शकते त्यामुळे सतत प्रगतीसाठी प्रोत्साहन व शिस्त दोन्ही महत्त्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या