Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदिवाळीचे सावध पूर्वरंग

दिवाळीचे सावध पूर्वरंग

– स्वाती पेशवे

दिवाळीची रंगीत तालीम म्हणून दसर्‍याच्या सुमारासचा अंदाज घेतला तर लवकरच अर्थचक्रालाही गती मिळण्याची आशा वाटते.

- Advertisement -

दसर्‍याच्या निमित्ताने बाजार बहरलेला दिसला. रामाने रावणावर विजय मिळवल्याच्या जल्लोशात यंदा आपण कोरोनारुपी भीतीवर मिळवलेल्या विजयाचा रंगही बराच गडद होता. दुकांनांमध्ये विक्रीसज्ज सामानाची आणि इच्छुक खरेदीदारांची गर्दी दिसली. हे सगळे शुभसंकेतच म्हणायला हवेत.

गेल्या सात-आठ महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा घट्ट विळखा थोडाफार सैलावणं ही अतिशय सुखद

आणि आश्वासक बाब अनुभवत असताना मरगळ झटकून कार्यरत होणं स्वाभाविक आहे. गेले काही महिने नियतीने आपल्याबरोबर एक क्रूर खेळ मांडला होता. जीवनसंगीतातली लय हरपवून टाकणारा हा, संगीत नव्हे तर विसंगत खुर्चीचा खेळ होता. संगीत खुर्चीच्या खेळात तरी खेळाडूंच्या तुलनेत एकच खुर्ची कमी असते. त्यामुळे एका डावात एकच खेळाडू बाद होतो. मात्र नियतीच्या विसंगत खेळाने इतकं औदार्यही दाखवलं नाही.

खो खो मध्ये बाद होण्याच्या भीतीने एखाद्या खेळाडूने अधे-मधेे, तिरकी अशी कशीही धाव घ्यावी पण अखेर बाद करणार्‍या हाताने स्पर्श करुन त्याला स्पर्धेतून बाहेर काढावं तसंच काहीसं आत्तापर्यंत सुरू होतं. भरमसाठ रुग्णसंख्या आणि अत्यंत तोकडी व्यवस्था अशी विसंगती असताना जगण्याची गतीच हरवली आणि दिवसागणीक वाढत्या रुग्णसंख्येने भयाचं आवरण विस्तारत गेलं. एक विचित्र स्मशानशांतता, खिन्न करणारी स्तब्धता, सगळं काही जागच्या जागी थिजवून ठेवणारी व्याकूळता… मात्र आता परिस्थिती सावरते आहे.

हळूहळू का होईना, कोरोनास्थितीचा अंदाज येऊन उपचारार्थ सज्ज झालेली आरोग्य व्यवस्था, जम्बो रुग्णालयांमध्ये हळूहळू होणारी सुधारणा आणि आरोग्यरक्षक, पोलीस आणि प्रशासनाचे निकराचे प्रयत्न यामुळे आता एका दुष्टचक्रातून आपण बाहेर पडत आहोत. धोका असला तरी तो टाळून, प्रसंगी वळसा घालून पुढे जात आहोत. सणांचं संयत पण उत्साही साजरीकरण करत आनंदाला वाट मोकळी करुन देत आहोत. अर्थातच या सकारात्मक परिस्थिती आणि मनोवृत्तीचे साद जगण्याशी संबंधीत सर्व कोपर्‍यांवर धडकत आहेत. त्यामुळेच दिवाळीच्या आगामी उत्सवपर्वात प्रकाशाच्या पालख्या नाचतील, अशी आशा करायला हरकत नाही.

दिवाळीची रंगीत तालीम म्हणून दसर्‍याच्या सुमारासचा अंदाज घेतला तर लवकरच अर्थचक्रालाही गती मिळेल, अशी आशा वाटते. कारण दसर्‍याच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाजार बहरलेला दिसला. क्रयशक्तीचा जोर वाढताना दिसला. रामाने रावणावर विजय मिळवल्याच्या जल्लोशात यंदा आपण कोरोनारुपी भीतीवर मिळवलेल्या विजयाचा रंगही बराच गडद होता. बर्‍याच महिन्यांच्या खंडानंतर उघडलेल्या दुकानांमध्ये विक्रीसज्ज सामानाची आणि इच्छुक खरेदीदारांची गर्दी दिसली. हे सगळे शुभसंकेतच म्हणायला हवेत. कारण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीपुरती मर्यादित असणारी क्रयशक्ती विस्तारणं हे ग्राहक जीवनोन्मुख झाल्याचं द्योतक आहे. जगण्यासाठी माणसाला खूप चीजवस्तूंची आवश्यकता नसते, हे कोरोनाकाळाने दाखवून दिलं असलं तरी आजच्या जागतिकीकरणाच्या वातावरणाला ही संकुचित मनोवृत्ती पोषक नाही. म्हणूनच सरकारनेही ग्राहकांच्या क्रयशक्तीला आर्थिक लाभाचं इंजिन जोडलेलं दिसलं. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना लवकरच मिळणारा बोनस, एल.टी.सीचे एक लाख करोड रुपये देऊन दिलेला सुखद धक्का, कोरोनाकाळातही नियमित हफ्ते भरणार्‍यांना बँकांनी जाहीर केलेली कॅशबॅक योजना आदींचा यात समावेश होऊ शकेल. खेरीज कोरोनाकाळात खासगी कंपन्यांवर आपल्या कर्मचार्‍यांना नियमित वेतन देण्याची सक्ती होती. त्यामुळे हा वर्गही गेल्या अनेक महिन्यांचा खरेदीचा उपवास संपवून पारणं साजरं करण्याच्या मनस्थितीत असेल तर नवल नाही.

कोरोनाचं दाट सावट असताना शेअर बाजारही मलूल होता. सहाजिकच सोन्याचे दर वधारले होते. पण आता बाजारही सावरत असून चढा निर्देशांक तरतरी दाखवत असताना सोन्याचे दर काहीसे उतरले आहेत.

त्यामुळेच आत्तापर्यंत केवळ गुंतवणूक म्हणून सोनेखरेदीकडे वळणार्‍या ग्राहकांच्या बरोबरीने सण आणि आगामी लग्नसराईच्या निमित्ताने सोनेखरेदी करणार्‍या तसंच तयार दागिन्यांची खरेदी करणारा ग्राहकवर्गही वाढला आहे. हीच बाब तयार कपडे बाजारात दिसून येत आहे. त्याचबरोबर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्याच्या नियमामुळे लग्नखर्चात झालेली बचतही बाजाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

उत्सवकाळात आपल्या बरोबरीने जवळच्या लोकांसाठी तसंच व्यावसायिक संबंध जपण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. त्यामुळेच नूतन वर्षाच्या पूर्वकाळात पुढील आडाखे बांधून होणार्‍या खरेदीचा वाटाही मोठा असतो. त्या दृष्टीनेही आता ग्राहकांची पावलं बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. खरं तर दसर्‍याच्या निमित्तानेच हे सीमोल्लंघन दिसून आलं. सायकल, चारचाकी तसंच दुचाकी गाड्यांच्या बाजारात दिसणारी वर्दळ दिवाळीत आणखी वाढेल, हे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे अंदाज प्रमाण मानले तर आगामी काळ बाजार फुलवणारा असेल असं म्हणायला हरकत नाही.

गृहखरेदी हादेखील क्रयशक्तीला जोरदार ऊर्जा देणारा भाग आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातली तेजी अनेकार्थाने वाढत्या उलाढालीस प्रेरक ठरते.

आता या बाजारातही चैतन्य परतलेलं असून जागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढत आहेत. कोरोनाकाळात नोकरी गमावण्याच्या भीतीने अनेकांनी घरगुती स्वरुपात काही ना काही व्यवसाय सुरू केले. केटरिंग, टेलरिंग, पॅकेजिंग, कलावर्ग, स्तोत्रपठण वर्ग, भाजीविक्री, बेकिंग आदी नवजात व्यवसाय येत्या काळात बाळसं धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने आपापला व्यवसाय वाढवण्यासाठी माणसं एक पाऊल पुढे टाकण्याची दाट शक्यता आहे.

सहाजिकच त्यामुळे रोजगारनिर्मिती आणि भाड्याने जागा खरेदी-विक्रीच्या व्यवसायास चालना या बाबी साध्य होतील. मधल्या काळात आपापल्या भागात परतलेल्या परप्रांतियांची जागा घेऊन सुरू झालेले व्यवसायही हातपाय पसरण्यासाठी जागेची सोय करतील.

त्यामुळेच ‘न्यू नॉर्मल’च्या दिशेने पुढे सरकताना त्यांच्याकडूनही अर्थचक्राला जोर मिळण्याची आशा धरणं चुकीचं ठरणार नाही.

दिवाळीपूर्वीचे दिवस अत्यंत खडतर होते. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतरची अतिवृष्टी, बराच काळ रेंगाळलेला मान्सून यामुळे गेला काही काळ सर्वांनीच अत्यंत तणावात घालवला. अनेकांनी आपले जीवलग गमावले, अनेकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. होतं नव्हतं ते सगळं गेलं, अशी वैफल्यग्रस्त अवस्था अनेकांनी अनुभवली. पण अशी कितीही संकटं आली तरी जगणं संपत नसतं. आयुर्मान मर्यादित असतं पण जीवनप्रवाह अथांग असतो, अमर्याद असतो. मानववंशाचा इतिहास पाहिला तर यापूर्वी अशी अनेक भयावह संकटं येऊन गेली आहेत आणि ती पचवून माणसाने मार्गक्रमणा केली आहे. त्यामुळेच आता गळाठून गेलेलं जगणं सावरण्यासाठी ‘एकमेका साह्य करु’चा मंत्र प्रत्येकाला जपावा लागणार आहे. अर्थातच सुरूवातीला सगळे उद्योग पूर्ण जोमाने सुरू होतील, असं नाही. सुरूवात जपून, अंदाज घेऊन, तोल सावरुनच होईल पण लवकरच एका लयीत सगळ्यांची पावलं पडू लागतील.

यंदा अतिवृष्टीने बळिराजाचं अपरिमित नुकसान केलं. दुष्काळी भागातही पाणतळी काठोकाठ भरली. सगळी धरणं भरुन वाहिली. उभं पीक पाण्यात भिजलं. त्यामुळे पुढचा काळ धान्य, फळं-भाज्या आणि इतर शेतमालाचे भाव चढे राहणं स्वाभाविक आहे. पण चांगल्या पावसामुळे जमिनीतल्या पाण्याचा उंचावलेला स्तर येत्या रब्बी हंगामाला पोषक ठरेल. विशेषत: दुष्काळी भागाला झालेला हा मुबलक पाणस्पर्श पुढचे काही हंगाम अंकुरणारा ठरेल. त्यामुळे नुकसान झालं असलं तरी शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई आणि आगामी आश्वासक हंगामाच्या बळावर शेतकरी वर्ग नव्या जोमानं कामाला लागेल. हीदेखील अर्थचक्राला गती देऊ करणारी बाबच असेल.

अर्थात असं सगळं असलं तरी ग्राहकांचे प्राधान्यक्रम बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोरोनाचा भयप्रद संहार अनुभवल्यानंतर आता ऋण काढून सण साजरा करण्याची भारतीय समाजाची मानसिकता बदलण्याची दाट शक्यता आहे.

खेरीज भविष्याचा वेध घेऊन सावध राहणंही गरजेचं आहे. आता सगळ्यांनाच आरोग्यरक्षणाचं महत्त्व समजलं आहे. त्यामुळे चैनीच्या वस्तूंपेक्षा फिटनेस वाढवणार्‍या, घर आणि आवाराच्या स्वच्छतेच्या कामी येणार्‍या वस्तूंना अधिक मागणी असणं स्वाभाविक आहे. दोन वस्तू कमी घेऊ पण आधी आरोग्य विमा घेऊ, असा विचार करणार्‍या डोक्यांची संख्याही वाढती असणार आहे. प

ण हे सगळं असलं तरी गरजेच्या वस्तूंच्या खरेदीवर याचा परिणाम होण्याची शक्यता अगदी धूसर आहे. मुख्य म्हणजे चीनबरोबरच्या तणावग्रस्त स्थितीमुळे स्वस्त आणि मस्त चीनी वस्तूंकडे ग्राहक पाठ फिरवतील आणि आकाश कंदिलापासून विजेच्या माळांपर्यंत आणि मोबाईलपासून टीव्ही-फ्रीजपर्यंच्या भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देतील. ही बाबही आत्मनिर्भर भारतासाठी आणि भारतीयांसाठी जमेची ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या