- श्रीकांत देवळ

कोरोनाचा विळखा सुटलेला नसतानाच एका नव्या विषाणूची एन्ट्री झाली आहे. ‘डिसीज-एक्स’ नावाच्या या विषाणूने जर हातपाय पसरायला सुरुवात केली तर जग विनाशाच्या दिशेने वाटचाल करू शकेल.

स्वतःला ‘महाशक्ती’ मानणार्या देशांना कोरोनासमोर गुडघे टेकावे लागल्याने त्यांचे पितळ उघड पडले आहे. अमेरिका, रशियासह सर्व मोठे देश कोरोना नियंत्रित करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. अशातच या नव्या विषाणूचा प्रसार वाढल्यास जगात हाहाकार उडू शकेल.

संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने मोठ्या संकटात टाकले. या संकटातून जग अद्याप सावरू शकलेले नाही, तोच आणखी एका नव्या विषाणूने जगाचा दरवाजा ठोठावला आहे. गेल्या शनिवारी

आफ्रिकेच्या काँगोमध्ये एका महिलेला अजब लक्षणे दिसून आली. हा सामान्य आजार नसून एखाद्या धोकादायक विषाणूमुळे तो झालेला असावा, असा डॉक्टरांचा कयास आहे. लक्षणे दिसू लागल्यावर रुग्ण महिलेला आयसोलेट (इतपांपासून वेगळे) करण्यात आले आणि त्यानंतर इबोलाच्या चाचणीसाठी तिचे नमुने पाठविण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. जगातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू जगात प्रचंड वेगाने पसरू शकतो. आजार अज्ञात असल्यामुळे सध्या त्याला ‘डिसीज-एक्स’ नाव दिले गेले आहे.

कांगोमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जे डॉक्टर या महिलेवर उपचार करीत आहेत ते म्हणतात की, हा काही काल्पनिक आजार नाही. ज्याप्रमाणे कोरोना किंवा इबोला असा घातक विषाणूंच्या बाबतीत कुणाला माहिती आणि विश्वास वाटत नव्हता, त्याचप्रमाणे या नव्या विषाणूवर लोकांचा विश्वास पटकन बसेनासा झाला आहे. तथापि, हा अत्यंत धोकादायक विषाणू असून, तो वेगाने पसरू शकतो. या विषाणूची ओळख पटविण्यासाठी आणि तो समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी पुरावे जमवायला सुरुवात केली असून, या विषाणूपासून दूर राहणे आणि त्याला गांभीर्याने घेण्याची नितांत गरज असल्याचे बजावले आहे.

1976 मध्ये प्रा. टॅम्फन यांनी इबोला विषाणूची ओळख पटविली होती आणि त्या घातक विषाणूपासून जगाला सावध केले होते. आता या नव्या विषाणूविषयी ते संशोधन करीत आहेत. ऐंशीच्या दशकात काँगोमधील यम्बुकु मिशन हॉस्पिटलमध्ये धोकादायक विषाणूचा शोध लागला होता आणि त्याला इबोला असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी त्या रुग्णालयात काम करणार्या 90 टक्के कर्मचार्यांचा आणि अन्य रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे नव्हते. दररोज असंख्य लोकांना प्राणास मुकावे लागत होते. सुमारे वर्षभरानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. त्यापूर्वी आणि त्यानंतरसुद्धा अनेक प्रकारचे विषाणू आले होते; परंतु लवकरच त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. तथापि, 2019 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. लाखो लोकांचे प्राण गेल्यानंतरसुद्धा अजूनही हा विषाणू नियंत्रणात आलेला नाही. उलट वेगळे रूप घेऊन आता तो अधिक आक्रमक झाला आहे.

अशी स्थिती असतानाच जर ‘डिसीज-एक्’च्या विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केली, तर जग विनाशाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. स्वतःला ‘महाशक्ती’ मानणार्या देशांना कोरोनासमोर गुडघे टेकावे लागल्याने त्यांचे पितळ उघड पडले आहे. अमेरिका, रशियासह सर्व मोठे देश कोरोना नियंत्रित करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. मोठ्यात मोठ्या धोकादायक घटनेवर आपण नियंत्रण मिळवू शकतो असा या दोन्ही देशांचा दावा होता. परंतु कोरोनापुढे त्यांची डाळ शिजली नाही. विकसनशील देशांपैकी एकही देश अद्याप लस तयार करू शकलेला नाही. विषाणुरूपातील अज्ञात आणि अदृश्य शत्रूशी लढणे आणि विजय प्राप्त करणे अवघड असून, त्यामुळे अशा विषाणूंना घाबरून, सांभाळून राहायला हवे, हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणू तर निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित, याचाही छडा अद्याप लागू शकलेला नाही.

तीन दिवसांपूर्वी ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या दोन प्रवाशांमध्ये पूर्वीपेक्षाही वेगाने फैलावणारा विषाणू आढळून आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संसर्गाचा प्रसार होऊ शकतो. याखेरीज या घटनेपूर्वी जो दुसरा स्ट्रेन (विषाणूचे रूप) ब्रिटनमध्ये आढळून आला आहे तो आता साउथ-वेस्ट, मिडलँड आणि नॉर्थ इंग्लंडमध्ये पसरला आहे. या कारणामुळे आतापर्यंत चाळीस देशांनी ब्रिटनमधून येणार्या प्रवाशांना आपल्या देशात बंदी घातली आहे. जर विषाणूंमुळे अशा प्रकारची बंदी वारंवार लावावी लागली, तर संपूर्ण जगाचे अर्थकारण मोठ्या वेगाने घसरणीला लागू शकते. आपल्या देशातील वातावरणासंबंधी बोलायचे झाल्यास कोरोनाच्या प्रभावातून आतापर्यंत आपण पूर्णपणे सावरलेलो नाही. राज्य सरकारे आपापल्या स्तरावर या धोकादायक संसर्गापासून लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु व्यापार आणि नोकर्यांची एक साखळी असते.

सर्व व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, गाडीची चारही चाके चालली तरच गाडी सुरळीत चालते. अशा प्रकारे सर्व देश एकमेकांसोबत व्यापार करून आपली गती वाढवीत असतात. त्यातून कोट्यवधी, अब्जावधींचा व्यापार होतो. अशा प्रकारे विषाणूंच्या कारणामुळे बंदी लावावी लागली, तर जगाचे भवितव्य चांगले असणार नाही. निर्बंधांमुळे अस्थिरता वाढीस लागली आहे. मालाची ने-आण करण्यास व्यापारी सहजासहजी राजी नाहीत. पेमेन्ट अडकून पडण्यापासून खाद्यपदार्थांचा पुरवठा खंडित होण्यापर्यंत अनेक अडचणी येत आहेत. थोडक्यात, व्यापाराचा जो प्रवाह अखंडितपणे चालायला हवा, त्यात व्यत्यय येत आहेत.

आफ्रिकेत ज्याप्रमाणे नवीन विषाणू आढळून आला आहे, तसे वेगवेगळे विषाणू जर सातत्याने येत राहिले तर जगात अंधाधुंदी निर्माण झाल्यावाचून राहणार नाही. अशा विषाणूंवर जर नियंत्रण मिळविले नाही तर मानवी जीवनावर अशा प्रकारे प्रहार होत राहतील आणि हळूहळू ते मानवजातीलाच नामशेष करून टाकतील. त्यामुळे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग अशा उपायांव्यतिरिक्त शासन आणि प्रशासनाकडून अन्य सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. तरच तुम्ही-आम्ही सुरक्षित राहू शकू.