झेडपीच्या सत्ता खेळात  ‘व्हिप’ आणणार रंगत
Featured

झेडपीच्या सत्ता खेळात ‘व्हिप’ आणणार रंगत

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ प्रमाणे नगर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांची सत्ता मिळविण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी असून नेत्यांनी सदस्यांच्या ‘भेटी’-‘गाठी’ सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, विद्यमान परिस्थितीत पदाधिकारी, सदस्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला असला तरी तांत्रिकदृष्ट्या ते निवडून आलेल्या पक्षात आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव करताना सर्वांची दमछाक होणार आहे.

जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. या ठिकाणी काँग्रेसचे 23 तर राष्ट्रवादीचे 19 सदस्य असल्याने या ठिकाणी बहूमताचा आकडा दोन्ही पक्षांनी सहज पार केला. त्यावेळी शिवसेनेच्या 7 सदस्यांनी या आघाडीला बिनशर्त पाठींबा दिला होता. मात्र, अडीच वर्षानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलेली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या नातेवाईंकांनी थेट भाजपसह अन्य पक्षात प्रवेश करून त्या पक्षाचे झेंडे हाती घेतलेले आहेत. मात्र, अद्याप जिल्हा परिषद सदस्य हे तांत्रिकदृष्ट्या आपआपल्या पक्षातच आहेत. यामुळे सर्वांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नेहमी प्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यावेळी पक्षाकडून व्हिप (पक्षादेश) बजावल्यानंतर हे पदाधिकारी, सदस्य काय निर्णय घेणार यावर बरेच अवलंबून राहणार आहे.

जिल्हा परिषदेत भाजप आणि पर्यायाने विद्यमान अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील यांना रोखण्यासाठी राज्यातील महाविकासआघाडीचा प्रयोग करण्यासाठी जिल्ह्यातील अन्य पक्षाचे नेते सरसावले आहेत. दुसरीकडे भाजप आणि विखे देखील गप्प नाहीत. विखे यांनी देखील दुसर्‍या पक्षाच्या सदस्यांवर जाळे फेकण्यास सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांचा सत्ता संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे.

असे आहे
विद्यमान बलाबल
काँग्रेस 23 (यात विखे गट 13 आणि थोरात गट 10), राष्ट्रवादी 19, सेना 7, भाजप 14, नेवासा शेतकरी क्रांतिकारी पक्ष 5, महाआघाडी 2, कम्युनिस्ट 1 आणि अपक्ष 2 यांचा समावेश आहे.

प्रतोदांची अडचण
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे प्रतोद कैलास वाकचौरे यांचे नेते पिचड भाजपमध्ये गेलेले आहेत. मात्र, वाकचौरे हे कधीही जाहीरपणे पिचड यांच्या व्यासपिठावर दिसलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आतापर्यंत विखे यांच्यासोबत असणार्‍या काँग्रेसच्या प्रतोद आशा दिघे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. गत अडीच वषार्र्ंत विखेंसोबत सहमतीचे राजकारण करणारे सेनेचे प्रतोद अनिल कराळे यांची अडचण झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com