जिल्हा परिषदेचा शिक्षक हा सर्वोत्कृष्ट माणूस
Featured

जिल्हा परिषदेचा शिक्षक हा सर्वोत्कृष्ट माणूस

Balvant Gaikwad

‘देशदूत’ लाईव्ह गप्पांमध्ये सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यभरातील शासकीय शाळांचा अभ्यास करताना जिल्हा परिषदेचा शिक्षक हा सर्वोत्कृष्ट माणूस असल्याचे मी अनुभवले आहे. हा माणूस परिवर्तन करु शकतो असा विश्वास जेष्ट सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला.

मुल्यवर्धन शिक्षण मेळाव्यानिमित्त मुथा हे बुधवारी जळगावात आले असताना दै. ‘देशदूत’च्या फेसबुक लाईव्ह गप्पांमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमात माजी प्राचार्य प्र.श्रा.चौधरी आशा फाउंडेशनचे गिरीष कुलकर्णी, उद्योजक विनय पारख, प्रविण राठोड, तेजस कावडिया सहभागी झाले होते.

सहभागी मान्यवरांचे संपादक अनिल पाटील, सहाय्यक संपादक जितेंद्र झंवर यांनी स्वागत केले. यावेळी शांतीलाल मुथा यांनी सांगितले की, मुल्यवर्धन हा उपक्रम आम्ही राज्यातील जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 67 हजार शाळांमध्ये आम्ही राबवित आहोत हा देशातला सर्वात मोठा प्रयोग आहे. सर्व समस्यांचे मुळ हे संस्कारात आहे.

देशात घडणार्‍या घटना आपण संवेदनशिल नागरिक म्हणून बघतो. तेव्हा आपली जबाबदारी काय? याचा विचार करुन मी मुल्यवर्धनाचे काम हाती घेतले. लहानपणाचे संस्कार चिरकाल टिकतात. या सार्‍या बाबींचा अभ्यास मी सुरु केला तेव्हा लक्षात आले भारतात एकूण 14 लाख शाळा आहेत. त्यात सरकारी शाळा 85 टक्के आहेत. म्हणूनच सर्वाधिक संख्येच्या सरकारी शाळांमध्ये मी मुल्यवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात सुरुवात केली. मुल्यवर्धन बालस्नेही पध्दतीने शिकविला जावा यावर भर देवून 2009 मध्ये बीड जिल्ह्यात 50 शाळांत हा प्रयोग सुरु केला.

शासनाची कोणतीही मदत न घेता सुरु केलेल्या या उपक्रमातून अनेक चांगले-वाईट अनुभव आले. या अनुभवातूनच 2015 ला सुधारित आराखडा शासनाला दिला. 2016 पासून राज्यशासनाच्या मदतीने हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील शिरसोली केंद्रापासून कार्यक्रमाला सुरुवात केली. एकूण चार भाषांमध्ये तर गोव्यात तीन भाषांमध्ये हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आल्याचेही ते म्हणाले. अलिकडे गुजरात राज्यातदेखील मुल्यवर्धन उप्रकम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमामुळे पुढच्या चार ते पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बदललेली दिसेल असा विश्वासही त्यांची यावेळी व्यक्त केला.

शिक्षणात शिकविण्याची पध्दत महत्वाची असते. त्यामुळे शिक्षणाच्या व्यवस्था कशाही असल्या तरी फरक पडत नाही. चार वर्षात दोन लाख शिक्षकांना आम्ही मुल्यवर्धनाचे प्रशिक्षण दिले आहे. असेही त्यांनी सांगितले. मुल्यवर्धनातून नेमका कोणता बदल अपेक्षित आहे. या गिरीष कुलकर्णी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुथा म्हणाले की, मुल्यवर्धनामुळे शाळा, विद्यार्थी, घर पातळीवर बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना ‘स्व’ची जाणिव होवू लागली आहे. बोलता झालेला विद्यार्थी निर्णय घेवू लागला आहे. गुंड व्हायचंय सांगणारे विद्यार्थी आता आर्दश विद्यार्थ्याचा पुरस्कार घेवू लागले आहेत.

राज्यभरातून साडेबारा हजार व्हिडीओ क्लिप्स या बदलांच्या माझ्याकडे आल्या आहेत. पूर्वी पालक शाळांमध्ये तक्रारी करायला यायचे आता ते कौतुक करायला येऊ लागले आहेत. असेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता घसरली, या प्र.श्रा.चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुथा म्हणाले की, मुलांच्या शिक्षणासाठी पालक कितीही काबाडकष्ट करायला तयार झाले आहेत. यातूनच इंग्रजी शाळांची मानसिकता बळावली आहे. या चक्रव्यूहात नगरपालिकेच्या शाळा मागे पडल्या आहेत.

मात्र, हे चित्र हळुहळु बदलेल. शिक्षणाचा बाजार होवू नये, तर शिक्षण मोफत मिळायला हवे असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यातल्या शेवटच्या शाळेचा शिक्षक हा माझ्या उपक्रमाचा ‘मास्टर टे्रनर’ आहे. असेही त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातल्या पाचशे लोकवस्ती असलेल्या गावात माझा जन्म झाला. संपुर्ण शिक्षण सरकारी शाळेत घेतले. लहानपणी आई गेल्यानंतर वाट्याला आलेल्या संघर्षातून मी पेटून उठलो. आणि तेव्हापासूनच सामाजिक कार्याची ओढ लागली.

सध्याच्या जगात विद्यार्थ्यांसमोर बाह्य धोके खूप आहेत. आणि म्हणूनच टाटा ट्रस्टला सोबत घेवून डॉ. रमेश पानसे यांच्या सोबतीने मी संपूर्ण महाराष्ट्रात मुल्यवर्धन कार्यक्रम राबवित आहे. मनुष्य जीवन फार क्वचित मिळते. मात्र, माझ्या सामाजिक कार्याक्रमांच्या माध्यमांतून एका जन्मात मला दहा जन्माचे जीवन जगायला मिळत असल्याचेही मुथा यांनी अभिमानाने सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com