तरुण तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
Featured

तरुण तलाठ्यावर प्राणघातक हल्ला

Sarvmat Digital

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना

उंबरे (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील कात्रड- गुंजाळे येथील तलाठी सतीश सुभाष पाडळकर (वय 35) या तरुण तलाठ्यावर चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही. घटना उंबरे-कात्रड-गुंजाळे रस्त्यावर काल मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर त्वरित पंचनामे करून तलाठी पाडळकर यांनी पुढील कार्यवाही केली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना मदतही प्राप्त झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्यावतीने त्यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते वांबोरीमार्गे निघाले होते. गुंजाळेपासून ते 1 किमी अंतरावर आपल्या मोटारसायकलवर जात असताना, तेथे पल्सर मोटारसायकलवर दाढी असलेले दोघे उभे होते. पाडोळकर जवळ येताच, या दोघांनी त्यांना दगड मारले. त्यात एक दगड लागल्याने पाडोळकर जागीच थांबले. नेमकी हीच संधी साधून या दोन तरुणांनी त्यांच्यावर सळई आणि सत्तूरसदृश हत्याराने हल्ला केला.

ही मारहाण चालू असताना तलाठ्याने आरडाओरड केला. आवाजाच्या दिशेने काहीजण धावले. काहीजण येत असल्याचे पाहताच या हल्लेखोरांनी धूम ठोकली. पांढरी पुलाच्या दिशेनेही दोनजण त्यांच्या पाळतीवर होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्याने तलाठी पाडळकर अचानक झालेल्या जबर हल्ल्यात बेशुध्द झाले होते. त्यांना त्वरित वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे डॉक्टर नसल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती कळताच तहसीलदार शेख व अन्य तलाठी घटनास्थळी धावले. रात्री तलाठी शुध्दीवर आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. घटनेमागे काय हेतू होता, याची माहिती समजू शकली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com