स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युवक काँग्रेस सुपर १००० अभियान राबवणार
Featured

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युवक काँग्रेस सुपर १००० अभियान राबवणार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

मुंबई | प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक काळातील सुपर 60 अभियानाच्या यशानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसने आता राज्यात आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यानुसार आता राज्यात सुपर 1000 अभियान राबवण्यात येणार असुन त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी शनिवारी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्द्यावंर चर्चा करुन ठराव मंजुर करण्यात आले.

मुंबईत आज टिळक भवन येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीस राज्य प्रभारी प्रतिभा रघुवंशी आणि युवक काँग्रेसचे सचिव आणि राज्य प्रभारी तौकीर आलम यांची प्रमुख उपस्थिती हेती. राज्यात आगामी काळात येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळवुन देण्यासाठी युवक काॅंग्रेस पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार असून राज्यात कमीत कमी 1000 युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देण्यात येणार आहे,अशी माहिती अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

बैठकीदरम्यान प्रदेश कार्यकारिणीने काॅंग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी,अहमद पटेल,राहुल गांधी, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, श्रीनिवास बी वी, कृष्णा आलावरू यांचा महाविकास आघाडी सरकारस्थापनेत महत्वपूर्ण सहभाग आणि मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष अभिनंदनाचा ठराव एकमताने मांडण्यात आला.

तसेच राज्य मंत्रीमंडळात शपथविधी झाल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थाेरात आणि मंत्री डाॅ. नितीन राऊत आणि नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला.

तसेच आगामी दोन महिन्यात होणा-या जिल्हा परिषद निवडणूकीत सर्व ठिकाणी 40 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीनांच उमेदवारी देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. यावेळी ब्रिजकिशोर दत्त, आनंद सिंग, श्रीनिवास नालमवार, शिवराज मोरे, ऋषिका राका, यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थिती होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com