युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी आज पक्ष कार्यालयात मुलाखती

jalgaon-digital
2 Min Read

प्रदेश कमिटीकडून तीन सदस्यीय समिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून रिक्त असलेल्या युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा युवक कॉँग्रेसला लवकरच जिल्हाध्यक्ष मिळणार आहे.

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सुमित भोसले, अभय देशमुख व अभिजित शिवरकर यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती उद्या दि. 26 डिसेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आजी माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, महिलाध्यक्षा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची भेट घेऊन युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार आहेत.

काँग्रेस पक्षाची भूमिका, ध्येय धोरणे आणि जबाबदारींची विभागणी, प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी. राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांचा विचार अखेरच्या माणसांपर्यंत पोहचावा व युवक संघटन मजबूत करणे आदी बाबींवर सक्षम असणार्‍या जिल्हाध्यक्षाची निवड प्रदेश नेतृत्वाला अपेक्षित आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्‍या जिल्ह्यातील युवक पदाधिकार्‍यांची उद्या दि. 26 डिसेंबरला दुपारी बारा वाजता पक्षाच्या लालटाकी येथील कार्यालयात मुलाखत घेण्यात येणार असल्याचे निवड समिती सदस्य महासचिव सुमीत भोसले यांनी सांगितले.

‘त्या’वेळी बरखास्त
दरम्यान, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे पद हे लोकसभा निवडणुकीपासूनच रिक्त होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान युवक काँग्रेसच्या निरीक्षक जिल्हा परिषद सदस्या नयना गावित यांनी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली होती. पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने तत्कालीन परिस्थितीत त्यांनी ही कारवाई केली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *