येरवडा कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन
Featured

येरवडा कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील येरवडा कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील येरवडा, भायखळा, ऑर्थररोड, कल्याण आणि ठाणे ही कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या आता या कारागृहाच्या आतून कोणी बाहेर येऊ शकत नाही व बाहेरूनही कोणी आत जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

पुण्यातील येरवडा कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत. लॉकडाऊनच्या आधी या कारागृहातून दररोज 150 ते 200 कैदी कोर्टात ये-जा करत होते. परंतु शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.कैद्यांसाठी जेल प्रशासनाने कापडी मास्क तयार केले होते. कारागृहातून कोर्टात जाणार्‍या प्रत्येक कैद्याला हे मास्क देण्यात येत होते. कोर्टातून कारागृहात परत येणार्‍या प्रत्येक कैद्याला हात धुण्यासाठी सॅनिटायझरही पुरवण्यात येत होते.

मात्र, कालांतराने कोर्टाचे कामकाजही ठप्प झाले व त्यानंतर कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले.दरम्यान, करोनाचे संकट गडद होत असताना कारागृह विभागाचे अप्पर पोलीस संचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृहातील कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडणार असल्याचे सांगितले. त्यानुसार येरवडा कारागृहातील 600 पेक्षा अधिक कैदी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

शिक्षा भोगत असलेक्या कैद्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावे, त्यांचे मन इतर कार्यात वळावे यासाठी कारागृहात विविध उपक्रम राबवले जातात. कारागृहात वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे कारखाने आहेत. चप्पल, शूज, फर्निचर, राख्या आणि इतरही वस्तू तयार करण्याचे काम येथील कैदी करत असतात. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ही कामे ठप्प आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com